Monday, December 18, 2006

पाऊस

हे फार पूर्वी कधीतरी लिहीलेलं. परवा पावसाबद्दल लिहीलं तेव्हा आठवलं अचानक:

********************************************
हल्ली पाऊसही पडत नाही पूर्वीसारखा....
पूर्वी आपण भेटल्यावर आलं घातलेल्या चहाचा एक घोटही घेतला नाही, की धो-धो पाऊस पडायला लागायचा!
"आज जरा लवकर जायला हवं," असं म्हणत म्हणत आलेलो आपण दोघेजण मग शांतपणे पावसाकडे बघत बसायचो....
पावसाच्या निमित्ताने का होईना आपल्या भेटीचा वेळ वाढतोय, या कल्पनेने मनोमन सुखावत.
पाऊस थांबायची वाट बघता बघता गप्पा इतक्या रंगायच्या की पाऊस थांबल्याची आठवण फार उशीरा व्हायची!

हल्ली तू येतोस तेच घड्याळाकडे पहात पहात -
चहा घेता घेता पावसाची सर आलीच एखादी, तर तीदेखिल चहा संपता संपताच ओसरते
"पाऊस थांबलाच आहे तर निघूयात... पुन्हा कधी कोसळायला लागेल नेम नाही..." म्हणून निघून जाताना
तुझी पावलं जराही घुटमळत नाहीत
मग मी तुझ्या पाठमोऱ्या सावल्या मनात साठवत राहते.
सारं कसं पार बदललंय...
हल्ली पाऊस तरी कुठे पडतो, पूर्वीसारखा....!

Friday, December 15, 2006

पाऊस पापणीआड ...कधीचा... असतो!

"उद्या छत्री जवळ ठेव बरं! पाऊस पडणार आहे."
"च्यामारी, म्हणजे सकाळी आठच्या class ला पावसापाण्याचं जावं लागणार!"
"नाही, नाही... सकाळी नाही. दुपारी दोन ते पाचच्यामध्ये पडणार आहे."

.... छ्या! हा काय पाऊस झाला? Weather.com च्या सांगण्यानुसार शॉवर चालू करावा तसा पडणार आणि वेळ झाली, की पुन्हा शॉवर बंद केल्यासारखा थांबणार! तोवर सगळेजण आपापल्या ऑफिसात स्वतःला कोंडून घेणार. Meetings वगैरे शक्यतो आधीच उरकून घेणार. ज्यांचं ऑफिस basement मध्ये आहे, त्यांना तर कळणार पण नाही बाहेर पाऊस पडतोय की काय ते.... किती boring आहे इथला पाऊस! बरं, पाऊस पडून गेल्यावर पण पावसाच्या काही विखुरलेल्या खाणाखुणा, ओल, चिखल, काही नाहीच!! रस्ते लगेच कोरडे... सगळं लगेच पूर्वीसारखं....

