Wednesday, October 28, 2009

"This is Alabama Football"

गेल्या शनिवारची संध्याकाळ. Alabama 'Crimson Tide' ह्या आमच्या फुटबॉल टीमचा कट्टर rival 'Tennessee Volunteers' विरूद्ध गेम! जगातल्या सगळ्यात मोठ्या स्टेडियम्सपैकी एक असणाऱ्या 'Bryant Denny Stadium' या आमच्या होम स्टेडियममध्ये. गेम संपायला clock वर केवळ चार सेकंद उरले आहेत. Alabama 12, Tennessee 10 असा स्कोअर. पण बॉल टेनेसीकडे... आणि ते किक करून फील्ड गोल करायच्या तयारीत. फील्ड गोल झाला तर त्यांना ३ पॉईंट्स मिळून ते १२-१३ असा गेम जिंकणार. त्यांना थोपवण्याचा एकमेव मार्ग म्हणजे तो फील्ड गोल अडवणे!!

स्टेडियम नेहमीप्रमाणे खचाखच भरले आहे. इतका वेळ 'Go Defense', 'Go Bama', 'Get 'im defense', 'Roll Tide' अशा आरोळ्या देऊन आरडाओरडा करून स्टेडियम डोक्यावर घेणारे ९६,००० फॅन्स आता श्वास रोखून बघत आहेत. बॅंडही वाजायचा थांबला आहे. गेल्या वर्षी क्रिम्जन टाईडचा १२-० असा undefeated season फ्लॉरिडाविरूद्ध SEC championship game मध्ये संपुष्टात आला होता. आजवर १२ वेळा National Championship पटकावणाऱ्या क्रिम्जन टाईडच्या पदरी १९९२ नंतर मात्र हा चषक कधीच आला नाही. गेल्यावर्षी याच्या अगदी जवळ जाऊन पराभव पत्करावा लागला होता. १९९२ पासून उराशी बाळगलेलं हे स्वप्न या वर्षी तरी पूर्ण होईल का? क्रिम्जन रंग परिधान केलेला प्रत्येक फॅन याच काळजीत! या वर्षी आतापर्यंत ७-० अशी विजयी मोहीम चालू आहे, तिला आता टेनेसीने धोक्यात आणलंय का? "देवा, championship वगैरे पुढचं पुढे बघू, पण हा गेम आम्हाला जिंकू दे! पराभव आणि तोही Vols कडून? नाही, शक्यच नाही!" टेनेसी-अलाबॅमा rivalry किती कट्टर याची तिऱ्हाईताला कल्पना येणार नाही.

टेनेसी Vols किक करण्याच्या तयारीत...सगळे श्वास रोखून बघतायत... चार सेकंद, फक्त चार सेकंदात निर्णय होणार! हे टेन्शन सहन न होऊन मी कानावर हात ठेवेते आणि डोळे घट्ट मिटून घेते. काही क्षणांनी मोठ्या आरोळया आणि बॅंडचा आवाज ऐकू येऊन मी डोळे उघडते तर समोर फील्डवर अलाबॅमाचा मोठ्ठा झेंडा फडकत असतो, आणि सगळीकडे एकच जल्लोष असतो :) अंगावर सर्रकन काटा येतो! We made it! आम्ही फील्ड गोल अडवला... त्यांना हरवलं, आम्ही जिंकलो!!! मोठ्याने आरोळी मारताना डोळ्यांत पाणी तरळल्याशिवाय राहत नाही. आईशप्पथ, एका वेळी इतक्या अनोळखी लोकांना मी याआधी कधी इतक्या टाळ्या दिल्या नसतील, मिठया मारल्या नसतील! मग "Hey Vols... we just beat the hell outta you!" असं त्यांना ओरडून सांगणं होतं. आता घरी जाऊन साडेतीनशे पौंड वजनाच्या आणि साडेसहा फूट उंचीच्या आडदांड defensive tackle टेरेन्स कोडीने शेवटच्या चार सेकंदात अडवलेल्या त्या विजयी फील्ड गोलचे रीप्ले पुन्हा पुन्हा बघणं आलं! चार तास सलग उभं राहून दुखणारे पाय आणि स्टेडियममध्ये आरडाओरडा करून बसलेला घसा यांची पर्वा न करता!

