Tuesday, November 27, 2007

लय

दिवाळीच्या सुमारास घाईघाईत खरडलेलं पोस्ट वगळता, आज बरेच दिवसांनी परत ब्लॉगची आठवण आली. सेमेस्टर ऐन रंगात आलेली असली आणि करण्यासारखी इतर अनेक महत्त्वाची कामं असली: ढीगभर होमवर्क असलं, परीक्षा तोंडावर आलेली असली, पुढच्या आठवड्यात प्रेझेंटेशन असलं... की हमखास स्वतःचे आणि इतरांचे ब्लॉग, खूप दिवसांत न ऐकलेली कॅसेट, सुट्टीत वाचताना अर्धवट राहिलेलं पुस्तक, न बघितलेले चांगले सिनेमे (स्विडीश पासून मल्याळीपर्यंत कुठच्याही भाषेतले) - असल्या गोष्टींची आठवण होते :-( सध्या लिहायची भयंकर खुमखुमी असली तरी अभ्यास आणि काम सोडून फारसा विचार करायला वेळही नाही, आणि ताकदही नाही. सेमेसटरच्या शेवटी घरी जायला मिळणार, एवढाच काय तो दिलासा आणि motivation. "लिहायचंय, पण लिहायला घेतलं की सुचत नाही" - अशी कुरकुर पण मागच्या एका पोस्टमध्ये करून झालीये. ' जे जे उत्तम ' - च्या साखळीमध्ये एक दोघांनी टॅग केल्याचं लक्षात आहे, पण दोनचार कवितासंग्रह वगळता सध्या जवळ एकही मराठी पुस्तक नाही :-( खरंतर आवडता परिच्छेद म्हटल्यावर इतकी पुस्तकं डोळ्यासमोर आली होती... त्यातली बरीचशी घरी माझ्या खोलीतल्या शेल्फवरचीच. परत एकदा खूप deprived वाटलं. पण त्यामुळे यंदाच्या पहिल्या-वहिल्या भारतवारीत पुस्तकांसाठी बॅगेत पुष्कळ जागा ठेवली आहे. बाकी अपडेट्स देण्यासारखं पण लायफात विशेष काय घडत नाहीये. Grad School मध्ये असेपर्यंत काय विशेष घडणार म्हणा!

नाही म्हणायाला वाढदिवस छान झाला. रूममेट सुजाताकडून एक मस्त जांभळ्या फुलांचं ऑर्किड, रिक-शॅरन कडून फॉल कलेक्शनसाठी फुल स्लीव्सचा मस्त शर्ट, रंजन कडून बरेच दिवस हवं असलेलं एक इंग्रजी कवितांचं पुस्तक, किरणने न विसरता पाठवलेली बर्गमनच्या 'The Seventh Seal' ची DVD, आणि मेघना आणि अपराजिता कडून एक मस्त designer shawl अश्या छान छान गिफ्ट्स पण मिळाल्या :)मध्ये केव्हातरी ब्लॉगचाही वाढदिवस झाला. माझ्या लक्षातही नव्हतं आलं आपल्या ब्लॉगला वर्ष होत आलंय ते! सगळे कसं ब्लॉग एका वर्षाचा झाला की एखादं profound पोस्ट टाकतात. एका वर्षापूर्वी का लिहायला लागलो, आता कसं वाटतंय, वाचकांना धन्यवाद वगैरे! मला कधी जमणार असल्या गोष्टी लक्षात ठेवणं, त्याचा विचार करणं आणि मुख्य म्हणजे त्या लिहून काढणं?! :-( असो. पण खरंच, आपण लिहीलेलं BS लोक खरोखर वाचतात, यावर कधीकधी माझा विश्वासच बसत नाही. फक्त वाचत नाहीत, तर त्यावर आवर्जून प्रतिक्रिया देतात, पटल्याचं - न पटल्याचं सांगतात, कौतुकही करतात... आणि कधी पाहिलेले-भेटलेले नसले तरी आपले मित्रमैत्रीणी होऊन जातात..... जाम बरं वाटतं :)

आज शाळेत जायचा आजीबात मूड नाहीये. उगाच घरी बसून सकाळी सकाळी टवाळक्या चालू आहेत. मी भारतातून इकडे यायला निघायच्या दोन दिवस आधी क्षिप्रा तिची signature (तिच्यासारखीच) टवटवीत निशीगंधाची फुलं घेऊन भेटायला आली होती. त्यादिवशी तिने सुधीर मोघेंचं ’लय’ नावाचं कवितांचं पुस्तक दिलं. रुबाया-कणिका टाईप छोट्या छोट्या रचना आहेत. प्रत्येक कवितेला खरोखर एक लय आहे, आणि ही हुरहुर लावणारी लय आख्ख्या पुस्तकात प्रत्येक कवितेत जपली आहे. त्यातली काही पानं आज सहज चाळत होते --

१.
ना सांगताच तू मला उमगते सारे
कळतात तुलाही मौनातील इशारे
दोघात कशाला मग शब्दांचा बांध
कळण्याचा चाले कळण्याशी संवाद

२.
ही दरी धुक्याचे तळे जणू अनिवार
सांडला केशरी कुंभ उठे झंकार
कोवळ्या तृणांना जणू उन्हाचे डोळे
उमटले कळीवर पाय दवांचे... ओले...

३.
मी तुझ्या घराशी खरेच होतो आलो
थबकलो... जरासा - क्षणात मागे फिरलो
किती दूर पोचलो सर्व तोडुनी धागे
क्षण वळुन पाहिले... तुझा उंबरा मागे

४.
घननीळ रान घननीळ रातीला भिडले
सावळे डोह सावळ्या सावल्या ल्याले
चांदण्यात गोऱ्या भिने निळा अंधार
दूरात दर्वळे सृजनाचा हुंकार

५.
पाऊस किती दिवसांत फिरकला नाही
पाऊस कुणाला कधीच कळला नाही
पाऊस ऋतुचे निमित्त करूनी दिसतो
पाऊस पापणीआड... कधीचा.. असतो

६.
लय एक हुंगिली खोल खोल श्वासांत
ओवीत चाललो शब्दांच्या धाग्यात
लहडला वेल.. तो पहा निघाला गगनी
देठांना फुटल्या कविता पानोपानी


७.
ही लय प्रलयाच्या तांडवात घुमणारी
आकाराच्या देहातुन लवलवणारी
लय विश्चामधला रुणझुणता आभास
मरणाच्या तिमिरी लय - मिणमिणता श्वास

Saturday, November 10, 2007

शुभेच्छा

यंदाची दिवाळी परीक्षा, परीक्षेची तयारी, आणि त्याबद्दल रडारड/कुरकुर करण्यातच गेली बरीचशी. इंडियन असोसिएशनच्या कार्यक्रमात perform करायला पण नाही म्हणून सांगितलं, त्याचीच खंत वाटत होती बरेच दिवस. चालायचंच! प्रत्येक गोष्टीचा बाऊ करण्याची सवयच आहे -- असं आई म्हणते, ते खरंच असावं! असो. पण अगदी ठरवून वेळ काढून लक्ष्मीपूजन मात्र जोरदार केलं होतं, रूममेटबरोबर झटून (झटून म्हणजे पूजा करायची म्हणून हॉलमधला पुस्तकांचा पसारा बेडरूममध्ये हलवणे वगैरे अत्यंत strategic कामं!). त्याचे काही चित्रमय पुरावे :











