Sunday, March 4, 2007

असंही मराठी (?!)

हल्ली एकेकाचं मराठी ऐकून मला भयंकर नवल वाटतं! हिंदी नाहीतर इंग्रजीचं शब्दशः भाषांतर करून मंडळी 'मराठी' त बोलत असतात. आणि बरेचदा हे हिंदी करण जोहर, यश चोप्रांच्या सिनेमातून नाहीतर एकता कपूरच्या मालिकांमधून शिकलेलं असतं! मी फार शुद्ध बोलते किंवा लिहीते असं नव्हे, पण हे असलं 'हिंदी सिनेमाळलेलं' मराठी माझ्या फार म्हणजे फारच डोक्यात जातं!

आमच्या इथे जी अगदी मोजकी मराठी टाळकी आहेत, ती सगळीच महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या भागांतली असल्याने मला बऱ्याच वेगवेगळ्या प्रादेशिक बोली ऐकायला मिळतात. माझ्या अगदी पुणेरी वळणाच्या (त्यांच्यामते) 'साजूक तुपातल्या' मराठीची जरा चेष्टाच होते इथे. "काय त्रांगडं आहे!" किंवा "चहा घेणार का?" , "आज एक-दोन फुटकळ कामं आहेत", "आज ऑफिसमध्ये धुमश्चक्री चालू होती", "जेवायला पानं घ्यायची का?", "पेल्यातलं पाणी संपलंय..." - अशी वाक्य माझ्याकडून ऐकायला त्यांना भारी मौज वाटते! प्रादेशिक बोलींबद्दल मला आदर आहे. नव्हे, त्या ऐकायला मला आवडतातही. एखादा मुंबईकर जेव्हा "चाय पिलीस का?" विचारतो तेव्हा तीदेखिल हिंदीमिश्रीत असली, तरी त्यांची भाषाच असते. नागपूरकडचं "काय दिमाग खराब करून राहिलायस बे!" किंवा सोलापूरकडचं कानडीमिश्रीत मराठी हे सगळं छान! अगदी आपलं कॉलेजमधलं "अरे, ते सर कसले अशक्य चांगलं शिकवतात ना!" किंवा "त्याच्या कन्सेप्ट्स अगदी वाईट क्लिअर असतात यार!" या भाषेला सुद्धा स्वतःचं असं सौंदर्य आहे. पण ही भाषा....?!

साडी 'घालतात' की 'नेसतात'? साडी म्हणजे काय शर्ट आहे का 'घालायला'? 'झाडू मारतात' की 'झाडून घेतात'? "माझं पेन चालत नाहीये" असं म्हणायचं, की "माझं पेन काम करत नाहीये" (Word-to-word translation of "My pen doesn't work" ) म्हणायचं? कुणी रुसल्यावर आपण त्याची 'समजूत काढतो' की त्याला 'मनवतो'? 'जेवण बनवतात' की 'स्वयंपाक करतात'? लग्न 'ठरतं' की 'पक्कं होतं'? अंज्ली, मंग्ला, मान्सी, शाल्नी, शाम्ली ही कसली नावं? रेडिओ वर गाणं, किंवा टी.व्ही. वर सिरीयल 'लागते' की 'येते'? रिझल्ट 'लागतो' की 'बाहेर येतो'? रिझल्ट चांगला लागल्यावर आपल्याला 'आनंद' होतो की 'खुशी' होते'? मग आपण 'आनंद साजरा करतो' की 'खुशी मनवतो'? खूप सामान भरल्यावर बॅग 'भारी' होते की 'जड' होते? ती उचलायला मी तुला मदत करू, की मी तुझी मदत करू? एखाद्यावर विश्वास ठेवतात की त्याचा विश्वास करतात? परवा तर एकाने "I'll catch you later" चं सरळ मराठीत भाषांतर करून "मी तुला नंतर कधीतरी पकडतो.." असं म्हटलेलं ऐकलं, आणि माझे कान धन्य झाले!

काय म्हणावं या भाषेला?