Saturday, February 24, 2007

जीवनगाणे

शुक्रवारची संध्याकाळ असूनही मला भयंकर कंटाळा आला होता. जोडीला वैताग आणि चिडचिडही. हातातलं काम संपता संपत नव्हतं आणि 'वीकेंड स्पेशल' ढीगभर कामांची यादीही डोळ्यांपुढे नाचत होती. ऑफिसमधल्या इतर मंडळींना मात्र Friday night fever (नेहेमीप्रमाणेच) दुपारपासूनच चढू लागला होता. लंचटाईमला जी टंगळमंगळ चालू झाली... वीकेंडचे शॉपिंग प्लॅन्स, पावासाची शक्यता असल्याने फिरायला जाता येणार नाही म्हणून हळहळ, अलाबामा-ऑबर्न बास्केटबॉल गेम, जिमनॅस्टिक्स मीट, चायनीज कम्युनिटीचा कसलातरी समारंभ, असे सगळे विषय चघळून झाल्यावर मंडळी उगाच काम केल्यासारखं दाखवून पावणेपाच वाजायची वाट बघत कसाबसा वेळ काढत होती. पावणेपाच झाले रे झाले, की "बाऽऽऽय! हॅव अ नाईस वीकेंड!" म्हणून एकेकाने पळ काढला. मी मात्र हातातलं काम उरकायच्या मागे लागले होते.

साडेपाचला काम उरकून Quad वरून डिपार्टमेंटकडे चालत यायला निघाले. मला आज 'लोकल' कंटाळा आला होता. परवाच कौस्तुभने 'कंटाळ्याचे दोन मुख्य प्रकार' या विषयावर माझं प्रबोधन केलं असल्याने, मला आलेल्या कंटाळ्याचं मी तत्परतेने 'लोकल कंटाळा' असं identification केलं! 'लोकल' कंटाळा म्हणजे तेवढ्या टाईम स्पॅन करता असलेला तात्पुरता कंटाळा... 'ग्लोबल' कंटाळा म्हणजे टोटल आयुष्याचा कंटाळा! म्हणजे,

"कळून येता जगण्याची या इवलीशी त्रिज्या
उडून जाती अत्तरापरी जगण्याच्या मौजा
दारी नाही फिरकत कुठला नवा छंद चाळा
राखण करीत बसतो येथे सदैव कंटाळा
कंटाळ्याचादेखिल आता कंटाळा येतो..."


- अशा टाईपचा! [काही काही ठिकाणी संदीप खरे quote करणं इतकं अपरिहार्य का व्हावं? :) ] म्हणजे आठवडाभर निरर्थक वाटणारी कामं करताना, "कधी एकदा वीकेंड येतोय..." असं वाटत असताना येतो तो 'लोकल' कंटाळा. आणि वीकेंडला करण्याजोगं काहीच नसल्यावर नुसतंच यड्यासारखं बसून, किंवा मग वीकेंडलादेखिल प्रचंड काम असल्यावर डिप्रेशन येऊन "आपल्या आयुष्याला काहीच अर्थ नाही!" असं वाटणे म्हणजे 'ग्लोबल' कंटाळा असावा बहुतेक! हा ग्लोबल कंटाळा फार वाईट, असं कौस्तुभचं म्हणणं!

असो. पण माझा आजचा कंटाळा तसा लोकलच होता. तो घालवण्यासाठी आता काय काय करता येईल याचा विचार करत करत चालत असताना, अचानक कुठूनतरी जरा विचित्र संगीत कानावर पडलं. बासरी आणि एक-दोन ड्रम्स होते मुख्यतः . जरा इकडे तिकडे पाहिलं तर दूरवर, Quad च्या दुसऱ्या टोकाला एका mound वर चार-पाच जणं काहीतरी वाजवताना दिसले. मी चालता चालता कान देऊन ऐकू लागले. फार गोड वाटत होतं ते ऐकायला. कुठल्या एका ठराविक प्रकारचं म्युझिक म्हणता येईल असं नव्हतं ते... झालंच तर थोडा 'folk' touch होता... पण जे काही होतं ते कानांना विलक्षण गोड वाटत होतं. माझी पावलं आपोआप त्या दिशेला वळली. जवळ गेल्यावर दिसलं... माऊंडच्या खाली एका पायरीवर उभं राहून एक जण बासरी वाजवत होता. माऊंडवर चार-पाच जण होते. एकाच्या हातात एकदम राजेश खन्ना नाहीतर हृषी कपूर स्टाईल डफ होता. एकाकडे दोन छोटे छोटे, बसून वाजवायचे ड्र्म्स, एकाकडे एक भलामोठा ढोलकीसारखा ड्र्म... बासरीच्या सुरांत तल्लीन होऊन त्यांचं एका तालात बडवणं चालू होतं. एक मुलगी उभी राहून tambourine वाजवत होती, तिच्या पावलांनीही छान ताल धरला होता. एक अपंग माणुस माऊंडच्या खाली त्याच्या wheelchair वर बसून, ते हातात धरून वाजवतात ना... खुळखुळ्यासारखं दिसणारं वाद्य... काय म्हणातात त्याला, मला माहित नाही... कुणाला माहित असेल तर जरूर सांगा... ते वाजवत होता. या सगळ्या वाद्यांपैकी फक्त बासरी वाजवणारा जरा trained किंवा skillful वाटत होता. बाकी सगळेजण नुसतच काहीतरी हातात घेऊन बडवत होते. पण त्या सगळ्याचा ताळमेळ असा काही जमून आला होता, की ऐकत रहावसं वाटत होतं. सगळेजण आपापसात खाणाखुणा करून मध्येच लय बदलत होते. कधी एकदम जोरदार ठेका, काही वेळाने जरा संथ, मग पुन्हा हळू हळू सगळे गुंग होईस्तोवर rhythm वाढवत वाढवत न्यायचा!