बाकी लिहीण्यासारखं सध्या विशेष फारसं नाही. सर्व ब्लॉगर व नॉन-ब्लॉगर मित्रामैत्रिणींना दिवाळीच्या असंख्य शुभेच्छा! :-)

Monday, July 2, 2007

थोऽऽडंसं जास्त

आपल्याला आयुष्याकडून जे अपेक्षित असतं ते मिळालं की आपण समाधानी असतो. पण ज्याची अपेक्षा असते त्यापेक्षा 'थोऽऽडंसं' जास्त मिळालं की आपण खरे खुश होतो. म्हणजे पहा, परीक्षेत ८८% मार्कं मिळणार अशी अपेक्षा असली आणि ८८% मिळाले की आपण समाधानी असतो, आनंद होतोच... पण जर ८८ ची अपेक्षा असताना ९०% मिळाले तर आभाळ ठेंगणं होतं! (Grad student ची धाव परीक्षेपर्यंतच :D असो.)

चिंचवडला आमच्या घरी दारावर भाजी विकायला एक भाजीवाला यायचा. आई त्याच्याकडून बहुतेक दर दिवसाआड भाजी घ्यायची. अगदी नेहमीचं, ठरलेलं गिऱ्हाईक. रोजची भाजी घेऊन झाली आणि आईने त्याचा हिशेब चुकता केला, की कधीकधी तो आईच्या पिशवीत मूठभर मिरच्या जास्तीच्या टाकत असे. हल्लीची terminology वापरून सांगायचं झालं तर - घेतलेल्या इतर भाजीसोबत 'फ्री'! त्या 'फ्री' मिरच्या, तो विक्रेता आणि त्याचं रोजचं गिऱ्हाईक यांच्यातल्या 'गुडविल'चं प्रतिक होतं. ह्याच 'गुडविल' मुळे एखादं वांगं कधी किडकं निघालं किंवा मेथी नेहमीसारखी टवटवीत नसली तर आई त्याला काही बोलत नसे. दूधवाल्या गवळयानं आपल्या भांड्यात रोजचं ठरलेलं लिटरभर दूध ओतल्यावर आणखी एक पळीभर जास्त घातलं, तर कधीमधी दूधात पाणी जास्त असलं की आपण त्याच्याजवळ कुरकुर करीत नाही हाही अशाच 'गुडविल' चा भाग!

घरी आम्हा बहिणींकडे रोज बाहेर वाळत घातलेले कपडे घरात आणून त्यांच्या घड्या करणं, धुतलेली भांडी जागच्या जागी लावणं वगैरे कामं असायची. ही कामं बहुतेकवेळा आई शाळेतून यायला पाच मिनीट राहिलेले असताना, घाईघाईने ती यायच्या आत कशीबशी होत असत. बरेचदा ती आल्यावर, घरातला पसारा पाहून तिचा ओरडा खाल्यावरही होत असत. पण कधी कधी आई घरी आल्यावर सगळी भांडी जागच्या जागी, पसारा आवरलेला, कपडे नीट घडी घातलेले असले आणि वर गरम गरम पोहे तयार आणि गॅसवर चहा उकळत असला तर तिच्या चेहऱ्यावरील कौतुकमिश्रीत आनंदाला पारावार उरत नसे. मग रात्रीच्या जेवणात न मागता कांद्याचं थालीपीठ किंवा वरणफळं मिळत! :)

आताच्या मास्तरांच्या बाबतीतही असंच. त्यांना हवी असलेली सगळी माहिती रीपोर्टमध्ये दिली, तर नेहमीचा काहीतरी शेरा लिहून, एक-दोन फुटकळ चुका काढून दुसऱ्या दिवशी रीपोर्ट मेलबॉक्समध्ये ठेवलेला असतो. स्वतःहून काहीतरी नवीन माहिती मिळवली आणि ती लिहीली, किंवा एखादी नवी कल्पना, नवी कन्सेप्ट सांगायचा प्रयत्न केलेला असेल तर त्याच दिवशी संध्याकाळी भेटायला बोलावून कौतुक करतील (म्हणजे उघड-उघड कौतुक नाही. ते मास्तरांच्या जातीला शोभत नसावं. पण आडून आडून 'काहीतरी चांगलं केलंस' - असं सांगतात), आणिक चार गोष्टी समजावून सांगतील, सुधारणा सुचवतील. शुक्रवारी संध्याकाळी काम करताना दिसले तर चक्क "बास झालं आता. जा घरी" - असंही म्हणतील.

नात्यांच्या बाबतीतही असंच असावं का? प्रेम, मैत्री वगैरे प्रत्येक नात्याकडून 'हे हवं, ते नको' अशा black and white मध्ये requirements नसल्या, तरी subconsciously काही किमान अपेक्षा असतातच ना आपल्या. त्या अपेक्षा परस्परांकडून पूर्ण होत असतात, म्हणूनच नातं टिकून असतं. जपलेलं असतं. पण या अपेक्षांपेक्षा 'थोऽऽडंसं जास्त' जेव्हा अनपेक्षितपणे एखाद्या नात्यातून मिळतं तेव्हा आपण खरे सुखावतो. ते नातं खऱ्या अर्थाने अतिशय जिवाभावाचं, special, precious होऊन जातं. यामुळेच आधीच्या किंवा नंतरच्या लहानमोठ्या चुका माफ केल्या जातात. खंबीरपणे कुठल्याही प्रसंगात त्या नात्याला साथ दिली जाते. जरा त्रास झाला तरी ते नातं जोपासण्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न केला जातो.

आज जरा dull, uninspired वाटत असतानाच मला आजपर्यंत किती नात्यांनी अपेक्षेपेक्षा 'थोऽऽडंसं' जास्त दिलंय याची आठवण झाली आणि... ladies and gentlemen, my chalice runneth over! :) The only way to return a favor is to pass it on - याचा मला कधीच विसर पडू नये, हीच इच्छा!

Thursday, June 21, 2007

खूप मोठ्या कंटाळ्यानंतर....

