Saturday, July 31, 2010

मावसबोलीतल्या कविता

मला मराठी सोडून हिंदी आणि इंग्रजी या दोनच भाषा येतात. पण मावसबोलीतल्या कवितेचा अनुवाद करायला मंदारकडून खो मिळाल्यावर, हिंदी किंवा इंग्रजी कवितेचा अनुवाद करावासा वाटेना. सर्वच मराठी ब्लॉग वाचक मंडळींना हिंदी आणि इंग्रजी दोन्ही येत असताना, त्यांना आपला बिचारा अनुवाद कशाला वाचायला लावावा? या तिन्ही सोडून सगळ्यात जवळची वाटणारी, आणि या तिन्हीहून किंचीत जास्तच आवडणारी भाषा म्हणजे बंगाली. गैरसमज नसावा -- मला बंगाली येत नाही. बंगाली सिनेमे सबटायटल्सशिवाय पाहूनही बऱ्यापैकी कळतात एवढंच काय ते बंगालीमधलं क्वालिफिकेशन. पण या रोशोगोल्ल्या इतक्याच गोड भाषेतील गोड गोड शब्द कानावर येताच त्यांची मोहिनी पडते. "आमी इकटु इकटु बांगला जानी" असं म्हणताना सुद्धा जिभेला गुदगुल्या झाल्यासारखं होतं :)

दोन वर्षांपूर्वी आंतरजालावर प्रचंड गाजलेला, 'Where the hell is Matt' हा व्हिडीओ बघताना त्यातल्या पार्श्वसंगीतातील बंगाली शब्दांनी लक्ष वेधून घेतलं होत. त्या ओळी रवींद्रनाथ ठाकुरांच्या 'गीतांजली'तील 'प्राण' नावाच्या कवितेतून घेतल्या आहेत असं वाचण्यात आलं. ती मूळ कविता शोधताना, ठाकुरांच्याच दुसऱ्या एका काव्यसंग्रहातील दुसरीच एक 'प्राण' नावाची कविता सापडली. तीही खूप आवडली म्हणून लिहून ठेवली होती. बंगालीतील मूळ कविता (देवनागरीत) आणि त्याखाली मी केलेला (अर्थातच स्वैर!) अनुवाद देत आहे. भाषाही धड येत नसताना आणि छंद-वृत्त वगैरेच्या बाबतीत एकंदरीतच अंधार असताना, थेट 'गुरूदेवां'च्या काव्याला हात लावण्याची खोडी केल्याबद्दल माफी असावी. किंवा मला भाग पाडणाऱ्या ब्लॉगर मित्र-मैत्रीणींना दोष द्यावा :D

------

प्राण
(कॉबीगुरू रॉबिंद्रनाथ ठाकुर)

मॉरिते चाही ना आमी शुंदॉर भुबॉने
मानाबेर माझे आमी बांचीबारे चाई ।
एइ शूर्जोकारे एइ पुष्पितो कानॉने
जिबोंतो हृदय माझे जदि स्थान पाई ।
धॉराय प्राणेर खॅला चिरोतोरोंगितो,
बिरोहो मिलॉन कॉतो हाशी-अस्रुमॉय-
मानाबेर सुखे दुःखे गांथियाँ शोंगीत
जदि गो रॉचिते पॉरी ऑमोर ऑलोय!
ता जदि ना पॉरी, तॉबे बांची जॉतो काल
तोमादेरी माझखाने लॉभी जॉनो ठाईं,
तोमरा तुलिबे बोले शॉकाल बिकाल
नाबो नाबो शोंगितेर कुशुम फुटाई ।
हाशिमुखे नियो फूल तॉर पॉरे हाय
फेले दियो फूल, जदि शे फूल शुकाय ॥

- कोडी ओ कॉमोल: संचयिता


------

प्राण
(स्वैर अनुवाद)

मरून जायचे नाही या सुंदर विश्वातुनी
माणसांतच मला राहायचे ।
रवीकिरणी, पुष्पवनी, हृदयातुनी -
एखाद्या, स्थान मिळेल का ते पहायचे ।
भूतलावर चैतन्याचा चिरंतन हा खेळ,
हास्य कधी, कधी अश्रु; विरह आणि मीलन -
तान गुंफुनी मनुजाच्या सुख-दुःखाची
बांधीन त्या संगीताचे मी चिरायु सदन!
हे नाही जमले तरी जगू द्या
तुमच्यातच, जोवर जगतो आहे,
ही गीत सुमने खुडुनी घ्या
निशीदिनी जोवर फुलतो आहे
बहरेन मी अनावर अन जाईन जेव्हा सुकुनी ।
हासत स्वीकारा मज, अन द्या मग उधळुनी ॥


------

याच खेळामध्ये रवींद्रनाथांच्या अजून एका प्रसिद्ध कवितेचा नंदन नी केलेला अनुवाद इथे वाचा.

केवळ खेळ पुढे चालू रहावा आणि अजून वेगवेगळ्या कविता वाचायला मिळाव्यात, म्हणून मी यात सहभागी झाले. आपण अनुवाद लिहीता नुसताच पुढच्यालाखोदेण्याचा पर्याय असता, तर मी केव्हाच हात वर कळून मोकळी झाले असते! पण ते असो.

प्रसादच्या ब्लॉगवर रवींद्रनाथांच्या कवितेविषयी वरचेवर वाचले आहे.

The Champa Flower (अनुवाद)

उशीर

माझा 'खो' प्रसादला.


Wednesday, October 28, 2009

"This is Alabama Football"

गेल्या शनिवारची संध्याकाळ. Alabama 'Crimson Tide' ह्या आमच्या फुटबॉल टीमचा कट्टर rival 'Tennessee Volunteers' विरूद्ध गेम! जगातल्या सगळ्यात मोठ्या स्टेडियम्सपैकी एक असणाऱ्या 'Bryant Denny Stadium' या आमच्या होम स्टेडियममध्ये. गेम संपायला clock वर केवळ चार सेकंद उरले आहेत. Alabama 12, Tennessee 10 असा स्कोअर. पण बॉल टेनेसीकडे... आणि ते किक करून फील्ड गोल करायच्या तयारीत. फील्ड गोल झाला तर त्यांना ३ पॉईंट्स मिळून ते १२-१३ असा गेम जिंकणार. त्यांना थोपवण्याचा एकमेव मार्ग म्हणजे तो फील्ड गोल अडवणे!!