टेरेन्स कोडी (नं ६२) ने अडवलेला विजयी फील्ड गोल
छायाचित्र: जॉन चार्ल्स ऍकर, अलाबॅमा



तीन वर्षांपूर्वी University of Alabama मध्ये admission घेऊन मी या गावात आले, तेव्हा कॅम्पसवरील सर्वांत पहिल्यांदा नजरेत भरलेली वास्तू म्हणजे इथलं भलं मोठं फुटबॉल स्टेडीयम. फुटबॉल या खेळाबद्दल इथले लोक अगदी 'क्रेझी' आहेत हे त्यांच्या बोलण्यातून कळत होतं, पण केवळ विद्यापीठाच्या स्तरावर खेळल्या जाणाऱ्या या खेळाकरता आपल्या इडन गार्डनपेक्षाही मोठं, अवाढव्य स्टेडीयम कशाला, हे माझ्या लक्षात येत नव्हतं. या देशात सगळं जरा 'अति'च असतं असं म्हणून मी सोडून दिलं, पण तोवर 'कॉलेज फुटबॉल' हे काय प्रकरण असतं याची मला पुसटशीही कल्पना नव्हती. मी इथे नवीन. कंटाळले, घरची आठवण आली की, "एकदा फुटबॉल सीझन सुरू होऊ दे गं, मग इथे खरी मजा असते. You will enjoy like never before!" असं इतर 'सिनीयर' मित्रमैत्रीणी म्हणायचे. मी ते मनावर घ्यायचे नाही, पण इतकी हाईप ऐकून या 'हाताने खेळल्या जाणाऱ्या फुटबॉल' बद्दल मला उत्सुकता नक्कीच निर्माण झाली.

एकदा एका मित्राच्या घरी टीव्हीवर मागच्या वर्षीचा कुठलातरी गेम बघण्यात आला, आणि काहीसा धक्काच बसला. इतका रानटी, आघोरी प्रकार मी यापूर्वी पाहिला नव्हता. मोठाले आडदांड खेळाडू हिसकाहिसकी करतात... मग बदाबदा एकमेकांच्या अंगावर पडतात, मध्येच उठून धावायला लागतात.... या सगळ्यात तो लांबुळका चेंडू कुठे गेला ते तर दिसतच नाही! मध्येच केव्हातरी तो चेंडू समोर ठेवून त्याला लाथ मारतात आणि ते पाहून बघणारे लोक एकतर प्रचंड आनंदाने चित्कारतात किंवा शिवीगाळ करतात... प्रथमदर्शनी काही कळलं तर नाहीच, पण हा आघोरी खेळ पाहून माझा काहीसा भ्रमनिरास झाला. मला क्रिकेटसारखा 'जंटलमॅन्स गेम' बघण्याची सवय. सॉकर म्हणजे अमेरिका सोडून इतरत्र ज्याला ’फुटबॉल’ म्हणतात तोही कधी फारसा बघितला नाही. त्यामानाने बेसबॉल आपल्याला आवडेल कदाचित, पण हे अमेरिकन फुटबॉल प्रकरण आपल्याला झेपेल असं वाटलं नाही!