बिझनेस स्कूल मधली टाय वगैरे घातलेली दोन मुलं माझ्यासारखीच कुतूहलाने त्यांच्याकडे बघायला थांबली होती. एकाने त्यांना हात करून वर बोलावलं... त्यातला एकजण गेला, आणि तिथल्या पिशवीतून आणखी एक छोटा डफ काढून वाजवू लागला. मी जवळ जाऊन त्यांच्याकडे बघत, ते संगीत ऐकत उभी राहिले. मी पण मस्त ओढणीसहीत सलवार-कमीज वगैरे घातलेला असल्याने ते लोक देखिल उत्सुकतेने माझ्याकडे पहात होते. ते विचित्र, पण गोड संगीत एव्हाना मलाही 'चढू' लागलं होतं :) त्या tambourine वाल्या मुलीने हसून, हातवारे करून मलाही वर बोलावलं. Tambourine माझ्या हातात दिलं आणि स्वतः आणखी काहीतरी घेऊन वाजवायला लागली. त्या tambourine वर माझ्या हाताची एक थाप पडली, आणि मग मी केव्हा त्या लयीत एकरूप झाले कळलंच नाही. बराच वेळ आजूबाजूचं काही दिसतंच नव्हतं जणू... त्या फ्ल्यूटचा गोड, नाजूक, पण तरीही आसमंत भारून टाकणारा आवाज... डोळे बंद करून ऐकलं तर सह्याद्रीच्या कुशीतल्या कुठल्याश्या खेडेगावात एखादा गुराखी नदीच्या किनारी बसून पावा वाजवतोय असंच वाटावं! सोबतीला एवढा मस्त ठेका... एवढी तालवाद्य असली तरी ती अतिशय सौम्य होती, आजिबात गोंगाट वाटत नव्हता. खूप वेळ हातातल्या त्या खंजिरीसह ते संगीत 'अनुभवत' राहिले. मनात खोलवर रुजू दिलं त्याला. अगदी आतून फुलून आल्यासारखं झालं. का कोण जाणे, फार फार ओळखीचं, जवळचं वाटत होतं ते सगळं. कंटाळा, मरगळ, चिंता, दुःख, विवंचना, काळज्या सगळ्यांना फाटा देऊन आयुष्याशी नातं सांगणारं असं काहीतरी...!!

काहीवेळाने जऽरा भानावर आले. बघितलं तर प्रत्येकाच्या चेहऱ्यावर त्या क्षणाचा आनंद ओसंडून वाहत होता. जाणवलं की किती वेगवेगळे होतो आम्ही सगळे... काळे, गोरे, माझ्यासारखे 'ब्राऊन' :), तरूण, मध्यमवयीन, वृद्ध, अपंग, धडधाकट... सगळे अगदीच वेगवेगळे. एरवी कुठल्याही ठिकाणी भेटलो असतो तर एकमेकांशी बोललोदेखिल नसतो कदाचित. सगळ्यांना एकमेकांची भाषाही कळली नसती. पण आता मात्र एका वेगळ्याच भाषेत आमचा संवाद चालला होता. कुणी मान डोलावून कुणाला दाद देत होतं, कुणी हाताने खूण करून लय वाढवायला सांगत होतं, कुणी दुसऱ्याच्या वाद्यावर ताल धरत होतं, कुणी आपाल्याच नादात हसत होतं!

खिशात सेलफोन व्हायब्रेट झाला आणि मी एकदम ’खऱ्या’ जगात आले. डिपार्टमेंटमध्ये काही जणांना भेटायचं होतं, ते वाट बघत असतील. इथे अजून थांबणं शक्य नव्हतं. जाता जाता हे लोक कोण आहेत, हे काय नककी काय करतायत, का करतायत वगैरे विचारावं, तर कुणाची तंद्री भंग करणार? :)Tambourine जिच्याकडून घेतली तिला परत देताना विचारलं,

"How long are you folks going to be here?"

तर ती हसून म्हणाली, "I don't know. I just joined them like you did."

मग एकाने सांगितलं, "We do this every Sunday at 1 o'clock! You can join us anytime..."