पूर्वी इतर गोष्टींचा कंटाळा आला की ब्लॉग लिहायचे. आता ब्लॉग लिहायचाच कंटाळा येतोय, त्याला काय करू? काही जणांनी इथे चौकशी केली, मेलमधून विचारलं, फोनवरही विषय काढला.... खरं म्हणजे लिहीण्यासारखं काही नव्हतं असंही नाही. खूप interesting गोष्टी घडत होत्या, वाचनात आल्या होत्या, नवीन काही काही विषय पण सुचत होते. पण आता summer मध्ये ब्रेक मिळालाय... ब्लॉगबिग लिहीत बसले तर तास न तास चॅटिंग करणे, फोनवर गप्पा मारणे, संध्याकाळी Quad वर फिरायला म्हणून जाणे आणि तिथे दोन तास गप्पा कुटत बसणे, रात्री जागून फालतू सिनेमे बघणे असे इतर महत्त्वाचे उद्योग कोण करणार? पण परवा "खूप दिवसात काही लिहीलं नाहीस. सध्या बिझी नाहीस, निवांत आहेस म्हणतेस मग लिहायला काय होतं?" म्हणून आईचं (पंधरा मिनीट टाईप केल्यावर चार ओळींच) मेल आलं. आई हाडाची शिक्षिका! ती हजारो मैल दूर असली तरी आता नाही लिहीलं तर पाठीत धपाटा बसेल की काय असं वाटलं आणि घाबरून लिहायला बसले.

बरेच दिवस इतरांचे ब्लॉगही चाळले नव्हते. आज चाळले असता "लिहायचंय पण लिहायला घेतलं की सुचत नाही" हा सध्याचा hot topic दिसला. म्हटलं आपल्याकडे तरी कुठे काही विषय आहे सध्या लिहायला? जे विषय गेल्या दोन महिन्यात ’येऊन’ गेले ते आता जुने झालेत. नियमीत आणि प्रसंगानुरूप लिहीणाऱ्यांचं मला फारच कौतुक वाटतं. म्हणजे महिला दिन आला की त्यावर एक विचार करायला लावणारं, अर्थपूर्ण पोस्ट. एक मे ला महाराष्ट्र दिनानिमित्त पोस्ट. किंवा मग नवीन काही घडलं, कुठे जाऊन आले, नवा सिनेमा पाहिला, पुस्तक वाचलं, तर लगेच ब्लॉगवर अपडेट! इथं म्हणजे जेव्हा काही घडतं तेव्हा इतकं सगळं एकदम घडतं की श्वास घ्यायलाही फुरसत नसते. जेव्हा फुरसत मिळते तेव्हा एकतर काही घडत नसतं, सुचत नसतं, नाहीतर मग perpetual कंटाळा आणि आळस आहेच! या स्प्रिंगमध्ये एक आख्खा दिवस कॅम्पसमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी फिरून फुलांचे सुंदर फोटो काढले. त्याचं एक छानसं कोलाज करून इथे टाकू म्हणेपर्यंत सेमेस्टर नाकातोंडाशी आली, आणि ती संपेपर्यंत रखरखित उन्हाळा चालू झालेला. आता ते फोटो इथे येईपर्यंत बहुधा फॉल कलर्सचे फोटो काढायची वेळ होणार. आमचं आपलं नेहमीच वरातीमागून घोडं! :) असो. I digress. तर, जे विषय गेल्या दोन महिन्यात ’येऊन’ गेले ते आता जुने झालेत. त्यावर पुन्हा विचार करायची इच्छा नाही. लिहायची तर मुळीच नाही. पण मग कुठल्यातरी एका विषयाला (वेठीस) धरूनच लिहीलं पाहिजे असा नियम थोडाच आहे? भलतंच! मध्ये कुणाच्यातरी इंग्रजी ब्लॉगवर वाचलं होतं: Putting down useless words on paper was the besetting sin of the 20th century; putting them online is that of the 21st.I believe this is the only justification for my blog. त्या व्यक्तीची परवानगी घेऊन हे वाक्य माझ्या ब्लॉगच्या description मध्ये टाकीन म्हणत्येय :)

दर सेमेस्टरप्रमाणेच याही वेळी परीक्षेनंतर "आपण अजून जीवंत कसे?" हा प्रश्न पुन्हा एकदा नव्याने पडला. एकंदर सेमेस्टरच खडतर. त्यात हा course माझा major असल्याने काहीही करून 'A' मिळायलाच हवा, हे प्रेशर! मिड-सेम मध्ये मला बरे मार्क्स असले तरी इतर grad students ना खूप कमी आहेत, undergrads चं average grads पेक्षा खूपच जास्त आहे म्हणून मास्तर वैतागले... पार डोळ्यातून (माझ्या!) पाणी येईपर्यंत सगळ्या grad students ना सामुदायिक झापण्याचा सोहळा झाला! त्यांचं झापून झाल्या झाल्या मी ऑफिसम्ध्ये जाऊन सगळे जुने पेपर्स, Quizzes, Homeworks वगैरे काढून माझी आतापर्यंतची ग्रेड calculate केली, तर तशी काही वाईट नव्हती. ते सगळं त्यांना दाखवायला घेऊन गेले तर म्हणे, "तुझं ठीक आहे. You are doing good. उलट तुझ्यामुळेच class average जरातरी वर गेलं. बाकीच्यांचा performance अगदीच poor आहे, तेव्हा मी जे बोललो ते त्यांच्यासाठी होतं!" घ्या... हे त्या वेळी बोलून "तू गेलीस तरी चालेल" असं सांगितलं असतं तर बिघडलं असतं? मला कशाला अर्धा तास दीड पायावर उभं राहून ते टोचून टोचून बोलणं सहन करायला लावलंत? आपण safe आहोत, आणि आपला performance तसा satisfactory आहे असा जरा कुठे दिलासा वाटेस्तोवर, "पण मागच्या lab assignment मधलं तुझं काम तितकंसं आवडलं नाही. चार आठवडे दिले होते त्यावर काम करायला. त्या मानाने सफाईदारपणा नव्हता. तुम्हा grad students कडून जास्त अपेक्षा असतात." - हे वाक्य आलंच पाठोपाठ! जणू काही चार आठवडे मी बाकीचे कोर्सेस, परीक्षा, नोकरी, होमवर्क्स, इतर असाईनमेंट्स सोडून मी याच एका असाईनमेंट वर काम करत होते. आणि इतरांनी ती धड पूर्णही केली नव्हती हे पाहता, माझं काम तसं बऱयापैकी होतं. पण हे लक्षात घेतील, तर ते मास्तर कसले! लगेच "आता टर्म पेपर तरी नीट लिहा" ही प्रेमळ सूचना आलीच. मग दर दोन दिवसांनी "हे पण include कर" , "त्याचाही उल्लेख कर," " अमुक एका कन्सेप्टबद्दल वाचायला आवडेल" असं मेल हमखास यायच. अहो सात पानी पेपरमध्ये काय काय हवं तुम्हाला? या पेपर वर दिवसरात्र काम करून शेवटी त्यातही दोनशेपैकी एकशेसत्तरच :-( बरं, कुठेही लाल खुणा नाहीत, चुका दाखवलेल्या नाहीत. विचारलं तर म्हणे, "बाकी पेपर उत्तम आहे, पण काही काही ठिकाणी references मधल्या गोष्टी जशाच्या तशा उतरल्या आहेत. मग मी refernces च वाचीन ना, तुझा पेपर कशाला वाचू?" आता मी लिहीलेला पेपर हा इतरांनी केलेल्या कामाचा survey आहे, त्यामुळे काही काही ठिकाणी त्यांचे उल्लेख जसेच्या तसे वापरणं गरजेचं आहे... शिवाय ते cite केले आहेतच की... पण नाही! माझा उतरलेला चेहरा पाहून म्हणे, "Welcome to the world of research!" आपणही सतत कुणीतरी डोक्यावर बसणारं असल्याशिवाय स्वतःला पूर्णपणे झोकून देऊन काम करत नाही, bare minimum efforts घेतो फक्त, आळशीपणा करतो, ही स्वत:ची वैशिष्ट्य माहित असल्याने हा मास्तर आपल्यासाठी पर्फेक्ट आहे, आपण याच्याकडे बरंच काही शिकणार, असं आता सेम संपल्यावर वाटतंय! असो. एवढं करून त्या कोर्समध्ये 'A' मिळाला... गंगेत घोडं न्हालं, हे सांगायचंच राहिलं!