स्टेडियम नेहमीप्रमाणे खचाखच भरले आहे. इतका वेळ 'Go Defense', 'Go Bama', 'Get 'im defense', 'Roll Tide' अशा आरोळ्या देऊन आरडाओरडा करून स्टेडियम डोक्यावर घेणारे ९६,००० फॅन्स आता श्वास रोखून बघत आहेत. बॅंडही वाजायचा थांबला आहे. गेल्या वर्षी क्रिम्जन टाईडचा १२-० असा undefeated season फ्लॉरिडाविरूद्ध SEC championship game मध्ये संपुष्टात आला होता. आजवर १२ वेळा National Championship पटकावणाऱ्या क्रिम्जन टाईडच्या पदरी १९९२ नंतर मात्र हा चषक कधीच आला नाही. गेल्यावर्षी याच्या अगदी जवळ जाऊन पराभव पत्करावा लागला होता. १९९२ पासून उराशी बाळगलेलं हे स्वप्न या वर्षी तरी पूर्ण होईल का? क्रिम्जन रंग परिधान केलेला प्रत्येक फॅन याच काळजीत! या वर्षी आतापर्यंत ७-० अशी विजयी मोहीम चालू आहे, तिला आता टेनेसीने धोक्यात आणलंय का? "देवा, championship वगैरे पुढचं पुढे बघू, पण हा गेम आम्हाला जिंकू दे! पराभव आणि तोही Vols कडून? नाही, शक्यच नाही!" टेनेसी-अलाबॅमा rivalry किती कट्टर याची तिऱ्हाईताला कल्पना येणार नाही.

टेनेसी Vols किक करण्याच्या तयारीत...सगळे श्वास रोखून बघतायत... चार सेकंद, फक्त चार सेकंदात निर्णय होणार! हे टेन्शन सहन न होऊन मी कानावर हात ठेवेते आणि डोळे घट्ट मिटून घेते. काही क्षणांनी मोठ्या आरोळया आणि बॅंडचा आवाज ऐकू येऊन मी डोळे उघडते तर समोर फील्डवर अलाबॅमाचा मोठ्ठा झेंडा फडकत असतो, आणि सगळीकडे एकच जल्लोष असतो :) अंगावर सर्रकन काटा येतो! We made it! आम्ही फील्ड गोल अडवला... त्यांना हरवलं, आम्ही जिंकलो!!! मोठ्याने आरोळी मारताना डोळ्यांत पाणी तरळल्याशिवाय राहत नाही. आईशप्पथ, एका वेळी इतक्या अनोळखी लोकांना मी याआधी कधी इतक्या टाळ्या दिल्या नसतील, मिठया मारल्या नसतील! मग "Hey Vols... we just beat the hell outta you!" असं त्यांना ओरडून सांगणं होतं. आता घरी जाऊन साडेतीनशे पौंड वजनाच्या आणि साडेसहा फूट उंचीच्या आडदांड defensive tackle टेरेन्स कोडीने शेवटच्या चार सेकंदात अडवलेल्या त्या विजयी फील्ड गोलचे रीप्ले पुन्हा पुन्हा बघणं आलं! चार तास सलग उभं राहून दुखणारे पाय आणि स्टेडियममध्ये आरडाओरडा करून बसलेला घसा यांची पर्वा न करता!

टेरेन्स कोडी (नं ६२) ने अडवलेला विजयी फील्ड गोल
छायाचित्र: जॉन चार्ल्स ऍकर, अलाबॅमा



तीन वर्षांपूर्वी University of Alabama मध्ये admission घेऊन मी या गावात आले, तेव्हा कॅम्पसवरील सर्वांत पहिल्यांदा नजरेत भरलेली वास्तू म्हणजे इथलं भलं मोठं फुटबॉल स्टेडीयम. फुटबॉल या खेळाबद्दल इथले लोक अगदी 'क्रेझी' आहेत हे त्यांच्या बोलण्यातून कळत होतं, पण केवळ विद्यापीठाच्या स्तरावर खेळल्या जाणाऱ्या या खेळाकरता आपल्या इडन गार्डनपेक्षाही मोठं, अवाढव्य स्टेडीयम कशाला, हे माझ्या लक्षात येत नव्हतं. या देशात सगळं जरा 'अति'च असतं असं म्हणून मी सोडून दिलं, पण तोवर 'कॉलेज फुटबॉल' हे काय प्रकरण असतं याची मला पुसटशीही कल्पना नव्हती. मी इथे नवीन. कंटाळले, घरची आठवण आली की, "एकदा फुटबॉल सीझन सुरू होऊ दे गं, मग इथे खरी मजा असते. You will enjoy like never before!" असं इतर 'सिनीयर' मित्रमैत्रीणी म्हणायचे. मी ते मनावर घ्यायचे नाही, पण इतकी हाईप ऐकून या 'हाताने खेळल्या जाणाऱ्या फुटबॉल' बद्दल मला उत्सुकता नक्कीच निर्माण झाली.

एकदा एका मित्राच्या घरी टीव्हीवर मागच्या वर्षीचा कुठलातरी गेम बघण्यात आला, आणि काहीसा धक्काच बसला. इतका रानटी, आघोरी प्रकार मी यापूर्वी पाहिला नव्हता. मोठाले आडदांड खेळाडू हिसकाहिसकी करतात... मग बदाबदा एकमेकांच्या अंगावर पडतात, मध्येच उठून धावायला लागतात.... या सगळ्यात तो लांबुळका चेंडू कुठे गेला ते तर दिसतच नाही! मध्येच केव्हातरी तो चेंडू समोर ठेवून त्याला लाथ मारतात आणि ते पाहून बघणारे लोक एकतर प्रचंड आनंदाने चित्कारतात किंवा शिवीगाळ करतात... प्रथमदर्शनी काही कळलं तर नाहीच, पण हा आघोरी खेळ पाहून माझा काहीसा भ्रमनिरास झाला. मला क्रिकेटसारखा 'जंटलमॅन्स गेम' बघण्याची सवय. सॉकर म्हणजे अमेरिका सोडून इतरत्र ज्याला ’फुटबॉल’ म्हणतात तोही कधी फारसा बघितला नाही. त्यामानाने बेसबॉल आपल्याला आवडेल कदाचित, पण हे अमेरिकन फुटबॉल प्रकरण आपल्याला झेपेल असं वाटलं नाही!