पण त्याला बाकी काही तिथे विचारून त्या सगळ्या भारलेल्या वातावरणाचा भंग करण्यात पॉईंट नव्हता. मी सगळ्यांना wave करून तिथून निघाले खरी, पण ते सूर कितीतरी वेळ कानात घुमत होते. कंटाळा तर कुठच्या कुठे गेलाच होता, पण तो येऊ नये म्हणून वीकेंडला (होमवर्कव्यतिरिक्त) काय काय करता येईल, याबद्दल नवनवीन कल्पनासुद्धा डोक्यात येऊ लागल्या! या वीकेंडचा highlight उपक्रम म्हणजे एक भलंमोठं jigsaw puzzle सोडवायला घेतलंय! प्रचंड होमवर्क आणि पुढच्या आठवड्यात परीक्षादेखिल असल्याने लगेच पूर्ण होणार नाही, पण होईल तेव्हा त्याचा update इथे लिहीनच! शिवाय जमेल तेव्हा रविवारी दुपारी एक वाजता Quad वर चक्कर टाकायचा विचार आहेच! :)

Monday, January 29, 2007

अघळपघळ

परवाच मिनोतीने आठवण करून दिली की मी बरेच दिवसात काही लिहीलेलं नाहीये. मग लक्षात आलं खूप दिवसांत लिहीण्यासारखं विशेष काही घडलेलंही नाही. बाकी फारसं काही घडत नाहीये हे चांगलंच आहे म्हणा... नाहीतर तीन-तीन असाईन्मेंट्स एका दिवशी ड्यू असणे, नोकरीच्या ठिकाणी बॉसला अचानक मिटींग्सवर मिटींग्स घेण्याची लहर येणे, तब्येत बिघडणे, घरातली सगळी ग्रोसरी संपणे, "रिसर्च कुठवर आलाय ते सांगायला येऊन भेट" म्हणून मास्तरांची ई-मेल येणे, एवढ्या सगळ्या 'विशेष' गोष्टी एकत्र घडतात ते दिवस नुसते आठवूनदेखिल दरदरून घाम फुटतोय! म्हणतात ना, "No news is good news" ... तसंच, काहीही न घडणे हे काहीतरी चांगलं घडल्यासारखंच आहे :)

नाही म्हणायला सगळं सुरळीत चालू आहे. सकाळीच एक होमवर्क (शेवटच्या क्षणापर्यंत धावपळ न करता) वेळेत सबमिट केला, उद्याच्या क्लासची तयारी झाली आहे, रूममेटनी बनवलेलं आयतं जेवण जेवून, त्यानंतर चुलत भावाच्या लग्नाचा एक लाडू खाऊन, संदीप खरेची गाणी ऐकत ब्लॉग लिहीत बसले आहे...

लागते अनाम ओढ श्वासांना
येतसे उगाच कंप ओठांना
होई का असे तुलाच स्मरताना
तनन दीम तदेरेना देरेना...

- मला सांगा... सुख-सुख म्हणतात ते आणखी काय असतं? :) डिट्रॉइटहून येताना भावाकडून संदीप खरे - सलील कुलकर्णीची 'सांग सख्या रे' आणली... अजून पारायणं चालू आहेत, पण 'लागते अनाम ओढ श्वासांना...' सध्या 'चढलंय'... मस्त जमून आलंय हे गाणं!

अमेरिकेत होऊनही पारंपारिक मराठी पद्धतीने झालेला भावाचा लग्नसोहळा... या आठवड्यात आणखी एका मित्राचं पुण्यात लग्न आहे. 'शादी किसीकी भी हो, अपना दिल गाता है' - दोन प्रेमी जीवांच्या एकत्र येण्याइतकी आनंदाची गोष्ट दुसरी काय असू शकते? पण या लग्न झालेल्या, त्यातल्या त्यात नवीन लग्न झालेल्या लोकांचा एक प्रॉब्लेम असतो... आपलं लग्न झालं म्हणजे "आता तू केव्हा लग्न करतोयस/करतीयेस?" असं सगळ्या अविवाहित मित्र-मैत्रीणींना किंवा भावा-बहिणींना विचारायचा यांना लायसन्सच मिळतो जणू! जसं काही ते एखाद्या सापळ्यात अडकलेत आणि आता शक्य तितक्या लोकांना त्यात ओढू पहातायत असं वाटतं... किंवा आपलं लग्न झालंय म्हणजे आपण कुणीतरी मोठे झालो आहोत, आणि समस्त अविवाहित मंडळींच्या लग्नाची जबाबदारी आपल्याच डोक्यावर आहे, असं काहीतरी त्यांना वाटत असावं बहुधा! नवीन लग्न झालेल्या आणि रिटायर झालेल्या लोकांमध्ये हे एक साम्य असतं -- उगाच दुसऱ्याच्या लग्नाच्या चौकशा करणे. असो.