सेम संपल्यावर ऑफिसमधली कामं भराभर उरकून Atlanta ला (चुलत) भावाकडे पळ काढला. तिथून मग साऊथ कॅरोलिनाला vacation साठी... beach वर! खूप वर्षांनी अशी मोठी vacation मिळाली. भावाच्या आणि वहिनीच्या दांडग्या उत्साहामुळे ट्रिपच्या तयारीपासून प्रत्येक गोष्ट एंजॉय केली. काही काही लोक कायम उत्साही आणि प्रसन्न असतात... त्यांच्या अवतीभवती असण्यानेच आपल्यालाही प्रसन्न वाटायला लागतं. कुठे कुठे जायचं, काय काय बघायचं, काय काय करायचं, काय काय खायचं (हे महत्त्वाचं!), हॉटेल बुकिंग्ज, driving directions, बरोबर काय काय न्यायचं, गाडीत ऐकायला कुठली गाणी हवीत अश्या अत्यंत critical गोष्टींची तयारी आणि त्यावर चर्चा करण्यातच दोन दिवस गेले. मृणालचा म्हणजे माझ्या वहिनीचा उत्साह तर वाखाणण्याजोगा... कुठल्या दिवशी, कुठे जाताना कुठले कपडे घालयचे इथपासून तयारी आणि प्लॅनिंग. मग क्लॉजेटमध्ये मनासारखे कपडे नसल्याने (नसायचेच!) आम्ही दोघींनी जाउन टीशर्ट्स, शॉर्ट्स, स्विमसूट, टोप्या, बीच टॉवेल अशी थोऽऽडीशी शॉपिंग्सुद्धा केली. मग तो सगळा पसारा मांडून तिचं ते बॅग भरणं... अशी काही वातावरण निर्मीती करते की बस्स! ट्रिप छान झाली हे वेगळं सांगायला नकोच. जवळ जवळ पाच-सहा वर्षांनी परत समुद्र पाहिला मी. शेवटचा बहुधा गुहागर-वेळणेश्वरचा पाहिला असेल अकरावीत असताना. प्रत्येक वेळी समुद्रकिनारी गेलं, की क्षितीजापर्यंत विस्तारलेलं ते पाणीच पाणी पाहून एक आदरयुक्त म्हणतात तशी भिती मनात आपोआप दाटून येते. पाण्यात पायदेखिल भिजवण्यापूर्वी समोर त्याच्या विराट अस्तित्वाची कल्पना येऊन अंगावर शहारा येतो. पाण्यात डुंबत लाटांशी खेळण्याइतकं comfortable व्हायला अंमळ वेळच लागतो.

Vacation संपवून अलाबामाला परत आले तर त्या embedded च्या कोर्समधली माझी जेनिफर नामक समदु:खी मैत्रीण क्रूझवरून परत आलेली. जेनीफर हे एक असंच कायम चैतन्याने सळसळणारं वगैरे उत्साही व्यक्तिमत्त्व. जोरात, खळाळून हसणं, तितकंच पटकन रडूही येणं, सतत बडबड-बडबड करणं... जेन नसली की लॅबमध्ये अगदी सामसूम वाटते. माझ्यावर भयंकर जीव टाकते ही जेन... मला कधी घरची आठवण वगैरे येतीये असं मूडवरून वाटलं, तर "You need a mommy hug?" म्हणत माझी प्रेमळ Mommy होते! :) सेमेस्टरच्या शेवटी परीक्षेच्या आणि सबमिशनच्या टेन्शनमध्ये लोक रात्रीचा दिवस करून काम करत असतानादेखिल परीक्षा संपल्यावर जेन तिच्या बॉयफ्रेंडबरोबर क्रूझला जाणार आहे, हे आख्ख्या डिपार्टमेंटला ठाऊक होतं. क्रूझवरच्या Formal Dinner साठी आईबरोबर खास बर्मिंगहॅमला जाउन आणलेला ड्रेसही मला उत्साहाने दाखवण्यात आला होता. त्याच्यावर कुठले शूज चांगले दिसतील यावर माझं मोलाचं मत घेण्यात आलं होतं॒! "कशी झाली क्रूझ?" म्हणून विचारायला फोन केला तर मॅडम एकदम खुशीत! "He proposed to me while we were on the cruise. We are now engaged!" मग मला काम बिम सगळं सोडून कॉफीसाठी बोलावण्यात आलं. आता गेली तीन वर्ष तो तुझा बॉयफ्रेंड आहे आणि हे सगळ्या जगाला माहित आहे म्हटल्यावर पुढे मागे तू त्याच्याशीच लग्न करणार हे गृहीतच नाही का बाळे? मग हे प्रपोज करण्याचं आणि एंगेज्ड होण्याचं एवढं काय अप्रूप? या गोऱ्या लोकांचं गणित मला कधी कळायचं नाही. असो. मग तासभर तिच्याबरोबर बसून त्याने कसं तिला चांदण्या रात्री डेकवर प्रपोज केलं, मग तिच्या डोळ्यांत आनंदाने पाणी वगैरे आलं ही स्टोरी ऐकली, तिच्या diamond studded in platinum अंगठीचं कौतुक केलं, त्यांचे फोटो पाहिले आणि जेनीफरच्या डोळ्यांतलं, ओठांवरचं हसूही पाहून घेतलं. खरंच, कायम हसत असली तरी इतकी आनंदात कधीच दिसली नव्हती नाही आपल्याला ही? ’प्रेम माणसाला सुंदर बनवतं’ असं कुठेतरी वाचलं होतं. त्या दिवशी जेनकडे पाहून तेव्हा BS वाटलेलं ते वाक्य १००% पटलं.