मग जसा जसा फुटबॉल सीझन जवळ येऊ लागला, तशी आमच्या या पिटुकल्या शहराने बघता बघता कात टाकली. 'क्रिम्जन टाईड' या इथल्या टीमच्या 'क्रिम्जन' अर्थात लालचुटूक रंगात आख्खं शहर रंगून गेलं. 'क्रिमज्न टाईड' चे झेंडे, फलक, कपडे, दागदागिने, टॉवेल्स, कप्स अशा विविध वस्तू, इतकंच काय केक्स, कुकीज अशा मिठायाही सर्वत्र दिसू लागल्या. सगळ्यांमध्ये काहीतरी वेगळा उत्साह, वेगळा आनंद दिसू लागला. बीयर, बार्बेक्यू वगैरेसहित टेलगेट पार्ट्यांना उधाण येऊ लागलं. खेळ कसाही असू दे, पण आमच्या एरवी अगदी थंड, academic वातावरण असलेल्या slow paced शहराला असं जीवदान दिल्याबद्दल तरी मला हा खेळ आवडू लागला. तुम्ही 'बॅमा' मध्ये असाल तर क्रिम्जन टाईडचे गेम न बघणे हा ऑप्शन तुम्हाला नसतो, हे माझ्या लवकरच लक्षात आलं. शनिवारी संध्याकाळी सगळे उद्योग सोडून मीही इतरांबरोबर टीव्हीसमोर बसून गेम बघू लागले. "Fumble म्हणजे काय?", "आता बॉल त्यांच्याकडे कसा गेला?", "आता त्यांनी किक का केलं?" वगैरे माझ्या बाळबोध प्रश्नांना मित्रमंडळींनी शक्य तितक्या पेशन्टली उत्तरं दिली आणि माझं 'Football 101' ट्रेनिंग पार पाडलं. मलाही या खेळातलं थोडं थोडं कळू लागलं. त्यातून माझे मास्तरही कट्टर टाईड फॅन. मी इथे नवीन आहे म्हणून त्यांनी मला तीन गोष्टी लक्षात ठेवायला सांगितल्या: 1. You hate Tennessee 2. You hate Auburn 3. Say "Roll Tide!"

मास्तर, इतर मित्रमैत्रीणी, थोडंफार वाचन यातून मला बॅमाच्या football legacy ची कल्पना आली. आतापर्यंत मिळवलेल्या SEC championships, National championships, Paul 'Bear' Bryant हे legendary coach आणि या सगळ्या बद्दल Bama Nation ला असणारा प्रचंड अभिमान आणि आपुलकी यातून माझं 'Bama fan 101' पण झालं आणि मीही बघता बघता क्रिम्जन टाईडची फॅन होऊन गेले! आपल्या प्रत्येक गेमची सुरूवात "This is Alabama Football" अशा introduction नी करणारी Crimson Tide माझीही होम टीम झाली!


ब्रायंट-डेनी स्टेडियम आतून: विकीमिडीया कॉमन्स

कोण कुठला हा आघोरी खेळ फुटबॉल, आणि कुठली क्रिम्जन टाईड? या 'परकीय' खेळाबद्दल माझ्यात एवढं passion कुठून आलं? या क्रिम्जन टाईडबद्दल एवढी आपुलकी, एवढी ओढ कुठून आली? कशी आली? कदाचित या परक्या देशात, परक्या माणसांत मला एक feeling of belongingness, त्यातून येणारी भावनिक सुरक्षितता त्यांनी दिली म्हणून. इथल्या माणसांशी, त्यांच्या भावनांशी, त्यांच्या मानबिंदुशी स्वतःला जोडण्याकरता एक दुवा दिला म्हणून. अलाबॅमा फुटबॉल नसता तर इथल्या थंडीत गारठलेले कित्येक वीकेन्ड्स मी घरच्या आठवणीने रडण्यात घालवले असते. बारा-बारा तास काम करूनही प्रॉजेक्ट यशस्वी न झाल्याने आलेल्या नैराश्याने, एकटेपणाने खचून गेले असते. इथे इतके मित्र मैत्रीणी जोडण्याची, त्यांच्याशी गप्पागोष्टी करण्याची संधी मला मिळाली नसती.

टाईडने टेनेसीवर विजय मिळवला आणि आणि ८-० अशी विजयी मालिका कायम ठेवली. अजून या सीझनचे काही टफ गेम्स बाकी आहेत. पण सात आठ वर्षांच्या low spell नंतर गेल्या वर्षीपासून पुन्हा उसळून आलेल्या टाईडसाठी सगळ्या फॅन्सचं एकच स्वप्न आहे -- National Championship! ते यंदा पूर्ण होईल किंवा होणार नाही, but the Tide is certainly on a Roll! Nick Saban या कर्तृत्ववान कोचच्या कुशल नेतृत्वाखाली क्रिम्जन टाईड आपल्या लाखो फॅन्सचं हे स्वप्न लवकरंच पूर्ण करेल अशी मला आशा नाही, खात्री आहे! :)

Roll Tide Roll!

अलाबॅमा डीफेन्स
छायाचित्र: जॉन चार्ल्स ऍकर, अलाबॅमा



--------------
*क्रिम्जन टाईडचा लोगो विकीपीडीयाच्या सहाय्याने चिकटवला आहे.
*ज्या फोटोखाली कुणाला श्रेय दिलेले नाही तो (वाकडा!) फोटो मी स्वत: काढलेला आहे.

Monday, August 25, 2008

आवडलेले थोडे काही

संवेदनी सुरु केलेला कवितांचा खो-खो सुमेधामार्फत माझ्यापर्यंत आलाय. नेहमीप्रमाणे वरातीमगून घोडं नको म्हणून म्हटलं या वेळेला खो मिळाल्या मिळाल्या लगेच राज्य घेऊयात!


या खेळाचे संवेदने ठरवलेले नियम इथे परत देते आहे:

१. कविता आवडते पण पुर्ण आठवत नाही आणि हाताशी पुस्तकही नाही? हरकत नाही, आठवतं तेव्हढं लिहा. कवीचं नाव मात्र आवश्य लिहा
२. एक से मेरा क्या होगा सिन्ड्रोम? या वेळी तुम्ही तुमच्या सध्या आवडणारया टॉप २ कविता लिहु शकता आणि कवितांच्या प्रमाणात खो देखील देऊ शकता. जेव्हढ्या कविता तेव्हढे खो (जास्तीजास्त अर्थात २)
३. खो खो नीट चालवण्याची जबाबदारी अर्थात सारयांचीच. त्यामुळे तुमच्या पोस्ट मधे तुम्ही ज्या/जिला खो देताय, त्या/तीचं नाव तर लिहाच, शिवाय त्या/तिच्या ब्लॉगवर ही खो दिल्याची नोंद आवश्य करा
४. कविता का आवडली किंवा कवितेचा अर्थ किंवा काहीच स्पष्टीकरण आपेक्षित नाही
५. अजून नियम नाहीत :)

---

इथे खरंतर ’दो से मेरा क्या होगा?’ झालंय माझं. पण सध्या गडबड इतकी आहे की टायपायला वेळ नाही म्हणून त्यातल्या त्यात छोट्या कविता निवडायचा मोह झाला होता. असो.



१. मरवा

पुस्तकातील खूण कराया
दिले एकदा पीस पांढरे;
पिसाहुनी सुकुमार काहीसे
देता घेता त्यात थरारे

मेजावरचे वजन छानसे
म्हणुन दिला नाजुक शिंपला;
देता घेता उमटे काही,
मिना तयाचा त्यावर जडला

असेच काही द्यावे... घ्यावे...
दिला एकदा ताजा मरवा
देता घेता त्यात मिसळला
गंध मनातील त्याहुन हिरवा.