या सुट्ट्यांमध्ये दोन-चार पुस्तकं वाचली... आणिक दोन-चार वाचायची राहिली. वाचलेल्यांपैकी विशेष न आवडलेलं म्हणजे चेतन भगतचं 'Five Point Someone'. बरेच दिवसांचं वाचायचं राहिलं होतं... गेली दोन-अडीच वर्षं काहीच वाचन झालं नव्हतं माझ्याकडून. सतत कशाततरी गुंतलेली असायचे. त्या काळात आलेली आणि लोकप्रिय झालेली सगळी पुस्तकं miss झाली आहेत माझ्याकडून. 'Five point...' ची बरीच hype झाली होती. त्यामानाने पुस्तकाने निराशा केली. तसं लेखकाचं हे पहिलंच पुस्तक आहे हे लक्षात घेता, निवेदनशैली वगैरे चांगली आहे... पण जनरल पब्लिकला हवा असलेला मालमसाला ठासून भरलाय, आणि IIT चं ब्रॅंड नेम कॅश केलंय! अगदीच वाईट आहे असं नाही, पण "What not to do at the IIT" ही त्याची punchline आणि एकंदरच त्यापुस्तकाचा आल्या आल्या झालेला गवगवा यामुळे उगाचंच अपेक्षा वाढल्या असाव्यात माझ्या.

दुसरं पुस्तक म्हणजे 'हृ्दयस्थ'. स्व. डॉ. नीतू मांडकेंच्या त्यांच्या पत्नीने लिहीलेल्या आठवणी. पुस्तक चांगलं आहे. डॉ. अलका मांडके रूढार्थाने 'लेखिका' नसल्याने या पुस्त्कात तथाकथित 'साहित्यिक मूल्य' नसेल फारसं, पण त्यांचं लिखाण फार प्रामाणिक आणि मनापसून आहे हे पदोपदी जाणवतं. डॉ. मांडकेंचं व्यक्तिमत्त्वाच इतकं प्रभावी होतं की अवतीभवतीच्या सगळ्यांना त्यांच्या दबावाखाली किंवा त्यांच्या प्रचंडत्वाच्या छायेत वावरावं लागे. तरीही एक 'माणूस' म्हणून ते किती थोर होते हे पुस्तक वाचून लक्षात येतं.

तिसरं पुस्तक - "The Bridges of Madison County" . गेल्या वर्षी मायबोलीच्या हितगुज दिवाळी अंकात या पुस्तकाचा परिचय वाचला तेव्हापासून हे पुस्तक वाचायची इच्छा होती. सुट्टीत पब्लिक लायब्ररीतून आणून वाचलं. आवडलं. प्रेमकथांकडे फारसा कल नसलेल्यांना ते stereotyped bullshit वाटू शकेल कदाचित. खरंतर या पुस्तकाच्या बाबतीत मी लोकांची अतिशय टोकाची मतं ऐकली आहेत. पण मला overall आवडलं. काही काही ठिकाणी जरा कंटाळवाणं होऊन 'Mills and boons' च्या वळणावर जातंय की काय अशी शंका आली... पण मग कथानकाने लगेच पकड घेतली. या पुस्तकातलं नेमकं काय आवडलं आणि सौंदर्यस्थळं कुठली वगैरेवर वेगळा लेख होऊ शकेल. I will spare you that. आता या पुस्तकावर आधारित क्लिंट इस्ट्वूड आणि मेरील स्ट्रीपचा चित्रपट पहायची इच्छा आहे. बघू.

देशातून काकांनी ’अणसार’ नावाचं नवीन पुस्तक पाठवलंय. एका गुजराती कादंबरीचा मराठी अनुवाद आहे. डिट्रॉइटहून येताना फलाईटमध्ये ५०-६० पानं वाचली... एका कुष्ठरोग झालेल्या स्त्रीच्या आयुष्यावर आधारित कादंबरी असल्याने जरा depressing आहे. त्यामुळे "इतक्यात नको वाचायला... सुट्टीत बघू.." असा विचार मनात आला. पण आता स्वभावाप्रमाणे हातात घेतलेलं पुस्तक संपवल्याशिवाय चैन पडणार नाहीये. Hopefully शेवट जरा आशावादी किंवा प्रेरणादायी असावा!

काहीही विषय नसताना मी चिकार बडबड करू शकते हे मला माहित होतं, पण काहीही एक विषय नसताना इतकं खरडू पण शकते हे नव्यानंच कळलं! चला... झाली तेवढी अघळपघळ पुरे झाली! कामाला लागलेलं बरं... शुक्रवारी अजून एक सबमिशन आहे! Deadline is the ultimate inspiration - हेच खरं! :)

Friday, January 5, 2007

एका दाटून आलेल्या संध्याकाळी...

एका दाटून आलेल्या संध्याकाळी आमच्या university च्या campus मध्ये घेतलेले हे फोटो. मला photography मधलं काहीही कळत नाही. 'घेतला camera आणि केलं click' असेच हे फोटो आहेत, तेव्हा please bear with them! :-)





मी library च्या porch मध्ये उभं राहून ज्या 'मोठ्ठ्या' लॉन्स वर कोसळणारा पाऊस पाहिला ते हे लॉन्स, अर्थात 'Quad' . इथे रोज पहाटे आणि संध्याकळी बरेच लोक jogging किंवा walk ला येतात. संध्याकाळी आई-वडील लहान मुलांना खेळायला घेऊन येतात. बरीच मुलं सायकल चालवताना दिसतात. संध्याकाळी department मध्ये कंटाळा आला, की Gorgas library च्या Coffee shop मधून कॉफी घेऊन यायची, आणि कॉफी घेत घेत Quad वर फेरफटका मारायचा, हा माझा आवडता कार्यक्रम! समोर दिसणारा उंच tower म्हणजे Denny Chimes. त्यातून थोड्या थोड्या वेळाने (नेमक्या किती ते माहित नाही) छान आवाज येतात.