मग जसा जसा फुटबॉल सीझन जवळ येऊ लागला, तशी आमच्या या पिटुकल्या शहराने बघता बघता कात टाकली. 'क्रिम्जन टाईड' या इथल्या टीमच्या 'क्रिम्जन' अर्थात लालचुटूक रंगात आख्खं शहर रंगून गेलं. 'क्रिमज्न टाईड' चे झेंडे, फलक, कपडे, दागदागिने, टॉवेल्स, कप्स अशा विविध वस्तू, इतकंच काय केक्स, कुकीज अशा मिठायाही सर्वत्र दिसू लागल्या. सगळ्यांमध्ये काहीतरी वेगळा उत्साह, वेगळा आनंद दिसू लागला. बीयर, बार्बेक्यू वगैरेसहित टेलगेट पार्ट्यांना उधाण येऊ लागलं. खेळ कसाही असू दे, पण आमच्या एरवी अगदी थंड, academic वातावरण असलेल्या slow paced शहराला असं जीवदान दिल्याबद्दल तरी मला हा खेळ आवडू लागला. तुम्ही 'बॅमा' मध्ये असाल तर क्रिम्जन टाईडचे गेम न बघणे हा ऑप्शन तुम्हाला नसतो, हे माझ्या लवकरच लक्षात आलं. शनिवारी संध्याकाळी सगळे उद्योग सोडून मीही इतरांबरोबर टीव्हीसमोर बसून गेम बघू लागले. "Fumble म्हणजे काय?", "आता बॉल त्यांच्याकडे कसा गेला?", "आता त्यांनी किक का केलं?" वगैरे माझ्या बाळबोध प्रश्नांना मित्रमंडळींनी शक्य तितक्या पेशन्टली उत्तरं दिली आणि माझं 'Football 101' ट्रेनिंग पार पाडलं. मलाही या खेळातलं थोडं थोडं कळू लागलं. त्यातून माझे मास्तरही कट्टर टाईड फॅन. मी इथे नवीन आहे म्हणून त्यांनी मला तीन गोष्टी लक्षात ठेवायला सांगितल्या: 1. You hate Tennessee 2. You hate Auburn 3. Say "Roll Tide!"

मास्तर, इतर मित्रमैत्रीणी, थोडंफार वाचन यातून मला बॅमाच्या football legacy ची कल्पना आली. आतापर्यंत मिळवलेल्या SEC championships, National championships, Paul 'Bear' Bryant हे legendary coach आणि या सगळ्या बद्दल Bama Nation ला असणारा प्रचंड अभिमान आणि आपुलकी यातून माझं 'Bama fan 101' पण झालं आणि मीही बघता बघता क्रिम्जन टाईडची फॅन होऊन गेले! आपल्या प्रत्येक गेमची सुरूवात "This is Alabama Football" अशा introduction नी करणारी Crimson Tide माझीही होम टीम झाली!


ब्रायंट-डेनी स्टेडियम आतून: विकीमिडीया कॉमन्स

कोण कुठला हा आघोरी खेळ फुटबॉल, आणि कुठली क्रिम्जन टाईड? या 'परकीय' खेळाबद्दल माझ्यात एवढं passion कुठून आलं? या क्रिम्जन टाईडबद्दल एवढी आपुलकी, एवढी ओढ कुठून आली? कशी आली? कदाचित या परक्या देशात, परक्या माणसांत मला एक feeling of belongingness, त्यातून येणारी भावनिक सुरक्षितता त्यांनी दिली म्हणून. इथल्या माणसांशी, त्यांच्या भावनांशी, त्यांच्या मानबिंदुशी स्वतःला जोडण्याकरता एक दुवा दिला म्हणून. अलाबॅमा फुटबॉल नसता तर इथल्या थंडीत गारठलेले कित्येक वीकेन्ड्स मी घरच्या आठवणीने रडण्यात घालवले असते. बारा-बारा तास काम करूनही प्रॉजेक्ट यशस्वी न झाल्याने आलेल्या नैराश्याने, एकटेपणाने खचून गेले असते. इथे इतके मित्र मैत्रीणी जोडण्याची, त्यांच्याशी गप्पागोष्टी करण्याची संधी मला मिळाली नसती.