- इंदिरा संत (’मेन्दी’)




२. स्वप्नाची समाप्ती

स्नेहहीन ज्योतीपरी
मंद होई शुक्रतारा
काळ्या मेघखंडास त्या
किनारती निळ्या धारा

स्वप्नासम एक एक
तारा विरे आकाशात
खिरे रात्र कणकण
प्रकाशाच्या सागरात

काढ सखे, ग्ळ्यातील
तुझे चांदण्याचे हात
क्षितीजाच्या पलिकडे
उभे दिवसाचे दूत

रातपाखरांचा आर्त
नाद नच कानी पडे
संपवुनी भावगीत
झोपलेले रातकिडे

पहाटेचे गार वारे
चोरट्याने जगावर
येती, पाय वाजतात
वाळलेल्या पानांवर

शांति आणि विषण्ण्ता
दाटलेली दिशांतुन
गजबज जगवील
जग घटकेने दोन!

जमू लागलेले दव
गवताच्या पातीवर
भासते भू तारकांच्या
आसवांनी ओलसर

काढ सखे, ग्ळ्यातील
तुझे चांदण्याचे हात
क्षितीजाच्या पलिकडे
उभे दिवसाचे दूत

प्राजक्ताच्या पावलाशी
पडे दूर पुष्परास
वाऱ्यावर वाहती हे
त्यचे दाटलेले श्वास

ध्येय, प्रेम, आशा यांची
होतसे का कधी पूर्ती
वेड्यापरी पूजतो या
आम्ही भंगणाऱ्या मूर्ती!

खळ्यामध्ये बांधलेले
बैल होवोनिया जागे
गळ्यातील घुंगुरांचा
नाद कानी येऊ लागे

आकृतींना दूरच्या त्या
येऊ लागे रूपरंग
हालचाल कुजबूज
होऊ लागे जागोजाग

काढ सखे, ग्ळ्यातील
तुझे चांदण्याचे हात
क्षितीजाच्या पलिकडे
उभे दिवसाचे दूत

होते म्हणू स्वप्न एक
एक रात्र पाहिलेले
होते म्हणू वेड एक
एक रात्र राहिलेले

प्रकाशाच्या पावलांची
चाहूल ये कानावर
ध्वज त्याचे कनकाचे
लागतील गडावर

ओततील आग जगी
दूत त्याचे लक्षावधी
उजेडात दिसू वेडे
आणि ठरू अपराधी

- कुसुमाग्रज (’विशाखा’)

---

माझा खो गिरीराज आणि परागला.

Friday, June 13, 2008

ऋतुरास

गायत्रीची वसंत ऋतूची वाट बघणारी ही पोस्ट आली, तेव्हा माझ्या इथे वसंत नुकताच येऊन 'रंग दाखवायला' लागलेला! पाच-सहा महिने कडाक्याची थंडी आणि उजाड निसर्ग पाहून आमच्या पिटुकल्या शहराचा 'थंडावलेला' उत्साह पुन्हा उसळू लागला होता. आख्ख्या गावाचा कायापालट की काय म्हणतात तसा होऊ घातला होता! गायत्रीसारखा 'माय सरस्वती' चा वरदहस्त आमच्या मस्तकावर नाही, :) म्हणून कविता नाही तरी गेला बाजार दोन-चार फोटो तरी नक्की टाकूयात या वर्षी, असं मनाशी ठरवलं. गेल्या वर्षीदेखिल स्प्रिंगमध्ये हौसेने काढलेले फुलांचे फोटो केवळ आळस आणि टाळाटाळ याच कारणांमुळे इथे टाकयचे राहून गेले होते. यंदाही वसंत ऋतूचा उल्लेख करायला उन्हाळा उजाडलाय!

ऊन हळुहळू तापायला लागलं असलं तरी वसंतात बहरलेली झाडं-झुडपं मात्र अजूनही बहर टिकवून आहेत! सात-आठ महिने फुलांशिवाय काढतात ही झाडं, आणि चार-पाच महिने तर एकही पान असल्याशिवाय! आणि मग मार्चच्या अखेरीस वसंताच्या आगमनाची वर्दी देत जीवाच्या कराराने बहरतात. सगळ्या निसर्गाचा रंग-गंध पालटून टाकतात! डॅफोडिल, चेरी, मॅग्नोलिया, ब्रॅडफर्ड पेअर, फॉर्सिथिया, रोडोडेंड्रॉन, डॉगवूड, ट्युलिप्स, गुलाब... आणि त्यांच्या अवतीभवती करणारे असंख्य विविधरंगी पक्षी आणि फुलपाखरं! सगळा कॅम्पस कसा नटून जातो! हिवाळ्यात उदासवाणं दिसणारं Quad गजबजून जातं... Frisbee खेळायला, सायकल चालवायला आलेली मुलं, बाळांना stroller मधून फिरवणाऱ्या आया, ऊन खात पुस्तक वाचत बसलेले विद्यार्थी -- निसर्गाच्या फुलायच्या उर्मीमुळे जणू सगळ्यांमध्ये नवा उत्साह संचारतो.


उन्हाळयात इथे आठ-साडेआठ पर्यंत लख्ख उजेड असतो. अशी मोठ्ठी संध्याकाळ मिळाली की ठरवलेल्या (आणि न ठरवलेल्याही) किती गोष्टी करायला मिळतात, नाही? संध्याकाळी साडेपाच-सहा पर्यंत सगळी कामं उरकून घरी यावं, पोटापाण्याची सोय करून मग पब्लिक लायब्ररीतून आणलेले वुडहाऊस किंवा सॉमरसेट मॉम, किंवा घरून येताना आणलेला 'लंपन' वाचत संध्याकाळची हवा खात पॅटियोमध्ये पाय पसरून निवांत बसावं; किंवा संध्याकाळी पडणाऱ्या रिपरिप पावसात वळणावळणाच्या रस्त्यांवरून लांब ड्राईव्हला जावं, ऊन पावसाचा खेळ बघून 'श्रावणमासी, हर्ष मानसी' (शाळेत म्हणायचो त्याच चालीत) मोठ्यांदा म्हणावी आणि ती अजून तोंडपाठ आहे म्हणून सुखावून जावं, येताना वाटेत थांबून वाफाळती कॉफी घ्यावी, घरी येऊन 'रोमन हॉलिडे' किंवा 'साऊंड ऑफ म्युझिक' किंवा असाच कुठला तरी गोंडस सिनेमा अकराव्यांदा बघावा आणि तृप्त मनाने झोपी जावं...
उन्हाळातल्या अशा सुरेख संध्याकाळचा रंग मनावर हलकेच उमटावा....


Monday, April 14, 2008

मागे ठेवलेलं आयुष्य...