Quad, पुन्हा एकदा! Fall season च्या सुरुवातीला ही सगळी झाडं लाल-पिवळ्या-नारिंगी पानांनी डवरलेली असतात. Fall colors नी नटलेलं quad विलक्षण सुंदर दिसतं. आता पानगळ झाल्यावर हीच झाडं अगदी भकास दिसू लागतात. Summer मध्ये संध्याकाळी गजबजून जाणारं Quad हिवाळ्यात मात्र अगदी उदास वाटतं...





Gorgas Library... UA मधली सगळ्यात देखणी आणि दिमाखदार वास्तू! सध्या Holiday season साठी सजलेली! Gorgas च्या पायऱ्यांवर किंवा porch मध्ये उभं राहिल्यावर आख्खं Quad डोळे भरून बघता येतं. इथेच उभं राहून Quad वर कोसळणारा पाऊस पाहिल्याची आठवण आजही माझ्या मनात ओलावा निर्माण करते. Gorgas च्या अगदी समोर, Quad च्या दुसऱ्या टोकाला Denny Chimes आहे. निळ्या आकाशाच्या पार्श्वभूमीवर तो tower देखिल इथून फार सुरेख दिसतो.




Gorgas च्या porch मधून दिसणारी Denny Chimes. माझं department Quad च्या एका बाजूला आहे, तर ऑफिस दुसऱ्या बाजूला. त्यामुळे दिवसातून एकदा तरी Quad ओलांडून पलिकडे जावं लागतंच. आजूबाजूची झाडं, लॉन, त्यावर धीटपणे बागडणाऱ्या खारी, Gorgas, Denny Chimes, सगळ्याकडे पहात चालायला खूप छान वाटतं...




Denny Chimes च्या जवळून टिपलेली Gorgas.





UA चा मानबिंदु - Denny Chimes, एका दाटून आलेल्या संध्याकाळी....

Monday, December 18, 2006

पाऊस

हे फार पूर्वी कधीतरी लिहीलेलं. परवा पावसाबद्दल लिहीलं तेव्हा आठवलं अचानक:

********************************************
हल्ली पाऊसही पडत नाही पूर्वीसारखा....
पूर्वी आपण भेटल्यावर आलं घातलेल्या चहाचा एक घोटही घेतला नाही, की धो-धो पाऊस पडायला लागायचा!
"आज जरा लवकर जायला हवं," असं म्हणत म्हणत आलेलो आपण दोघेजण मग शांतपणे पावसाकडे बघत बसायचो....
पावसाच्या निमित्ताने का होईना आपल्या भेटीचा वेळ वाढतोय, या कल्पनेने मनोमन सुखावत.
पाऊस थांबायची वाट बघता बघता गप्पा इतक्या रंगायच्या की पाऊस थांबल्याची आठवण फार उशीरा व्हायची!

हल्ली तू येतोस तेच घड्याळाकडे पहात पहात -
चहा घेता घेता पावसाची सर आलीच एखादी, तर तीदेखिल चहा संपता संपताच ओसरते
"पाऊस थांबलाच आहे तर निघूयात... पुन्हा कधी कोसळायला लागेल नेम नाही..." म्हणून निघून जाताना
तुझी पावलं जराही घुटमळत नाहीत
मग मी तुझ्या पाठमोऱ्या सावल्या मनात साठवत राहते.
सारं कसं पार बदललंय...
हल्ली पाऊस तरी कुठे पडतो, पूर्वीसारखा....!

Friday, December 15, 2006

पाऊस पापणीआड ...कधीचा... असतो!

"उद्या छत्री जवळ ठेव बरं! पाऊस पडणार आहे."
"च्यामारी, म्हणजे सकाळी आठच्या class ला पावसापाण्याचं जावं लागणार!"
"नाही, नाही... सकाळी नाही. दुपारी दोन ते पाचच्यामध्ये पडणार आहे."

.... छ्या! हा काय पाऊस झाला? Weather.com च्या सांगण्यानुसार शॉवर चालू करावा तसा पडणार आणि वेळ झाली, की पुन्हा शॉवर बंद केल्यासारखा थांबणार! तोवर सगळेजण आपापल्या ऑफिसात स्वतःला कोंडून घेणार. Meetings वगैरे शक्यतो आधीच उरकून घेणार. ज्यांचं ऑफिस basement मध्ये आहे, त्यांना तर कळणार पण नाही बाहेर पाऊस पडतोय की काय ते.... किती boring आहे इथला पाऊस! बरं, पाऊस पडून गेल्यावर पण पावसाच्या काही विखुरलेल्या खाणाखुणा, ओल, चिखल, काही नाहीच!! रस्ते लगेच कोरडे... सगळं लगेच पूर्वीसारखं....