सध्या मी अचानक एकदम श्रीमंत झाले आहे. Atlanta ला गेले तेव्हा तिथल्या एका पब्लिक लायब्ररीत जुन्या पुस्तकांचा सेल होता. तिथनं साधारण दोन डझन पुस्तकं उचलली. Barns and Noble चं एक गिफ्ट कार्ड होतं त्यातून Pursuit of Happyness आणि रिचर्ड बाखचं Illusions घेतलंय. कॅलीफोर्नियात राहणाऱ्या एका मैत्रीणीने चार-पाच मराठी पुस्तकं पाठवली आहेत. शिवाय मृणालकडून येताना Gone with the Wind घेऊन आल्येय. खूप वर्षांपासून वाचायचं होतं, पण त्या पुस्तकाची जाडी पाहूनच धीर खचायचा! शिवाय "आधी पुस्तक वाचूयात" म्हणून पिक्चर बघायचा टाळत होते. या उन्हाळयात दोन्हीचा योग होता. पुस्तक जवळ जवळ संपत आलंय, आणि उद्या शॅरनबरोबर सिनेमा बघायचा प्लॅन आहे. रिक आणि शॅरन हे माझे इथले अमेरिकन काका-काकू. अतिशय प्रेमळ! परवा त्यांच्याकरता तंदूरी चिकन आणि व्हेज बिर्याणी असा खास Indian Dinner चा बेत केला होता. जेवणावर मंडळी जाम खुश. घरी असताना मुगाच्या डाळीची खिचडी जेमेतेम करणारी आपली लेक आता चिकन आणि बिर्याणी वगैरे बनवतीये यावर आईचा विश्वास बसावा म्हणून दोन-चार फोटोही काढले. असो. तर जुने, त्यांच्या काळातले सिनेमे आई-बाबांबरोबर किंवा आजी-आजोबांबरोबर बघण्यात एक वेगळीच मजा असते. तोच अनुभव येणार आहे शॅरनबरोबर GWTW बघताना. साऊथमध्ये युद्धाच्या पार्श्वभूमीवर घडणारं हे कथानक या एकेकाळच्या southern belle बरोबर बसून बघायला काय मजा येईल! ती या सगळ्याकडे कशी बघते, कुठला scene, कुठला dialog तिला सगळ्यात आवडतो, कुठलं character भावतं, त्या काळातल्या चालीरीती, रूढी कितपत सिनेमात दाखवल्याप्रमाणे होत्या हे सगळं तिला विचारायचंय. काही संदर्भ कळले नाहीत तर तेही विचारता येतीलच. GWTW वाचणं हादेखिल एक ’अनुभव’ होता... पण त्याविषयी पुन्हा केव्हातरी.

मेघनाचे वडील आलेत भारतातून तिला भेटायला. म्हणजे खरंतर जर्मनीला गेले होते कामासाठी, मग अजून थोडं पुढे येऊन PhD करणाऱ्या लेकीला भेटायला अमेरिकेत आले. त्यांना भेटल्यावर त्यांचं प्रसन्न व्यक्तिमत्त्व आणि प्रेमळ स्वभाव पाहून पप्पांची खूप आठवण आली. ते असते तर काय वाटलं असतं त्यांना माझ्या इकडे येण्याविषयी? काय सल्ला दिला असता त्यांनी? मी फोनवर त्यांच्याशी काय बोलले असते? मला रीसर्च कसा चालू आहे असं विचारलं असतं का त्यांनी? माझी काळजी केली असती का? ... आज प्रीतीनेही बोलता बोलता नेमकी त्यांची आठवण काढली. योगायोगाने चारू आणि कौस्तुभ चॅटवर भेटले तेव्हाही आपापल्या बाबांबद्दल सांगत होते. क्षणभरासाठी का होईना मला फार deprived वाटलं. एरवी त्यांची आठवण येते तेव्हा बचैन वगैरे वाटण्यापेक्षा छान inspired, positive वाटतं खरं म्हणजे. पण बहुधा एकेक दिवसच एखाद्या व्यक्तिच्या आठवणीने व्याकूळ होण्याचा असावा. असो.

मेघनाच्या वडिलांना महाराष्ट्रीयन जेवण जेवायचं आहे. मटकीची उसळ, भरल्या वांग्याची भाजी, पोळ्या, भजी, कोशिंबीर, मठ्ठा, मसाले भात असा भरगच्च मेन्यू ठरवलाय! मिनोतीच्या ब्लॉगवर चक्कर मारायला हवी.... :)

Monday, April 2, 2007

ते गेले....

.... परवाच त्यांचा मुलगा आणि सून येऊन त्यांच्या ऑफिसमधलं सगळं सामान घेऊन गेले. एकेक वस्तू बॉक्समध्ये घालून घेऊन जाताना लांबूनच बघत होते मी.... मोठ्या हौसेने आणून ठेवलेले रंगीबेरंगी फुलांचे एक-दोन फ्लॉवर पॉट्स, नातवंडाबरोबर खेळतानाचे देखण्या फ्रेम्समध्ये लावलेले फोटो, ख्रिसमसला काढलेले इतर कुटुंबियांबरोबरचे फोटो, भिंतींवर फ्रेम करून लावलेली त्यांची असंख्य सर्टिफिकेट्स आणि अवॉर्ड्स, ऑफिसमधल्या मंडळींनी गेल्या वाढदिवसाला भेट दिलेलं एक छानसं टेबल क्लॉक आणि पेन स्टॅंड, त्याच्याशेजारीच असलेलं सुबक पेपर वेट आणि महत्त्वाचं म्हणजे दाराजवळ अडकवून ठेवलेला त्यांचा कोट आणि हॅट! कोट आणि हॅट घालणारे लोक आता फक्त जुन्या इंग्रजी कादंबऱ्यांमधूनच भेटतात असं माझं ठाम मत होत असतानाच मी यांच्या ऑफिसमध्ये कामावर रुजू झाले. आणि रोज कोट-हॅटसहित त्यांच्या प्रसन्न स्मितहास्याची बघता बघता इतकी सवय होऊन गेली.... सकाळी ऑफिसला आल्या आल्या त्यांच्या "Priya, How are you this morning?" ने माझ्या दिवसाची सुरूवात होत असे. मग वेळेनुसार थोड्या इकडच्या तिकडच्या गप्पा... कोर्सवर्क कसं चाललंय, घरी सगळे बरे आहेत ना - अशी आपुलकीने चौकशी.... स्प्रिंग ब्रेक्मध्ये कुठे जाणार आहेस, तिथे गेल्यावर काय काय बघून ये अशी माहिती... भारताबद्दल, आपल्याकडच्या पद्धतींबद्दल, आपल्या संस्कृतीबद्दल त्यांचे कुतुहलाने विचारलेले असंख्य प्रश्न.... मध्येच फारच सुंदर मूड असेल तर - मी डिट्रॉईटला नोकरी करत असताना माझा बॉस कसा 'हुकलेला प्राणी' होता - असे चुरचुरीत किस्से ऐकवणं... सध्या कुठलं पुस्तक वाचतोय त्याबद्दल चर्चा करणं.... खरंतर ते ऑफिसचे executive director आणि मी साधी graduate assistant. पण त्यांच्याशी गप्पा झाल्या नाहीत असा एकही दिवस आठवत नाही. घरात वडीलधारी मंडळी असली की कसं एक secure feeling येतं, तसं वाटायचं सगळ्या ऑफिसला त्यांच्या नुसत्या असण्याने.