टाईडने टेनेसीवर विजय मिळवला आणि आणि ८-० अशी विजयी मालिका कायम ठेवली. अजून या सीझनचे काही टफ गेम्स बाकी आहेत. पण सात आठ वर्षांच्या low spell नंतर गेल्या वर्षीपासून पुन्हा उसळून आलेल्या टाईडसाठी सगळ्या फॅन्सचं एकच स्वप्न आहे -- National Championship! ते यंदा पूर्ण होईल किंवा होणार नाही, but the Tide is certainly on a Roll! Nick Saban या कर्तृत्ववान कोचच्या कुशल नेतृत्वाखाली क्रिम्जन टाईड आपल्या लाखो फॅन्सचं हे स्वप्न लवकरंच पूर्ण करेल अशी मला आशा नाही, खात्री आहे! :)

Roll Tide Roll!

अलाबॅमा डीफेन्स
छायाचित्र: जॉन चार्ल्स ऍकर, अलाबॅमा



--------------
*क्रिम्जन टाईडचा लोगो विकीपीडीयाच्या सहाय्याने चिकटवला आहे.
*ज्या फोटोखाली कुणाला श्रेय दिलेले नाही तो (वाकडा!) फोटो मी स्वत: काढलेला आहे.

9 comments:

Unknown said...

रोहनच्या नादात विसरलेच होते Tide vs Vols चा गेम. Vols वर मात..भारीच की!

मस्त लिहीलयेस. मजा आली वाचायला.

Nandan said...

chhan lihila aahes. Suruvatil mala pan ha khel lok etakya aavadeene ka baghatat asa prashna paDayacha. Tithapasoon te aata stadium madhe jaun Match baghane, fantasy-football chya 2-3 leagues madhe timepass karaNe ethaparyant prawaas aahe :)

Gayatri said...

खूप दिवसांनी लिहिते आहेस!फुटबॉलने तुला वश केलंय हे माहिती नव्हतं.. योगायोग म्हणजे आत्ता तासाभरापूर्वीच उद्याचा buckeyes च्या गेमची तिकिटं घेतली विकत - प्रत्यक्ष बघणार असलेला पहिलावहिला गेम! तुझ्या पोस्टमुळे आणखी उत्साहात बघणार आता.

Priya said...

मृण्मयी, पुढच्या वीकेंडला LSU चा गेम आहे. बघायला जमला नाही तरी keep your fingers crossed for us! :)

नंदन, फॅन्टॅसी फुटबॉल प्रकरणाच्या मी नाही नादी लागलेले अजून सुदैवाने! पुढे मागे NFL पहायला लागल्यावर तेही होईल कदाचित! :)

गायत्री, Purdue शी हारले की तुमचे buckeyes! अरेरे! ;) आणि New Mexico चा गेम काय बघायला जात आहेस, पुढच्या आठवड्यात Penn State च्या गेमला तरी जायचंस! :) असो, स्टेडियममध्ये गेम बघणं हा एक धमाल अनुभव असतो. मी प्रत्येक सीझनला एकदा तरी जाते. एंजॉय कर!

प्रशांत said...

बऱ्याच दिवसांनी तुझा ब्लॉग वर आलेला पाहून आनंद झाला. छान लिहिलंय. अमेरिकन लोकं या खेळाबद्दल इतके क्रेझी का असतात याबद्दल मलाही पूर्वी आश्चर्य वाटायचं. पण मजा येते.

Unknown said...

Chan lihala ahes. Mi ha game kadhihi pahila nahi, pan tari hi vachatana maja aali.

Raaga said...

Hey,

I landed here from Nupur's blog. I responded to your comment there and also noted you were looking for a banana chocolate chip cake. I have a recipe that comes out very well: http://chefatwork.blogspot.com/2009/05/banana-chocolate-chip-cake.html

I hope you like it.

Priya said...

Thanks, Raaga. I have replied to you on your banana cake post. Thanks so much :)

HAREKRISHNAJI said...

nothing new ?