पावसाने कसा 'अवेळी' येऊन 'धिंगाणा' घातला पाहिजे! :) किंवा आजिबात ध्यानीमनी नसताना, मस्त ऊन पडलेलं असताना, अचानक दाटून येऊन रस्त्यात 'गाठलं' पाहिजे आपल्याला! मग आपण थोडं भिजत, घाईघाईने जाऊन कुठेतरी आडोसा शोधायचा, उशीर होतोय वगैरे सगळं विसरून नुसतं पावसाकडे बघत रहायचं. पाऊस जरासा कमी होऊन फक्त थोडी रिपरिप उरेल, तेव्हा ओढणी डोक्यावर घेऊन उगाचच पावसापासून जपण्याचा आव आणत, ती भुरभुर हलकेच अंगावर झेलत, भिजत भिजतच घरी जायचं. मग छानपैकी आलं घातलेला चहा प्यायचा :) ! इथे च्यायला पावसाकडे बघायची सुद्धा पंचाईत.... Graduate Office च्या एकुलत्या एका इवल्याश्या खिडकीतून, blinds किलकिल्या करून, समोरच्या दोन इमारतींच्या मध्ये दिसेल एवढाच पाऊस! :( आणि इथे पावसाळा पण नाही.... दोन-तीन महिने उकाड्याने त्रासून जाऊन पावसाची वाट बघणं, मग मोन्सून कुठपर्यंत आलाय ते वाचायला उत्सुकतेने पेपरची पानं चाळणं, पहिला पाऊस झाला की मग हायसं वाटून मस्तपैकी भिजणं, लगबगीने छ्त्र्या-रेनकोट वगैरे बाहेर काढणं, ठिकठिकाणी लागणाऱ्या पावसाळी सेल मधे एका हातात छत्री घेऊन हौसेने खरेदी करणं, काहीच नाही!! मला आठवतं, पहिल्या पावसाच्या वेळेस हमखास माझी परीक्षा असायची! शेवटचाच पेपर राहिलेला असायचा बहुतेकवेळा.... पण अभ्यासाचं कितीही tension असलं तरी एकदा आभाळ भरून आलं, आणि 'जोराचा वारा-मातीचा वास' वगैरे सहित पावसाची चिन्हं दिसू लागली की अभ्यासात लक्षच लागायचं नाही! दुसऱ्या दिवशी परीक्षा म्हणून आई भिजू द्यायची नाही. पण तरी हळूच बाहेर ओट्यावर जाऊन थोडासा पाऊस अंगावर झेलायचा, मग खिडकीतून बाहेरच्या झाडा-झुडपांवर मनसोक्त कोसळणारा पाऊस बघत उगाचंच थोडं हळवं व्हायचं, पाऊस थांबल्यानंतरही हवेत दरवळत राहिलेला त्याचा सुवास श्वासांत भरभरून घ्यायचा; आणि मग संध्याकाळी अंधार झाल्यावर MSEB च्या कृपेने वीज गेली(ती काय चार शिंतोडे पडले तरी जातेच!) की दुपारभर वेळ फुकट घालवला म्हणून emergency light च्या उजेडात पहाटेपर्यंत अभ्यास करायचा, हे दर वर्षीचं ठरलेलं असे!

इथे म्हणजे वर्षभर केव्हाही पाऊस पडणार, अर्थात आधी weather.com वर कळवूनच.... आणि एखादं routine काम उरकून गेल्यासारखा जाणार! पावसाळा वगैरे काही नाही! :( फारच नाराज होते मी इथल्या पावसावर. परका देश, परकी माणसं, अचानक आलेला एकटेपणा, सगळ्याशी जुळवून घेता घेता पुरती भांबावले होतेच मी... पण इथे पावसानेदेखिल पावसासारखं वागू नये? तेवढ्यात एकदा, दुपारी ऑफिसमधून निघून class ला जात असताना अचानक पावसाने गाठलंच मला. मग धावत धावत जाऊन Gorgas Library च्या porch मध्ये आडोश्याला उभं राहून बघितलं, तर फार काही वेगळा नव्हता अमेरिकेतला पाऊस! समोरचं मोठ्ठं लॉन आणि त्याच्या कडेकडेने रांगेत उभ्या असलेल्या मेपल वृक्षांवर कोसळणारा पाऊस डोळेभरून पाहून घेतला. पावसाशी नव्याने मैत्री व्हायला हे निमित्त पुरेसं होतं. तो ओसरल्यावर जरा जरा भिजत पाच मिनीट उशीरा वर्गात पोचले, आणि मग मला कुडकुडताना पाहून मास्तरांनी AC बंद केलं, तेव्हा खूप दिवसांनी आठवणींतल्या पावसाला भेटल्यासारखं वाटलं!