माझा पहिला पगार झाल्यानंतर आता घरी असते तर कसं सगळ्यांबरोबर बाहेर जेवायला गेले असते, आईसाठी नवीन साडी आणली असती, बहिणीकरता गिफ्ट आणलं असतं... हे सगळं नोकरीला फक्त एक महिना झाला असताना, या माझ्या बॉसच्या बॉसबरोबर मी शेअर केलं होतं.... इतकी माया आणि आपुलकी दिली होती त्यांनी मला. मी घरच्या लोकांना 'मिस' करू नये म्हणून माझा वाढदिवस दणक्यात साजरा करण्याची कल्पना त्यांचीच. हॅलोवीनला मी करून नेलेला गाजर हलवा डाएट वगैरे सगळं विसरून चवीने खाणारे आणि माझं तोंडभरून कौतुक करणारे तेच! वयाच्या मानाने इतके प्रसन्न आणि उत्साही की आम्हा तरुण मंडळींना त्यांचा कामाचा उरका पाहून स्वत:ची लाज वाटत असे. ते मात्र आमच्या छोट्या छोट्या achievements चंही प्रचंड कौतुक करीत. दुपारी लंचच्या वेळेला कुणाचीतरी थट्टामस्करी करत खळाळून हसण्याचा त्यांचा आवाज ब्रेकरूममधून हमखास ऐकू येई. सॅमची नवी महागडी बाईक, जॉनची लेटेस्ट गर्लफ्रेंड, हॅनाचं वाढतं वय, ज्युलीचं बीयर पीणं, बिलीचं वाढतं वजन, आणि मला येणारं परीक्षेचं टेन्शन - हे थट्टा करण्यासाठीचे त्यांचे लाडके विषय! महिन्यातून एकदातरी शुक्रवारी संध्याकाळी office outing चा पुढाकार घेऊन plan करणारं त्यांचं ई-मेलही न चुकता येई.

आज त्यांच्याबद्दल लिहीताना आठवणींची इतकी गर्दी होतेय की काही धडपणे मांडताही येत नाहीये. परक्या देशात, परक्या माणसांत, काहीशी एकटी असताना, मला त्यांच्याकडून आणि त्यांच्या या ऑफिसरूपी कुटुंबाकडून इतकी माया मिळाली... I sometimes wonder what I have done to deserve this! परवा त्यांच्या memorial service ला गेले तोपर्यंत ते 'गेलेत' हे खरंच वाटत नव्हतं. तिथे ही कविता वाचली आणि भरून आलं --

When I come to the end of the road
and the sun has set for me,
I want no rites in a gloom-filled room.
Why cry for a soul set free!
Miss me a little, but not too long,
and not with your head bowed low.
Remember the love that we
once shared,
Miss me but let me go.
For this journey we all must take,
and each must go alone.
It's all part of the Master Plan,
A step on the road to home.
When you are lonely and sick of heart,
Go to the friends we know
And bury your sorrows in doing
good deeds.
Miss me, but let me go.


त्यांना आवडणार नाही, म्हणून सगळ्यांनीच डोळ्यांत दाटून आलेलं पाणी हलकेच टिपलं. गेल्या ख्रिसमसला काढलेला त्यांचा कुटुंबीयांसमवेतचा, नेहमीच्या हसऱ्या, प्रसन्न मुद्रेतला फोटो तिथे होता. त्याखाली मजकूर होता -
"Bill served as the Executive Director of the Office for 13 years. He is survived by his wife, son, daughter-in-law, grandchildren, and his father. He loved gardening, playing tennis, and being with family and friends. He will be missed. "
Yes, Dr. Fendley.... you will be missed!

Sunday, March 4, 2007

असंही मराठी (?!)

हल्ली एकेकाचं मराठी ऐकून मला भयंकर नवल वाटतं! हिंदी नाहीतर इंग्रजीचं शब्दशः भाषांतर करून मंडळी 'मराठी' त बोलत असतात. आणि बरेचदा हे हिंदी करण जोहर, यश चोप्रांच्या सिनेमातून नाहीतर एकता कपूरच्या मालिकांमधून शिकलेलं असतं! मी फार शुद्ध बोलते किंवा लिहीते असं नव्हे, पण हे असलं 'हिंदी सिनेमाळलेलं' मराठी माझ्या फार म्हणजे फारच डोक्यात जातं!

आमच्या इथे जी अगदी मोजकी मराठी टाळकी आहेत, ती सगळीच महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या भागांतली असल्याने मला बऱ्याच वेगवेगळ्या प्रादेशिक बोली ऐकायला मिळतात. माझ्या अगदी पुणेरी वळणाच्या (त्यांच्यामते) 'साजूक तुपातल्या' मराठीची जरा चेष्टाच होते इथे. "काय त्रांगडं आहे!" किंवा "चहा घेणार का?" , "आज एक-दोन फुटकळ कामं आहेत", "आज ऑफिसमध्ये धुमश्चक्री चालू होती", "जेवायला पानं घ्यायची का?", "पेल्यातलं पाणी संपलंय..." - अशी वाक्य माझ्याकडून ऐकायला त्यांना भारी मौज वाटते! प्रादेशिक बोलींबद्दल मला आदर आहे. नव्हे, त्या ऐकायला मला आवडतातही. एखादा मुंबईकर जेव्हा "चाय पिलीस का?" विचारतो तेव्हा तीदेखिल हिंदीमिश्रीत असली, तरी त्यांची भाषाच असते. नागपूरकडचं "काय दिमाग खराब करून राहिलायस बे!" किंवा सोलापूरकडचं कानडीमिश्रीत मराठी हे सगळं छान! अगदी आपलं कॉलेजमधलं "अरे, ते सर कसले अशक्य चांगलं शिकवतात ना!" किंवा "त्याच्या कन्सेप्ट्स अगदी वाईट क्लिअर असतात यार!" या भाषेला सुद्धा स्वतःचं असं सौंदर्य आहे. पण ही भाषा....?!

साडी 'घालतात' की 'नेसतात'? साडी म्हणजे काय शर्ट आहे का 'घालायला'? 'झाडू मारतात' की 'झाडून घेतात'? "माझं पेन चालत नाहीये" असं म्हणायचं, की "माझं पेन काम करत नाहीये" (Word-to-word translation of "My pen doesn't work" ) म्हणायचं? कुणी रुसल्यावर आपण त्याची 'समजूत काढतो' की त्याला 'मनवतो'? 'जेवण बनवतात' की 'स्वयंपाक करतात'? लग्न 'ठरतं' की 'पक्कं होतं'? अंज्ली, मंग्ला, मान्सी, शाल्नी, शाम्ली ही कसली नावं? रेडिओ वर गाणं, किंवा टी.व्ही. वर सिरीयल 'लागते' की 'येते'? रिझल्ट 'लागतो' की 'बाहेर येतो'? रिझल्ट चांगला लागल्यावर आपल्याला 'आनंद' होतो की 'खुशी' होते'? मग आपण 'आनंद साजरा करतो' की 'खुशी मनवतो'? खूप सामान भरल्यावर बॅग 'भारी' होते की 'जड' होते? ती उचलायला मी तुला मदत करू, की मी तुझी मदत करू? एखाद्यावर विश्वास ठेवतात की त्याचा विश्वास करतात? परवा तर एकाने "I'll catch you later" चं सरळ मराठीत भाषांतर करून "मी तुला नंतर कधीतरी पकडतो.." असं म्हटलेलं ऐकलं, आणि माझे कान धन्य झाले!

