Saturday, March 29, 2008

मावळतीला...



मावळतीला गर्द शेंदरी रंग पसरले
जसे कुणाचे जन्मभराचे भान विसरले
जखम जीवाची हलके हलके भरून यावी
तसे फिकटले, फिकट रंग ते मग ओसरले....

- शांता शेळके



छायाचित्र: 'ऑरेंज बीच' , अलाबामा

Saturday, March 1, 2008

जे जे उत्तम...

नंदन ने चालू केलेला हा जे जे उत्तम चा टॅग बऱ्याच महिन्यांपूर्वी माझ्यापर्यंत पोहोचला होता, पण तेव्हा जवळ एकही मराठी पुस्तक नव्हतं. सुट्टीला भारतात गेले तेव्हा बरोबर इतकी पुस्तकं घेऊन आले की बहीण म्हणाली, "तुला customs ला अडवणार नक्की! तिकडे नेऊन विकायची आहेत की काय म्हणून.. " :-) नेहमीची कामाची गडबड चालूच असल्याने वाचन अगदी जोरात नाही, पण जमेल तसं, हळूहळू चालुए. आज कित्येक आठवड्यांनी वीकेंडला निवांतपणा मिळाला म्हणून दुपारी लोळून पुस्तक वाचण्याचा कार्यक्रम ठरवला होता. हा उतारा वाचला, आणि इतका आवडला की एकदम या ’जे जे उत्तम’ च्या साखळीची आठवण झाली. लगेच टायपायला घेतला. पुस्तक अजून पूर्ण व्हायचंय.

---

या उपक्रमाबद्दल नंदनचीच प्रस्तावना:

पुस्तक वाचताना, अनेकदा काही परिच्छेद आवडतात. संपूर्ण पुस्तकाचा विचार केला तर ते कदाचित तितके महत्त्वाचे नसतीलही; पण त्या त्या वेळेला ते आवडून जातात. असेच काही आवडलेले उतारे, कुठल्याही भाष्याशिवाय देण्याचा हा एक उपक्रम.

---


व्हिडीओ कॅमेरा काढून अरूण रानकुत्र्यांच्या हालचाली टिपत होता. त्याच्या कामाच्या दृष्टीने तो अत्यंत महत्त्वाचा भाग. मी दुर्बीण डोळ्यांना लावून ठेवली होती. मागे सिद्धाला काहीच काम नसल्याने तो गवताची काडी चावत झोप आवरत बसला होता. दुपारची वेळ. जंगलातला सुखावणारा गारवा. बुडाखाली हिरवं, ओलसर, गार गवत. कानाला सुखावणारा आणि फक्त तेवढाच पक्ष्यांचा आवाज. जोडीला मधूनच ’झिल्ली’ किड्याचा वाढत जाऊन मग पटकन थांबणारा आवाज. तोही आर. डी. बर्मननं चाल लावल्यासारखा पकड घेणारा. या साऱ्या वातावरणात आम्ही आरामात बसलो होतो. सगळे स्नायू शिथील झालेले.

मेंदूला धक्का बसायला ही अत्यंत उत्तम वेळ होती. एक मोठा आवाज आला. रानडुकराचं गुरकावणं खूप मोठं आणि कान कापणाऱ्या आवाजात केलं तर येईल तसा. मी ताडकन गुढघ्यावर उभाच राहिलो! सिद्धा मागे झाडाच्या फाट्यात बसला होता, तो फाट्यातच उभा राहिला. सगळी रानकुत्री ताठ उभी राहिली. काही चार-दोन पावलं पुढे गेले. दोन मोठे नर मात्र बरेच पुढे गेले. तो आवाज येतच राहिला. आधी फक्त एकाच घशातून येत होता, मग दोन, तीन... जंगलात घुमून ते आवाज येतच राहिले. कुत्री अस्वस्थ झाली होती. मला कळेचना हा आवाज कुणाचा. अरूणला विचारलं तर तो म्हणाला, रानकुत्र्यांचाच आहे.

हे अविश्वसनीय होतं. रानकुत्री भुंकू शकत नाहीत. एकमेकांशी संपर्क साधायचा असेल तेव्हा शीळ घालतात. ह्या शीळा खूप लांबवर ऐकू जातात. टोपणातून शीळ घातली तर याची नक्कल सहज करता येते. पण बंदुकीच्या वापरलेल्या पोकळ गोळीतून याचा हुबेहूब आवाज येतो. तो आवाज मला परिचित होता. हा आवाज मात्र खुप वेगळा होता. या आवाजात जिवाचा आकांत होता. धोक्याची सूचना होती, भीती होती. मला अरूणवर विश्वास ठेवावा लागला कारण त्यानं हा आवाज पूर्वी दोनदा ऐकला होता. वाईट गोष्ट म्हणजे त्या गोंधळात तो आवाज कुठली कुत्री काढतायत हे बघण्याचंही मला सुचलं नाही. खरं तर सुचलं नाही हे आता म्हणवतंय, त्या वेळी वेळच नव्हता ते बघायला.