आता हळूहळू इथला पाऊसही आवडायला लागलाय.... :) १५-२० दिवस कोरडे गेले की मीच weather.com वर चक्कर मारून बघते, पुढचा पाऊस केव्हा आहे ते! कधी दुपारी काम करता करता अचानक खिडकीच्या तावदानावर थेंबांचा आवाज ऐकू यायला लागला की, आनंदाने blinds उघडून बघतेच! कधी कधी पाऊस पडत असताना उगाचंच छ्त्री घेऊन समोरच असलेल्या Starbucks मध्ये जाऊन कॉफी घेऊन येते :) आजही पावसाची आठवण येतीये.... बरेच दिवस झाले पाउस पडून...


पाऊस किती दिवसात फिरकला नाही
पाऊस कुणाला कधीच कळला नाही
पाऊस ऋतुचे निमित्त करूनी दिसतो
पाऊस पापणीआड... कधीचा.. असतो...
- सुधीर मोघे

पावसाइतका सख्खा मित्र मला भेटलेला नाही अजून!







ही नोंद 'शब्दबंध' या मराठी ब्लॉग अभिवाचनाच्या ऑनलाईन कार्यक्रमात वाचली गेली.

Monday, November 27, 2006

पत्र लिही पण...

आज आईचं पत्र आलं! तसं फोनवर बोलतोच आम्ही बरेचदा... कधी कधी चॅट पण करतो, मेल लिहीतो एकमेकींना... पण माझ्या वाढदिवसाचं निमित्त साधून या वेळेला तिने मला पत्र लिहीलं. तिने ते post केल्याचं सांगितल्याच्या चौथ्या दिवशी मी रूममेटकडून मेलबॉक्सची चावी आणि ते चेक करायची तिच्यावर ढकललेली जबाबदारी, स्वतःकडे घेतली! :-) रोज सकाळ-संध्याकाळ उत्सुकतेने मेलबॉक्स उघडून पहात होते. आज संध्याकाळी ते पत्र हातात आल्यापासून, म्हणजे गेल्या चार तासात पाच वेळा वाचून झालंय ते... :-) आणि सोबत बहिणीने पाठवलेलं अतिशय 'senti' greeting card सुद्धा तीनदा वाचलं! असं काय असतं बरं पत्रात? - रोज तिच्याशी बोलते मी, पण आज तिचं पत्र वाचून अगदी तिला भेटल्यासारखं वाटलं! इतका आनंद झाला की सगळ्यांना ओरडून सांगावसं वाटलं... पण एकालाच सांगितलं, फोन करून. हल्ली पत्रा-बित्राचं फारसं कौतुक राहिलेलं नाही कुणाला. माझी excitement फारशी कुणाला कळेल असं वाटलं नाही.

खरंतर त्या पत्रात पुन्हा पुन्हा वाचावं असं वेगळं काहीच नाही. आईच ती - लिहून लिहून काय लिहीणार? "तब्बेतीची काळजी घे. जास्त जागरण करत जाऊ नकोस. कामाचा फार ताण घेऊ नकोस. थंडीत पुरेसे गरम कपडे घालत जा. नीट अभ्यास कर " - वगैरे typical आईछाप मजकूर आहे! :D तशी माझी आई पण अगदी साधी, रोखठोक आणि कणखर. मी इकडे यायला निघाले त्या दिवशी packing वगैरे तयारीच्या गडबडीत, गळ्याशी आलेला हुंदका तिने कळेल न कळेल असा परतवून लावल्याचं आठवतंय. आताही "एकंदरीत तू तिकडे रुळलीयेस याचं समाधान वाटतं, पण तुझी उणीवदेखिल प्रकर्षाने जाणवते" - एवढया एका वाक्यात ती मनातलं सगळं बोलून जाते... बाकी पत्रात सगळ्या वर सांगितल्याप्रमाणे आईछाप सूचना! तरीही ते पत्र चार वेळा आधाशासारखं वाचल्यानंतर पापण्या किंचीत ओलावल्याच... इतक्या दिवसांनी आईला भेटल्यावर तेवढं व्हायचंच, नाही का? :-) मी नाही बुवा तिच्याइतक्या कणखर मनाची!

इंदिरा संतांची ही सुरेख कविता आठवली आज:


पत्र लिही पण

पत्र लिही पण नको पाठवू
शाईमधुनी काजळ गहिरे
लिपीरेषांच्या जाळीमधुनी
नको पाठवू हसू लाजरे

चढण लाडकी भुवयीमधली
नको पाठवू वेलांटीतून
नको पाठवू तिळ गालीचा
पूर्णविरामाच्या बिंदूतून

नको पाठवू अक्षरातुनी
शब्दामधले अधिरे स्पंदन
कागदातुनी नको पाठवू
स्पर्शामधला कंप विलक्षण

नको पाठवू वीज सुवासिक
उलगडणारी घडीघडीतून
नको पाठवू असे कितीदा
सांगितले मी: तू हट्टी पण...

पाठविसी ते सगळे सगळे
पहिल्या ओळीमध्येच मिळते
पत्र पुढचे त्यानंतर पण
वाचायाचे राहून जाते

-इंदिरा संत ('रंगबावरी')

Friday, November 24, 2006

कश्ती का खामोश सफर है...