काय म्हणावं या भाषेला?

Saturday, February 24, 2007

जीवनगाणे

शुक्रवारची संध्याकाळ असूनही मला भयंकर कंटाळा आला होता. जोडीला वैताग आणि चिडचिडही. हातातलं काम संपता संपत नव्हतं आणि 'वीकेंड स्पेशल' ढीगभर कामांची यादीही डोळ्यांपुढे नाचत होती. ऑफिसमधल्या इतर मंडळींना मात्र Friday night fever (नेहेमीप्रमाणेच) दुपारपासूनच चढू लागला होता. लंचटाईमला जी टंगळमंगळ चालू झाली... वीकेंडचे शॉपिंग प्लॅन्स, पावासाची शक्यता असल्याने फिरायला जाता येणार नाही म्हणून हळहळ, अलाबामा-ऑबर्न बास्केटबॉल गेम, जिमनॅस्टिक्स मीट, चायनीज कम्युनिटीचा कसलातरी समारंभ, असे सगळे विषय चघळून झाल्यावर मंडळी उगाच काम केल्यासारखं दाखवून पावणेपाच वाजायची वाट बघत कसाबसा वेळ काढत होती. पावणेपाच झाले रे झाले, की "बाऽऽऽय! हॅव अ नाईस वीकेंड!" म्हणून एकेकाने पळ काढला. मी मात्र हातातलं काम उरकायच्या मागे लागले होते.

साडेपाचला काम उरकून Quad वरून डिपार्टमेंटकडे चालत यायला निघाले. मला आज 'लोकल' कंटाळा आला होता. परवाच कौस्तुभने 'कंटाळ्याचे दोन मुख्य प्रकार' या विषयावर माझं प्रबोधन केलं असल्याने, मला आलेल्या कंटाळ्याचं मी तत्परतेने 'लोकल कंटाळा' असं identification केलं! 'लोकल' कंटाळा म्हणजे तेवढ्या टाईम स्पॅन करता असलेला तात्पुरता कंटाळा... 'ग्लोबल' कंटाळा म्हणजे टोटल आयुष्याचा कंटाळा! म्हणजे,

"कळून येता जगण्याची या इवलीशी त्रिज्या
उडून जाती अत्तरापरी जगण्याच्या मौजा
दारी नाही फिरकत कुठला नवा छंद चाळा
राखण करीत बसतो येथे सदैव कंटाळा
कंटाळ्याचादेखिल आता कंटाळा येतो..."


- अशा टाईपचा! [काही काही ठिकाणी संदीप खरे quote करणं इतकं अपरिहार्य का व्हावं? :) ] म्हणजे आठवडाभर निरर्थक वाटणारी कामं करताना, "कधी एकदा वीकेंड येतोय..." असं वाटत असताना येतो तो 'लोकल' कंटाळा. आणि वीकेंडला करण्याजोगं काहीच नसल्यावर नुसतंच यड्यासारखं बसून, किंवा मग वीकेंडलादेखिल प्रचंड काम असल्यावर डिप्रेशन येऊन "आपल्या आयुष्याला काहीच अर्थ नाही!" असं वाटणे म्हणजे 'ग्लोबल' कंटाळा असावा बहुतेक! हा ग्लोबल कंटाळा फार वाईट, असं कौस्तुभचं म्हणणं!

असो. पण माझा आजचा कंटाळा तसा लोकलच होता. तो घालवण्यासाठी आता काय काय करता येईल याचा विचार करत करत चालत असताना, अचानक कुठूनतरी जरा विचित्र संगीत कानावर पडलं. बासरी आणि एक-दोन ड्रम्स होते मुख्यतः . जरा इकडे तिकडे पाहिलं तर दूरवर, Quad च्या दुसऱ्या टोकाला एका mound वर चार-पाच जणं काहीतरी वाजवताना दिसले. मी चालता चालता कान देऊन ऐकू लागले. फार गोड वाटत होतं ते ऐकायला. कुठल्या एका ठराविक प्रकारचं म्युझिक म्हणता येईल असं नव्हतं ते... झालंच तर थोडा 'folk' touch होता... पण जे काही होतं ते कानांना विलक्षण गोड वाटत होतं. माझी पावलं आपोआप त्या दिशेला वळली. जवळ गेल्यावर दिसलं... माऊंडच्या खाली एका पायरीवर उभं राहून एक जण बासरी वाजवत होता. माऊंडवर चार-पाच जण होते. एकाच्या हातात एकदम राजेश खन्ना नाहीतर हृषी कपूर स्टाईल डफ होता. एकाकडे दोन छोटे छोटे, बसून वाजवायचे ड्र्म्स, एकाकडे एक भलामोठा ढोलकीसारखा ड्र्म... बासरीच्या सुरांत तल्लीन होऊन त्यांचं एका तालात बडवणं चालू होतं. एक मुलगी उभी राहून tambourine वाजवत होती, तिच्या पावलांनीही छान ताल धरला होता. एक अपंग माणुस माऊंडच्या खाली त्याच्या wheelchair वर बसून, ते हातात धरून वाजवतात ना... खुळखुळ्यासारखं दिसणारं वाद्य... काय म्हणातात त्याला, मला माहित नाही... कुणाला माहित असेल तर जरूर सांगा... ते वाजवत होता. या सगळ्या वाद्यांपैकी फक्त बासरी वाजवणारा जरा trained किंवा skillful वाटत होता. बाकी सगळेजण नुसतच काहीतरी हातात घेऊन बडवत होते. पण त्या सगळ्याचा ताळमेळ असा काही जमून आला होता, की ऐकत रहावसं वाटत होतं. सगळेजण आपापसात खाणाखुणा करून मध्येच लय बदलत होते. कधी एकदम जोरदार ठेका, काही वेळाने जरा संथ, मग पुन्हा हळू हळू सगळे गुंग होईस्तोवर rhythm वाढवत वाढवत न्यायचा!