Disclaimer: विषय तसा cliched आहे. या विषयावर मीही बरंच वाचलंय खूप ठिकाणी. पण मी पहिल्यांदा अनुभवलं, तेव्हा कळलं हा impact किती hard-hitting असतो ते! अनुभव घेतल्यानंतर शब्दांत उतरायलादेखिल मध्ये बराच काळ जावा लागला. पण लिहील्याशिवाय स्वस्थ बसवलंही नाही. थोडक्यात, वाचताना कंटाळा येण्याची शक्यता आहे, तेव्हा... स्वतःच्या जबाबदारीवर वाचावं! :)

*************

सकाळी... हो, सकाळ झालीच असावी... कारण अर्धवट झोपेतही मला माझ्या पलंगाशेजारच्या किलकिल्या खिडकीतून सकाळच्या fresh, crisp हवेचा ओळखीचा वास आला आणि त्याहूनही ओळखीचा, आवडीचा पक्ष्यांचा किलबिलाटही ऐकू आला. तर सकाळी अर्धवट जाग येऊनही मी तशीच डोळे न उघडता पडून राहिले. तो वास श्वासांत भरभरून घेत, पक्ष्यांचा आवाज कानभरून ऐकत. पांघरूण आणिक थोडं घट्ट ओढून घेतलं. थोड्यावेळाने स्वयंपाकघरातून ('किचन'मधून नव्हे) येणारा मेथीच्या भाजीचा खमंग दरवळ त्यात मिसळला आणि जरा कानोसा घेतला तर स्वयंपाकघरात आईची लगबगही अस्प्ष्ट ऐकू आली. रेडिओही चालू होता. नेहमीप्रमाणेच.

"आकाशवाणी, पुणे. भालचंद्र जोशी प्रादेशिक बातम्या देत आहेत."

सात पाच झाले - माझ्या चटकन लक्षात आलं! आठवतं तेव्हापासून सकाळी रेडिओवरून वेळ सांगायची जुनी सवय आमच्या घरात सगळ्यांची! रेडिओतून मंगला कवठेकरांचं किंवा बलदेवान्दसागरांचं 'इति वार्ता: ' ऐकू आलं की, "पियूऽऽऽ संस्कृत बातम्यासुद्धा संपल्या. अजून अंघोळीला गेली नाहीस का? काय शाळा बुडवायचा विचार आहे का आज?" - हे पपांचं परिचयाचं वाक्य पाठोपाठ यायचंच. हे सगळं आठवून गालातल्या गालात हसू आलं आणि शेवटी उठून अंथरूणातच बसून राहिले. खिडकी उघडून बाहेर पाहिलं तर मागच्या कंपाऊंडच्या भिंतीवर तोच ओळखीचा भारद्वाज होता. लहानपणी सकाळी दात घासता घासता खिडकीतून या "तपकिरी कोट घातलेल्या कावळ्या" कडे बघताना कितीदातरी आवरायला उशीर झाला होता! "सगळं तस्संच आहे की... " मला वाटून गेलं. मग लगेच लक्षात आलं... दीडच तर वर्षं झालंय. आपण काय असे वर्षानुवर्षांनी घरी परत आल्यासारखं करतोय!

दिवसभराच्या 'अजेंडा' ची मनातल्या मनात उजळणी केली. आईला आज दुपारी वालपापडीची भाजी करायला सांगूयात - आपल्याला तिकडे खायला मिळत नाही. का आपणच करावी? तेवढाच तिला आराम. एरवी कोण करून घालणार तिला तरी? आणि संध्याकाळी वरणफळं... ती मात्र तिच्याच हातची. आपण कितीही केली तरी चिंचगुळाची आमटी काही तिच्यासारखी होत नाही! दुपारी गावातल्या गणपतीला जायचंय. वाड्यातल्या सुद्धा. आमचं चिंचवड म्हणजे मोरया गोसावींचं देवस्थान. पवनेच्या काठी. काळ्या कातळातलं पेशवेकालीन मंदीर आहे. पण आता रंगीबेरंगी ऑईल पेंट फासल्याने पार रया गेलीये त्याची. नदीच्या घाटावरही संध्याकाळी बसून राहयला फार रम्य वगैरे वाटायचं. आता पाणी खूप खराब झालंय. वाडा मात्र अजून तसाच असावा. शांत, प्रसन्न. पण या वेळी गेले तर वाड्यापाठीमागची जुनी वेदपाठशाळा पाडून तिथं काँक्रीटचं बांधकाम चालू होतं. बकुळीचं झाड अजून तसंच होतं, पण पूर्वीसारखा बकुळीच्या फुलांचा सडा नव्हता झाडाखाली. थोडं चुकल्याचुकल्यासारखं झालं. रविवारी संध्याकाळी इथे गाणं असतं. आता दोन-चार दिवसात वार्षिक उत्सवही चालू होणार होता. तेव्हा तर बहारच असते गायन-वादनाची. पण नकोच तेव्हा रात्रीचं गर्दीत. इथे असं सगळं शांत असतानाच बरं वाटतं. मग एक दिवस घरी गौरीताईचं गाणं ठेवलं... आणि शिंदे सरांचं. गौरीताई 'शामकल्याण' गायली. तिचं 'सोऽहमहर डमरू बाजे' मला खूप आवडतं. सरांचं 'धीर धरी, धीर धरी, जागृत गिरीधारी'. घरी खूप लोक आले गाणं ऐकायला. आमचा हॉल गच्चं भरून गेला. खूप छान झालं दोघांचंही गाणं. रात्री सगळे गेल्यावर काका-काकू, आत्या वगैरे घरातल्या मंडळींसाठी आईने पिठलं-भाकरी, मुगाची खिचडी असा पटकन स्वयंपाक केला. खूप दिवसांनी खूप गप्पा मारल्या सगळ्यांशी. भावंडांबरोबर दम लागेस्तोवर दंगा केला. छोट्या भाचीला पाठीवर 'साखरेचं पोतं' करून घरभर हिंडवलं. तिला थोडा आगाऊपणा शिकवला. माझी भाची शोभायला नको? :)

"श्रेया कशी आहे?"
"हुताऽऽऽल!" (हुशार!)

आईने केलेली भाजी खाल्ल्यावर आईला 'थम्स अप' करून म्हणायचं, "गुज्जॉब!" (Good Job!) :p

छोटी आत्या घरात शॉर्ट्स घालून बसली असेल तर तिला चिडवायचं, "हाप तद्दी...!" (हाफ चड्डी!) आणि वर खि खि करून हसायचं!

नवीन गाणं पण शिकवलं...

"या वऱ्याच्या बसुनी विमनी सहल करूया गगनाची,
चला मुलांने आज पाहूया शाळा चांदोबा गुरूजींची..." :-)

पटकन शिकली पोरगी. अगदी माझी भाची शोभते!

