ऊन हळुहळू तापायला लागलं असलं तरी वसंतात बहरलेली झाडं-झुडपं मात्र अजूनही बहर टिकवून आहेत! सात-आठ महिने फुलांशिवाय काढतात ही झाडं, आणि चार-पाच महिने तर एकही पान असल्याशिवाय! आणि मग मार्चच्या अखेरीस वसंताच्या आगमनाची वर्दी देत जीवाच्या कराराने बहरतात. सगळ्या निसर्गाचा रंग-गंध पालटून टाकतात! डॅफोडिल, चेरी, मॅग्नोलिया, ब्रॅडफर्ड पेअर, फॉर्सिथिया, रोडोडेंड्रॉन, डॉगवूड, ट्युलिप्स, गुलाब... आणि त्यांच्या अवतीभवती करणारे असंख्य विविधरंगी पक्षी आणि फुलपाखरं! सगळा कॅम्पस कसा नटून जातो! हिवाळ्यात उदासवाणं दिसणारं Quad गजबजून जातं... Frisbee खेळायला, सायकल चालवायला आलेली मुलं, बाळांना stroller मधून फिरवणाऱ्या आया, ऊन खात पुस्तक वाचत बसलेले विद्यार्थी -- निसर्गाच्या फुलायच्या उर्मीमुळे जणू सगळ्यांमध्ये नवा उत्साह संचारतो.
उन्हाळयात इथे आठ-साडेआठ पर्यंत लख्ख उजेड असतो. अशी मोठ्ठी संध्याकाळ मिळाली की ठरवलेल्या (आणि न ठरवलेल्याही) किती गोष्टी करायला मिळतात, नाही? संध्याकाळी साडेपाच-सहा पर्यंत सगळी कामं उरकून घरी यावं, पोटापाण्याची सोय करून मग पब्लिक लायब्ररीतून आणलेले वुडहाऊस किंवा सॉमरसेट मॉम, किंवा घरून येताना आणलेला 'लंपन' वाचत संध्याकाळची हवा खात पॅटियोमध्ये पाय पसरून निवांत बसावं; किंवा संध्याकाळी पडणाऱ्या रिपरिप पावसात वळणावळणाच्या रस्त्यांवरून लांब ड्राईव्हला जावं, ऊन पावसाचा खेळ बघून 'श्रावणमासी, हर्ष मानसी' (शाळेत म्हणायचो त्याच चालीत) मोठ्यांदा म्हणावी आणि ती अजून तोंडपाठ आहे म्हणून सुखावून जावं, येताना वाटेत थांबून वाफाळती कॉफी घ्यावी, घरी येऊन 'रोमन हॉलिडे' किंवा 'साऊंड ऑफ म्युझिक' किंवा असाच कुठला तरी गोंडस सिनेमा अकराव्यांदा बघावा आणि तृप्त मनाने झोपी जावं...
उन्हाळातल्या अशा सुरेख संध्याकाळचा रंग मनावर हलकेच उमटावा....