पावसाने कसा 'अवेळी' येऊन 'धिंगाणा' घातला पाहिजे! :) किंवा आजिबात ध्यानीमनी नसताना, मस्त ऊन पडलेलं असताना, अचानक दाटून येऊन रस्त्यात 'गाठलं' पाहिजे आपल्याला! मग आपण थोडं भिजत, घाईघाईने जाऊन कुठेतरी आडोसा शोधायचा, उशीर होतोय वगैरे सगळं विसरून नुसतं पावसाकडे बघत रहायचं. पाऊस जरासा कमी होऊन फक्त थोडी रिपरिप उरेल, तेव्हा ओढणी डोक्यावर घेऊन उगाचच पावसापासून जपण्याचा आव आणत, ती भुरभुर हलकेच अंगावर झेलत, भिजत भिजतच घरी जायचं. मग छानपैकी आलं घातलेला चहा प्यायचा :) ! इथे च्यायला पावसाकडे बघायची सुद्धा पंचाईत.... Graduate Office च्या एकुलत्या एका इवल्याश्या खिडकीतून, blinds किलकिल्या करून, समोरच्या दोन इमारतींच्या मध्ये दिसेल एवढाच पाऊस! :( आणि इथे पावसाळा पण नाही.... दोन-तीन महिने उकाड्याने त्रासून जाऊन पावसाची वाट बघणं, मग मोन्सून कुठपर्यंत आलाय ते वाचायला उत्सुकतेने पेपरची पानं चाळणं, पहिला पाऊस झाला की मग हायसं वाटून मस्तपैकी भिजणं, लगबगीने छ्त्र्या-रेनकोट वगैरे बाहेर काढणं, ठिकठिकाणी लागणाऱ्या पावसाळी सेल मधे एका हातात छत्री घेऊन हौसेने खरेदी करणं, काहीच नाही!! मला आठवतं, पहिल्या पावसाच्या वेळेस हमखास माझी परीक्षा असायची! शेवटचाच पेपर राहिलेला असायचा बहुतेकवेळा.... पण अभ्यासाचं कितीही tension असलं तरी एकदा आभाळ भरून आलं, आणि 'जोराचा वारा-मातीचा वास' वगैरे सहित पावसाची चिन्हं दिसू लागली की अभ्यासात लक्षच लागायचं नाही! दुसऱ्या दिवशी परीक्षा म्हणून आई भिजू द्यायची नाही. पण तरी हळूच बाहेर ओट्यावर जाऊन थोडासा पाऊस अंगावर झेलायचा, मग खिडकीतून बाहेरच्या झाडा-झुडपांवर मनसोक्त कोसळणारा पाऊस बघत उगाचंच थोडं हळवं व्हायचं, पाऊस थांबल्यानंतरही हवेत दरवळत राहिलेला त्याचा सुवास श्वासांत भरभरून घ्यायचा; आणि मग संध्याकाळी अंधार झाल्यावर MSEB च्या कृपेने वीज गेली(ती काय चार शिंतोडे पडले तरी जातेच!) की दुपारभर वेळ फुकट घालवला म्हणून emergency light च्या उजेडात पहाटेपर्यंत अभ्यास करायचा, हे दर वर्षीचं ठरलेलं असे!

इथे म्हणजे वर्षभर केव्हाही पाऊस पडणार, अर्थात आधी weather.com वर कळवूनच.... आणि एखादं routine काम उरकून गेल्यासारखा जाणार! पावसाळा वगैरे काही नाही! :( फारच नाराज होते मी इथल्या पावसावर. परका देश, परकी माणसं, अचानक आलेला एकटेपणा, सगळ्याशी जुळवून घेता घेता पुरती भांबावले होतेच मी... पण इथे पावसानेदेखिल पावसासारखं वागू नये? तेवढ्यात एकदा, दुपारी ऑफिसमधून निघून class ला जात असताना अचानक पावसाने गाठलंच मला. मग धावत धावत जाऊन Gorgas Library च्या porch मध्ये आडोश्याला उभं राहून बघितलं, तर फार काही वेगळा नव्हता अमेरिकेतला पाऊस! समोरचं मोठ्ठं लॉन आणि त्याच्या कडेकडेने रांगेत उभ्या असलेल्या मेपल वृक्षांवर कोसळणारा पाऊस डोळेभरून पाहून घेतला. पावसाशी नव्याने मैत्री व्हायला हे निमित्त पुरेसं होतं. तो ओसरल्यावर जरा जरा भिजत पाच मिनीट उशीरा वर्गात पोचले, आणि मग मला कुडकुडताना पाहून मास्तरांनी AC बंद केलं, तेव्हा खूप दिवसांनी आठवणींतल्या पावसाला भेटल्यासारखं वाटलं!

आता हळूहळू इथला पाऊसही आवडायला लागलाय.... :) १५-२० दिवस कोरडे गेले की मीच weather.com वर चक्कर मारून बघते, पुढचा पाऊस केव्हा आहे ते! कधी दुपारी काम करता करता अचानक खिडकीच्या तावदानावर थेंबांचा आवाज ऐकू यायला लागला की, आनंदाने blinds उघडून बघतेच! कधी कधी पाऊस पडत असताना उगाचंच छ्त्री घेऊन समोरच असलेल्या Starbucks मध्ये जाऊन कॉफी घेऊन येते :) आजही पावसाची आठवण येतीये.... बरेच दिवस झाले पाउस पडून...


पाऊस किती दिवसात फिरकला नाही
पाऊस कुणाला कधीच कळला नाही
पाऊस ऋतुचे निमित्त करूनी दिसतो
पाऊस पापणीआड... कधीचा.. असतो...
- सुधीर मोघे

पावसाइतका सख्खा मित्र मला भेटलेला नाही अजून!







ही नोंद 'शब्दबंध' या मराठी ब्लॉग अभिवाचनाच्या ऑनलाईन कार्यक्रमात वाचली गेली.