एक दिवस सकाळी बहिणीबरोबर दुर्गा टेकडीवर फिरायला गेले. त्या टेकडीची तर पार सारसबाग करून टाकलीये! उंच उंच झाडं तोडून छोटी छोटी झुडुपं काय, कारंजी काय, काँक्रीटच्या पेव्हमेंट्स काय... असो. बदल होतच राहणार. कुरकुर करण्यात काही अर्थ नाही. नेहमीच्या ठिकाणी भेळ, पावभाजी, वडापाव, दाबेली वगैरे खाण्याचे कार्यक्रम कधी बहिण, तर कधी मित्रमैत्रीणींबरोबर पार पडले. रस्त्याच्या कडेला विकत मिळणारा तिखट-मीठ लावलेला, अर्धवट पिकलेला पेरूही खाल्ला. उसाच्या रसाची खूऽऽप आठवण आली, पण डिसेंबरात कुठून आणणार उसाचा रस? :-( मित्रमैत्रीणी कधी सुट्टी/रजा/हाफ डे घेऊन भेटायला यायचे. दोघेजण तर मुंबईहून आले. ज्यांना जमलं नाही त्यांनी आठवणीने पुन्हा पुन्हा फोन केले. खूप बरं वाटलं. मोबाईल फोनची पण काय चंगळ असते ना इथे. एखादा जुना handset बघा, दीडशे रुपयांत सिम विकत घ्या ("तो आपला कोपऱ्यावरचा दुकानदार तुला हवा तो नंबर पण देईल" - हमारे 'खास आदमी' ! ), जेवढा वापराल तेवढ्याचे पैसे भरा आणि वापरून झाला की बंद करून टाका. US मध्ये नवीन फोन घेऊन बघा! ऍक्टीवेशनचे $36, कमीतकमी एका वर्षांचं कॉन्ट्रॅक्ट, महिन्याला $50 चं बिल... शिवाय तुम्ही इतर कुठला फोन वापरू शकणार नाही याची खबरदारी फोन कंपनीनी घेतलेली असते. हे सारं तुमच्या सोशल सिक्युरिटी, क्रेडिट हिस्टरी वरून पन्नास वेळा कटकट केल्यानंतर. पण ते असो. रंजन-मेघनाशी फोन झाल्यावर भारतातून काय आणू विचारलं तर म्हणे, "लिमलेट्च्या गोळ्या आण!" कपाळ माझं! तिकडे बसून लहानपणीच्या आठवणीने नॉस्टॅल्जीक व्हायचं आणि असलं काय काय आठवायचं! यांना वाटतं भारतात अजून पोरं सोरं लिमलेट्च्या गोळ्याच खातात. इथे दुकानांमधून लिमलेट्च्या गोळ्या शोधता शोधाता माझ्या काय नाके नऊ आलं, आणि प्रत्येक दुकानात दुकानदाराने आणि इतर गिऱ्हाईकांनी माझ्याकडे "काय ध्यान आहे" अशा नजरेनं कितीदा पाहिलं, ते मलाच माहित! पण तेही असो.

मग अधून मधून 'पुण्यात जायचा' कार्यक्रम व्हायचा. चिंचवडला राहणाऱ्यांना '३६' किंवा '१२२' ने पुण्यात जाणं, हा किती मोठा कार्यक्रम असतो ते विचारा! ...तीच गर्दी... पण मला अजूनही धावत जाऊन खिडकीची जागा पकडता येते. १२ वर्षं धक्के खाऊन कमावलेलं कौशल्य असं अमेरिकेला येऊन दीड वर्षात नाहीसं होईल? लक्ष्मी रोड, कुमठेकर रोड वरची नेहमीची खरेदी, 'सुजाता मस्तानी', 'जनसेवा' मधला अस्सल खरवस, एका दुपारी 'निसर्ग'मध्ये खाल्लेला सुरमई मासा (शिवाय सोलकढी!), 'Marz-O-Rin' चं सँडविच, 'रसिक साहित्य', 'पाथफाईंडर', तांबड्या जोगेश्वरीच्या बोळातला सीडीवाला, 'मंगला'त आईबरोबर पाहिलेला मराठी सिनेमा. (नाही आवडला! सोनाली कुलकर्णी पण हल्ली (अमृता सुभाषसारखी) प्रचंड ओव्हरऍक्टींग करायला लागलीये!). दिवसभर भटकून दमून घरी यायचं, आईच्या हातचं गरम गरम जेवायचं - ज्वारीची भाकरी, एखादी भाजी, मुगाची खिचडी आणि दाण्याची चटणी! मग पुन्हा 'विविध भारती' ऐकत बिछान्यावर पडायचं. 'छायागीत', 'आप की फर्माईश', 'बेला के फूल' (हल्ली बहुधा 'स्वामिनी - बेला के फूल' असतं! स्वामिनी, साड्यांची महाराणी! :D)...

"तारों की जुबाँ पर है मोहब्बत की कहानी
ऐ चाँद मुबारक हो तुझे रात सुहानी.."

- अशी कित्येक वर्षांत न ऐकलेली गाणी ऐकून उगाच हळवं व्हायचं! :)

जायचा दिवस जवळ यायला लागला तसं बॅग भरायचं जीवावर येऊ लागलं. I did not feel ready to go back. जायचं होतंच... तिकडे काम वाट बघतंय... रीसर्च राहिलाय, थिसीस लिहायचंय! Anxiety होतीच. पण मला अजून थोडं राहयचं होतं. आताच तर आले होते मी... तीनच तर आठवडे झालेत. सगळ्या जिवाभावाच्या लोकांना भेटले, पण त्यांच्या सोबतीत अजून थोडे दिवस घालवायचे होते. मी मागे ठेवलेलं, दीड वर्षं miss केलेलं आयुष्य महिन्याभरात आधाशासारखं जगून घ्यायचं होतं! खूप हिंडले, फिरले... पण समोरच्या काकूंचा नवीन नातवाला बघायचं राहिलं. आत्याच्या हातची बिर्याणी खायची राहिली. तीनदा पुण्यात जाऊन आले, पण तुळशीबागेत हुज्जत घालून खरेदी करायची राहूनच गेली. काकांबरोबरचं 'Mainland China' मधलं डिनरही राहिलं. रानडेमावशींनी फिकट गुलाबी रंगाचं सुरेख ड्रेस मटेरियल दिलंय. त्याचा एखादा लेटेस्ट फॅशनचा ड्रेस शिवून घ्यायचा होता मस्त! बसस्टॉपवर रुपयाचा गजरा विकत घेऊन माळायचा राहिला. आणि वैशालीतली SPDP सुद्धा खायची राहिली. ती फक्त संध्याकाळीच मिळते. लोकलने लोणावळ्याला - गेला बाजार तळेगावला तरी जाऊन यायचं होतं. बालगंधर्वला नाटक बघायचं होतं एक तरी. पर्वती, सिंहगड दोन्ही राहिलं. सिंहगडावर तर जायचंच होतं. शक्यतो मुक्कामालाच. कल्याण दरवाजातून खाली उतरून तानाजी कड्याच्या पायथ्याशी, त्याच्याच सावलीत बसायचं होतं दुपारचं. देवटाक्याचं पाणी प्यायचं होतं. घोरवडेश्वरचा डोंगरही राहिला. तो तर किती जवळ. सकाळी ६:३० च्या लोकलने गेलं तर १० पर्यंत परत येता येतं. तिथलं गुहेतलं शिवालय. पांढरा चाफा. वरून दूरपर्यंत दिसणारे रेल्वेचे रूळ... श्रेयाला घेऊन बागेत खेळायला जायचं होतं एकदातरी. तीन आठवड्यात मी तिची लाडकी आत्या झाले होते. पण मी पुढच्या वेळी येईन तेव्हा तिच्या लक्षात राहीन का? अजून थोडे दिवस राहिले तर राहीन कदाचित. इथे खूप गर्दी आहे, धूळ आहे, धूर आहे. ट्रॅफिकमध्ये नाही म्हटलं तरी थोडी भितीच वाटते. आधीसारखीच टेचात ’ऍक्टीव्हा’ चालवायचा प्रयत्न करताना कुणी शेजारून जोरात हॉर्न वाजवत गेलं तर जाम दचकायला होतं, तसं दाखवलं नाही तरी! बिलंसुद्धा 'ऑनलाइन' भरता येत नाहीत अजून. पण तरी मला अजून थोडं राहयचंय इथे. थोडंसंच!