मी मागे वळून सिद्धाला खुणेनेच 'काय होतंय? हा काय प्रकार आहे?' असं विचारलं. तो उत्साहात काहीतरी खुणा करत होता. मात्र त्या खुणा कही मला कळेनात. शेवटी मी परत कुत्र्यांकडे नजर वळवली. जी दोन कुत्री खूप पुढे गेली होती, ती पुढचे दोन पाय उचलून फक्त मागच्या पायांवर उभं राहून काहीतरी बघत होती. उड्या मारल्यासारखं करत होती. मधूनच दोन-चार पावलं डावीकडे-उजवीकडे पळाली. परत मागच्या पायांवर उभी राहिली. रानकुत्री बुटकी असल्यामुळे कधीकधी त्यांना गवतामुळे लांबचं दिसत नाही. अशा वेळी ती मागच्या पायांवर उभी राहतात आणि त्यांची उंची वाढवतात. ही कुत्री 'उभं' राहून एक उंचवटा होता त्यामागे बघत होती. त्या उंचवट्यामागे उतार सुरू होत होता आणि मग एक ओढा होता. ओढ्याभोवती झाडं दाट होती. तिकडेच ही कुत्री तोंड वर करून उभी होती. त्यांचा कोलाहल चालू होता.

मग अचानक हा आरडाओरडा थांबला. पुढे गेलेली कुत्री झटक्यात वळली आणि जीव खाऊन पळाली. त्यांच्या मागोमाग एक खूप मोठं पिवळं जनावर धावत आलं. त्याचा चेहरा गोलसर, अंगावर काळे पट्टे. अंगावरच्या छोट्या छोट्या स्नायूंत मोठी ताकद होती. अंगात बळ आणि नजरेत जरब होती. रानकुत्री बघत होती, त्या उंचवट्याजवळ आल्यावर वाघ एकदम थांबला. त्याची नजर आमच्याकडे गेली. अर्धा-एक क्षणच काय तो थांबला असेल.

वाघ दिसता क्षणी मी अरूणचा खांदा गच्च पकडला. तो व्हिडिओ कॅमेऱ्यातून कुत्र्यांकडे बघत होता. "अरूण, वाघ!!!" मी अस्फुटसा ओरडलोच. काही तरी वेगळं घडतंय याची कल्पना अर्थातच त्याला होती पण वाघ कल्पनेपलिकडे होता. अरूण्नं कॅमेरा वाघावर रोखला. दरम्यान मी घाईत एक फोटो काढला. वाघ क्षणभर थांबला, पण मग लगेच तसाच, आमच्याच दिशेनं पुढे धावत आला! मात्र वाघाचा आमच्या अंगवर येण्याचा बेत नव्हता. वाटेत जो कुत्रा होता त्याच्य अंगावर वाघ धावला. आम्ही नसतो तर वाघानं पुढच्या काही ढांगांमध्ये कुत्र्याला गाठून कदाचित लोळवलं असतं. आमच्यामुळे तो बुजला असावा, कारण पाठलाग सोडून तो वळला आणि एक मोठी डरकाळी फोडून परत उंचवट्यामागे गायब झाला. कुत्री जी पळत सुटली ती थांबलीच नाहीत.

आमच्यात श्वास घेण्याचं भान आलं. शीर न शीर ताडताड उडत असल्याचं लक्षात आलं. अंगात काही वेगळंच चैतन्य पसरलं. असं का झालं हे अजूनही मला सांगता येत नाही; पण हातात काही तरी घेऊन जोरदारपणे आपटावंसं वाटलं. जंगल गिळून टाकणारी मोठी विजयी आरोळी ठोकावीशी वाटली. सर्वांग शिवशिवू लागलं. अंगातून रक्त वाहत असल्याचं ठळकपणे जाणवलं. आता हे लिहितानाही तीच जाणीव, तीच अवस्था परत अनुभवास येत आहे. गाडीच्या खिडकीतून जंगल बघणाऱ्या व्यक्तींना ही गोष्ट कधी कळणार नाही. पडद्यावर जंगलातले प्राणी बघितलेल्यांना याची कल्पना करता येणार नाही. असे प्रसंग अक्षरशः अर्ध्या-पाऊण मिनिटात घडतात. पूर्वसूचना न देता घडतात, पण आयुष्यातल्या असंख्य क्षणांपैकी हे मोजके क्षण अजरामर असतात. त्यांचा मोठा खोल ठसा मनावर उठतो. शेवटी हे निसटते क्षण काय ते आपले असतात. बाकी सगळं आयुष्य म्हणजे लादलेला भार असतो. माझ्या मनातली आरोळी ही ते क्षण पकडल्याची विजयी आरोळी असावी.

लेख: निसटलेले क्षण
पुस्तक: एका रानवेड्याची शोधयात्रा
लेखक: कृष्ण्मेघ कुंटे












---

हा ’टॅग’ असल्याने मी इतरांना ’खो’ देणं अपेक्षित आहे. खरंतर मी हे इतक्या उशीरा लिहीलंय की बऱ्याच जणांनी या उपक्रमात भाग घेऊन झालाय. शिवाय मध्यंतरी बरेच दिवस मी नियमीत ब्लॉग वाचत नसल्याने, कुणी लिहीलंय - कुणी नाही याचाही नेमका ट्रॅक ठेवेलेला नाही. त्यातल्या त्यात आठवलेल्या लोकांची नावं खाली देत आहे.

केतन
गायत्री
कौस्तुभ
प्रियंभाषिणी
संघमित्रा



शिवाय इतर कुणाला आपल्याला आवडलेला एखदा परिच्छेद लिहायचा असेल तर हा टॅग लागू आहे असं समजून जरूर लिहावा :-) वाचायला आवडेल.