संध्याकाळची वेळ, गार वारा, मावळतीकडे झुकणारा सूर्य, नदीचा शांत प्रवाह, एका नावेत ते दोघेजण. त्याला तिला काहीतरी सांगायचंय, पण कसं सांगावं ते कळत नाहीये. त्याला काय सांगायचंय ते तिला चांगलंच माहित आहे, खरंतर तो बोलण्याची ती आतुरतेने वाटच बघतीये... तो प्रस्तावना करतो -

कश्ती का खामोश सफर है, शाम भी है, तनहाई भी
दूर किनारे पर बजती है लहरोंकी शहनाई भी
आज मुझे कुछ कहना है
आज मुझे कुछ कहना है

'गर्लफ्रेंड' चित्रपटातलं हे गाणं. किशोर कुमार आणि सुधा मल्होत्राच्या आवाजातलं. हे गाणं ऐकल्या ऐकल्या जाणवते ती त्यातली 'शांतता'.... अव्यक्त भावनांमुळे किंवा त्या व्यक्त करता येत नसल्यामुळे निर्माण होणारी शांतता. पण ही शांततादेखिल नादमय आहे. अंगावर शहारा आणणारा गार वारा, लाटांचा हळुवार, लयबद्ध आवाज यांची सोबत आहेच या शांततेत... पण त्याहूनही नादमय आहे ती दोघांनाही ठाऊक असलेली एकमेकांच्या मनातली खळबळ! आता फक्त ती शब्दांत व्यक्त कशी करायची, आणि कुणी आधी करायची हा प्रश्न आहे! :-) "तू आधी बोलतोयस की मीच बोलू.." हे ठरत नसल्यामुळे अव्यक्त असलेली ती नाजूक भावना! अतिशय कमी, पण सुंदर पार्श्वसंगीत आणि किशोर कुमार व सुधा मल्होत्राचे हळुवार आवाज, या सगळ्या परिस्थितीच्या काव्यमयतेला हातभार लावतात. ते दृश्य अक्षरशः डोळ्यांपुढे उभं राहतं.

त्याने प्रस्तावना तर गेली, पण त्यापुढे काही सरकत नाहीये... :-)

आज मुझे कुछ कहना है
लेकिन ये शर्मिली निगाहें मुझको इजाजत दे तो कहूं
खुद मेरी बेताब उमंगे थोडी फुरसत दे तो कहूं
आज मुझे कुछ कहना है...

त्याच्या मनात जे आहे, तेच तिच्याही मनात आहे. त्याला ते व्यक्त करता येत नाहीये, हेही तिला कळतंय. मग ती म्हणते, "Umm... let's try to help him!" ;-)

जो कुछ तुमको कहना है वो मेरेही दिलकी बात न हो
जो है मेरे ख्वाबोंकी मंजिल, उस मंजिलकी बात न हो

तिच्याकडून एवढा encouraging response मिळूनसुद्धा अजून काही याचा बोलायचा धीरच होत नाहीये... :D

कहते हुए डर-सा लगता है, कहकर बात न खो बैठूं
ये जो जरासा साथ मिला है, ये भी साथ न खो बैठूं

आता मात्र ती जरा वैतागते - बोलून टाक की रे एकदाचं! अजून किती झुरवशील मला...

कबसे तुम्हारे रस्ते पर मैं फूल बिछाए बैठी हूं
कह भी चुको जो कहना है मैं आस लगाए बैठी हूं....

आता आपल्या मनात काय आहे, हे तिला कळलंय, हे त्याला कळलंय! :-) तिच्याही मनात तेच आहे, हेही कळलंय. थोडक्यात म्हणजे, दोघांना एकमेकांची 'दिल की बात' कळली आहे. मग आता जे बोलायचंय ते तो कसं चतुरपणे टाळतो पहा:

दिलने दिलकी बात समझ ली, अब मुंहसे क्या कहना है
आज नहीं तो कल कह लेंगे, अब तो साथही रहना है!

तिला मात्र ते त्याच्या तोंडून ऐकायचंच आहे... तिच्या

कह भी चुको... कह भी चुको जो कहना है

या लाडिक आग्रहाला तो गालातल्या गालात हसून उत्तर देतो,

...छोडो अब क्या कहना है...


खरंतर हिंदी सिनेमातली किती stereotypical, 'filmi' situation आहे ही. पण याला वेगळेपणा, अधिक मोहकपणा आणतात साहिर लुधियान्वीचे साधे, सोपे पण नेमके शब्द... आणि त्यांची सहज मांडणी. नेहमीच्या अंतरा-मुखडा pattern पेक्षा जरा वेगळी. सोपे आहेत, म्हणूनच ते शब्द जास्त भावतात, appeal होतात. दोघांमधला खराखुरा संवादच ऐकतोय असं वाटतं हे गाणं ऐकताना. साहिर सोडून दुसरा कुठला कवी या situation ला इतक्या मोहक पद्धतीने मांडू शकला असता असं वाटत नाही. ऐकल्यानंतर बराच वेळ लाटांचा लयबद्ध आवाज कानात घुमत राहतो... आणि गार वारा केसांतून फिरल्यासारखं वाटत राहतं!