हळूहळू बॅगही भरत आली... ढीगभर मराठी पुस्तकं, तीळगूळ, चितळ्यांची बाकरवडी, मिश्राकडचा धारवाडी पेढा, काकूचे बेसनाचे लाडू, घरचा मसाला, थालीपीठाची भाजणी, श्रीखंडाच्या गोळ्या. लिमलेटच्यासुद्धा. मावसभावाने कुठून कुठून शोधून आणलेल्या. "फार नको गं आई, थोडंच दे. तिकडे मिळतं सगळं" .... सगळं मिळतं? सगळं? खरंच??... पुढचं फारसं आठवत नाही. सगळंच अंधुक... कागदपत्र, डॉलर्स, रूपये, फोन, भेटी, मिठ्या, ओघळलेला एखादा चुकार अश्रू... मग भानावर आले ती 'डेल्टा0१७' JFK ला लॅंड झाल्यावरच. खिशातून सेलफोन काढून चालू केला. उद्यापासून परत sandwich lunches आणि tall coffee with skim milk. अर्थात त्याचं वावडं आहे असं नाही. एक आयुष्य मागे ठेवून मी माझ्या या दुसऱ्या आयुष्यात परत आले. बर्मिंगहॅमच्या विमानतळावर "Sweet Home Alabama... " ऐकून परत हास्याची एक लकेर उमटली... मी 'घरी' जायला निघाले!

Saturday, March 29, 2008

मावळतीला...



मावळतीला गर्द शेंदरी रंग पसरले
जसे कुणाचे जन्मभराचे भान विसरले
जखम जीवाची हलके हलके भरून यावी
तसे फिकटले, फिकट रंग ते मग ओसरले....

- शांता शेळके



छायाचित्र: 'ऑरेंज बीच' , अलाबामा

Saturday, March 1, 2008

जे जे उत्तम...

नंदन ने चालू केलेला हा जे जे उत्तम चा टॅग बऱ्याच महिन्यांपूर्वी माझ्यापर्यंत पोहोचला होता, पण तेव्हा जवळ एकही मराठी पुस्तक नव्हतं. सुट्टीला भारतात गेले तेव्हा बरोबर इतकी पुस्तकं घेऊन आले की बहीण म्हणाली, "तुला customs ला अडवणार नक्की! तिकडे नेऊन विकायची आहेत की काय म्हणून.. " :-) नेहमीची कामाची गडबड चालूच असल्याने वाचन अगदी जोरात नाही, पण जमेल तसं, हळूहळू चालुए. आज कित्येक आठवड्यांनी वीकेंडला निवांतपणा मिळाला म्हणून दुपारी लोळून पुस्तक वाचण्याचा कार्यक्रम ठरवला होता. हा उतारा वाचला, आणि इतका आवडला की एकदम या ’जे जे उत्तम’ च्या साखळीची आठवण झाली. लगेच टायपायला घेतला. पुस्तक अजून पूर्ण व्हायचंय.

---

या उपक्रमाबद्दल नंदनचीच प्रस्तावना:

पुस्तक वाचताना, अनेकदा काही परिच्छेद आवडतात. संपूर्ण पुस्तकाचा विचार केला तर ते कदाचित तितके महत्त्वाचे नसतीलही; पण त्या त्या वेळेला ते आवडून जातात. असेच काही आवडलेले उतारे, कुठल्याही भाष्याशिवाय देण्याचा हा एक उपक्रम.

---


व्हिडीओ कॅमेरा काढून अरूण रानकुत्र्यांच्या हालचाली टिपत होता. त्याच्या कामाच्या दृष्टीने तो अत्यंत महत्त्वाचा भाग. मी दुर्बीण डोळ्यांना लावून ठेवली होती. मागे सिद्धाला काहीच काम नसल्याने तो गवताची काडी चावत झोप आवरत बसला होता. दुपारची वेळ. जंगलातला सुखावणारा गारवा. बुडाखाली हिरवं, ओलसर, गार गवत. कानाला सुखावणारा आणि फक्त तेवढाच पक्ष्यांचा आवाज. जोडीला मधूनच ’झिल्ली’ किड्याचा वाढत जाऊन मग पटकन थांबणारा आवाज. तोही आर. डी. बर्मननं चाल लावल्यासारखा पकड घेणारा. या साऱ्या वातावरणात आम्ही आरामात बसलो होतो. सगळे स्नायू शिथील झालेले.

मेंदूला धक्का बसायला ही अत्यंत उत्तम वेळ होती. एक मोठा आवाज आला. रानडुकराचं गुरकावणं खूप मोठं आणि कान कापणाऱ्या आवाजात केलं तर येईल तसा. मी ताडकन गुढघ्यावर उभाच राहिलो! सिद्धा मागे झाडाच्या फाट्यात बसला होता, तो फाट्यातच उभा राहिला. सगळी रानकुत्री ताठ उभी राहिली. काही चार-दोन पावलं पुढे गेले. दोन मोठे नर मात्र बरेच पुढे गेले. तो आवाज येतच राहिला. आधी फक्त एकाच घशातून येत होता, मग दोन, तीन... जंगलात घुमून ते आवाज येतच राहिले. कुत्री अस्वस्थ झाली होती. मला कळेचना हा आवाज कुणाचा. अरूणला विचारलं तर तो म्हणाला, रानकुत्र्यांचाच आहे.

हे अविश्वसनीय होतं. रानकुत्री भुंकू शकत नाहीत. एकमेकांशी संपर्क साधायचा असेल तेव्हा शीळ घालतात. ह्या शीळा खूप लांबवर ऐकू जातात. टोपणातून शीळ घातली तर याची नक्कल सहज करता येते. पण बंदुकीच्या वापरलेल्या पोकळ गोळीतून याचा हुबेहूब आवाज येतो. तो आवाज मला परिचित होता. हा आवाज मात्र खुप वेगळा होता. या आवाजात जिवाचा आकांत होता. धोक्याची सूचना होती, भीती होती. मला अरूणवर विश्वास ठेवावा लागला कारण त्यानं हा आवाज पूर्वी दोनदा ऐकला होता. वाईट गोष्ट म्हणजे त्या गोंधळात तो आवाज कुठली कुत्री काढतायत हे बघण्याचंही मला सुचलं नाही. खरं तर सुचलं नाही हे आता म्हणवतंय, त्या वेळी वेळच नव्हता ते बघायला.

मी मागे वळून सिद्धाला खुणेनेच 'काय होतंय? हा काय प्रकार आहे?' असं विचारलं. तो उत्साहात काहीतरी खुणा करत होता. मात्र त्या खुणा कही मला कळेनात. शेवटी मी परत कुत्र्यांकडे नजर वळवली. जी दोन कुत्री खूप पुढे गेली होती, ती पुढचे दोन पाय उचलून फक्त मागच्या पायांवर उभं राहून काहीतरी बघत होती. उड्या मारल्यासारखं करत होती. मधूनच दोन-चार पावलं डावीकडे-उजवीकडे पळाली. परत मागच्या पायांवर उभी राहिली. रानकुत्री बुटकी असल्यामुळे कधीकधी त्यांना गवतामुळे लांबचं दिसत नाही. अशा वेळी ती मागच्या पायांवर उभी राहतात आणि त्यांची उंची वाढवतात. ही कुत्री 'उभं' राहून एक उंचवटा होता त्यामागे बघत होती. त्या उंचवट्यामागे उतार सुरू होत होता आणि मग एक ओढा होता. ओढ्याभोवती झाडं दाट होती. तिकडेच ही कुत्री तोंड वर करून उभी होती. त्यांचा कोलाहल चालू होता.

मग अचानक हा आरडाओरडा थांबला. पुढे गेलेली कुत्री झटक्यात वळली आणि जीव खाऊन पळाली. त्यांच्या मागोमाग एक खूप मोठं पिवळं जनावर धावत आलं. त्याचा चेहरा गोलसर, अंगावर काळे पट्टे. अंगावरच्या छोट्या छोट्या स्नायूंत मोठी ताकद होती. अंगात बळ आणि नजरेत जरब होती. रानकुत्री बघत होती, त्या उंचवट्याजवळ आल्यावर वाघ एकदम थांबला. त्याची नजर आमच्याकडे गेली. अर्धा-एक क्षणच काय तो थांबला असेल.

वाघ दिसता क्षणी मी अरूणचा खांदा गच्च पकडला. तो व्हिडिओ कॅमेऱ्यातून कुत्र्यांकडे बघत होता. "अरूण, वाघ!!!" मी अस्फुटसा ओरडलोच. काही तरी वेगळं घडतंय याची कल्पना अर्थातच त्याला होती पण वाघ कल्पनेपलिकडे होता. अरूण्नं कॅमेरा वाघावर रोखला. दरम्यान मी घाईत एक फोटो काढला. वाघ क्षणभर थांबला, पण मग लगेच तसाच, आमच्याच दिशेनं पुढे धावत आला! मात्र वाघाचा आमच्या अंगवर येण्याचा बेत नव्हता. वाटेत जो कुत्रा होता त्याच्य अंगावर वाघ धावला. आम्ही नसतो तर वाघानं पुढच्या काही ढांगांमध्ये कुत्र्याला गाठून कदाचित लोळवलं असतं. आमच्यामुळे तो बुजला असावा, कारण पाठलाग सोडून तो वळला आणि एक मोठी डरकाळी फोडून परत उंचवट्यामागे गायब झाला. कुत्री जी पळत सुटली ती थांबलीच नाहीत.

आमच्यात श्वास घेण्याचं भान आलं. शीर न शीर ताडताड उडत असल्याचं लक्षात आलं. अंगात काही वेगळंच चैतन्य पसरलं. असं का झालं हे अजूनही मला सांगता येत नाही; पण हातात काही तरी घेऊन जोरदारपणे आपटावंसं वाटलं. जंगल गिळून टाकणारी मोठी विजयी आरोळी ठोकावीशी वाटली. सर्वांग शिवशिवू लागलं. अंगातून रक्त वाहत असल्याचं ठळकपणे जाणवलं. आता हे लिहितानाही तीच जाणीव, तीच अवस्था परत अनुभवास येत आहे. गाडीच्या खिडकीतून जंगल बघणाऱ्या व्यक्तींना ही गोष्ट कधी कळणार नाही. पडद्यावर जंगलातले प्राणी बघितलेल्यांना याची कल्पना करता येणार नाही. असे प्रसंग अक्षरशः अर्ध्या-पाऊण मिनिटात घडतात. पूर्वसूचना न देता घडतात, पण आयुष्यातल्या असंख्य क्षणांपैकी हे मोजके क्षण अजरामर असतात. त्यांचा मोठा खोल ठसा मनावर उठतो. शेवटी हे निसटते क्षण काय ते आपले असतात. बाकी सगळं आयुष्य म्हणजे लादलेला भार असतो. माझ्या मनातली आरोळी ही ते क्षण पकडल्याची विजयी आरोळी असावी.

लेख: निसटलेले क्षण
पुस्तक: एका रानवेड्याची शोधयात्रा
लेखक: कृष्ण्मेघ कुंटे












---

हा ’टॅग’ असल्याने मी इतरांना ’खो’ देणं अपेक्षित आहे. खरंतर मी हे इतक्या उशीरा लिहीलंय की बऱ्याच जणांनी या उपक्रमात भाग घेऊन झालाय. शिवाय मध्यंतरी बरेच दिवस मी नियमीत ब्लॉग वाचत नसल्याने, कुणी लिहीलंय - कुणी नाही याचाही नेमका ट्रॅक ठेवेलेला नाही. त्यातल्या त्यात आठवलेल्या लोकांची नावं खाली देत आहे.

केतन
गायत्री
कौस्तुभ
प्रियंभाषिणी
संघमित्रा



शिवाय इतर कुणाला आपल्याला आवडलेला एखदा परिच्छेद लिहायचा असेल तर हा टॅग लागू आहे असं समजून जरूर लिहावा :-) वाचायला आवडेल.