बिझनेस स्कूल मधली टाय वगैरे घातलेली दोन मुलं माझ्यासारखीच कुतूहलाने त्यांच्याकडे बघायला थांबली होती. एकाने त्यांना हात करून वर बोलावलं... त्यातला एकजण गेला, आणि तिथल्या पिशवीतून आणखी एक छोटा डफ काढून वाजवू लागला. मी जवळ जाऊन त्यांच्याकडे बघत, ते संगीत ऐकत उभी राहिले. मी पण मस्त ओढणीसहीत सलवार-कमीज वगैरे घातलेला असल्याने ते लोक देखिल उत्सुकतेने माझ्याकडे पहात होते. ते विचित्र, पण गोड संगीत एव्हाना मलाही 'चढू' लागलं होतं :) त्या tambourine वाल्या मुलीने हसून, हातवारे करून मलाही वर बोलावलं. Tambourine माझ्या हातात दिलं आणि स्वतः आणखी काहीतरी घेऊन वाजवायला लागली. त्या tambourine वर माझ्या हाताची एक थाप पडली, आणि मग मी केव्हा त्या लयीत एकरूप झाले कळलंच नाही. बराच वेळ आजूबाजूचं काही दिसतंच नव्हतं जणू... त्या फ्ल्यूटचा गोड, नाजूक, पण तरीही आसमंत भारून टाकणारा आवाज... डोळे बंद करून ऐकलं तर सह्याद्रीच्या कुशीतल्या कुठल्याश्या खेडेगावात एखादा गुराखी नदीच्या किनारी बसून पावा वाजवतोय असंच वाटावं! सोबतीला एवढा मस्त ठेका... एवढी तालवाद्य असली तरी ती अतिशय सौम्य होती, आजिबात गोंगाट वाटत नव्हता. खूप वेळ हातातल्या त्या खंजिरीसह ते संगीत 'अनुभवत' राहिले. मनात खोलवर रुजू दिलं त्याला. अगदी आतून फुलून आल्यासारखं झालं. का कोण जाणे, फार फार ओळखीचं, जवळचं वाटत होतं ते सगळं. कंटाळा, मरगळ, चिंता, दुःख, विवंचना, काळज्या सगळ्यांना फाटा देऊन आयुष्याशी नातं सांगणारं असं काहीतरी...!!

काहीवेळाने जऽरा भानावर आले. बघितलं तर प्रत्येकाच्या चेहऱ्यावर त्या क्षणाचा आनंद ओसंडून वाहत होता. जाणवलं की किती वेगवेगळे होतो आम्ही सगळे... काळे, गोरे, माझ्यासारखे 'ब्राऊन' :), तरूण, मध्यमवयीन, वृद्ध, अपंग, धडधाकट... सगळे अगदीच वेगवेगळे. एरवी कुठल्याही ठिकाणी भेटलो असतो तर एकमेकांशी बोललोदेखिल नसतो कदाचित. सगळ्यांना एकमेकांची भाषाही कळली नसती. पण आता मात्र एका वेगळ्याच भाषेत आमचा संवाद चालला होता. कुणी मान डोलावून कुणाला दाद देत होतं, कुणी हाताने खूण करून लय वाढवायला सांगत होतं, कुणी दुसऱ्याच्या वाद्यावर ताल धरत होतं, कुणी आपाल्याच नादात हसत होतं!

खिशात सेलफोन व्हायब्रेट झाला आणि मी एकदम ’खऱ्या’ जगात आले. डिपार्टमेंटमध्ये काही जणांना भेटायचं होतं, ते वाट बघत असतील. इथे अजून थांबणं शक्य नव्हतं. जाता जाता हे लोक कोण आहेत, हे काय नककी काय करतायत, का करतायत वगैरे विचारावं, तर कुणाची तंद्री भंग करणार? :)Tambourine जिच्याकडून घेतली तिला परत देताना विचारलं,

"How long are you folks going to be here?"

तर ती हसून म्हणाली, "I don't know. I just joined them like you did."

मग एकाने सांगितलं, "We do this every Sunday at 1 o'clock! You can join us anytime..."

पण त्याला बाकी काही तिथे विचारून त्या सगळ्या भारलेल्या वातावरणाचा भंग करण्यात पॉईंट नव्हता. मी सगळ्यांना wave करून तिथून निघाले खरी, पण ते सूर कितीतरी वेळ कानात घुमत होते. कंटाळा तर कुठच्या कुठे गेलाच होता, पण तो येऊ नये म्हणून वीकेंडला (होमवर्कव्यतिरिक्त) काय काय करता येईल, याबद्दल नवनवीन कल्पनासुद्धा डोक्यात येऊ लागल्या! या वीकेंडचा highlight उपक्रम म्हणजे एक भलंमोठं jigsaw puzzle सोडवायला घेतलंय! प्रचंड होमवर्क आणि पुढच्या आठवड्यात परीक्षादेखिल असल्याने लगेच पूर्ण होणार नाही, पण होईल तेव्हा त्याचा update इथे लिहीनच! शिवाय जमेल तेव्हा रविवारी दुपारी एक वाजता Quad वर चक्कर टाकायचा विचार आहेच! :)

Monday, January 29, 2007

अघळपघळ

परवाच मिनोतीने आठवण करून दिली की मी बरेच दिवसात काही लिहीलेलं नाहीये. मग लक्षात आलं खूप दिवसांत लिहीण्यासारखं विशेष काही घडलेलंही नाही. बाकी फारसं काही घडत नाहीये हे चांगलंच आहे म्हणा... नाहीतर तीन-तीन असाईन्मेंट्स एका दिवशी ड्यू असणे, नोकरीच्या ठिकाणी बॉसला अचानक मिटींग्सवर मिटींग्स घेण्याची लहर येणे, तब्येत बिघडणे, घरातली सगळी ग्रोसरी संपणे, "रिसर्च कुठवर आलाय ते सांगायला येऊन भेट" म्हणून मास्तरांची ई-मेल येणे, एवढ्या सगळ्या 'विशेष' गोष्टी एकत्र घडतात ते दिवस नुसते आठवूनदेखिल दरदरून घाम फुटतोय! म्हणतात ना, "No news is good news" ... तसंच, काहीही न घडणे हे काहीतरी चांगलं घडल्यासारखंच आहे :)

नाही म्हणायला सगळं सुरळीत चालू आहे. सकाळीच एक होमवर्क (शेवटच्या क्षणापर्यंत धावपळ न करता) वेळेत सबमिट केला, उद्याच्या क्लासची तयारी झाली आहे, रूममेटनी बनवलेलं आयतं जेवण जेवून, त्यानंतर चुलत भावाच्या लग्नाचा एक लाडू खाऊन, संदीप खरेची गाणी ऐकत ब्लॉग लिहीत बसले आहे...

लागते अनाम ओढ श्वासांना
येतसे उगाच कंप ओठांना
होई का असे तुलाच स्मरताना
तनन दीम तदेरेना देरेना...

- मला सांगा... सुख-सुख म्हणतात ते आणखी काय असतं? :) डिट्रॉइटहून येताना भावाकडून संदीप खरे - सलील कुलकर्णीची 'सांग सख्या रे' आणली... अजून पारायणं चालू आहेत, पण 'लागते अनाम ओढ श्वासांना...' सध्या 'चढलंय'... मस्त जमून आलंय हे गाणं!

अमेरिकेत होऊनही पारंपारिक मराठी पद्धतीने झालेला भावाचा लग्नसोहळा... या आठवड्यात आणखी एका मित्राचं पुण्यात लग्न आहे. 'शादी किसीकी भी हो, अपना दिल गाता है' - दोन प्रेमी जीवांच्या एकत्र येण्याइतकी आनंदाची गोष्ट दुसरी काय असू शकते? पण या लग्न झालेल्या, त्यातल्या त्यात नवीन लग्न झालेल्या लोकांचा एक प्रॉब्लेम असतो... आपलं लग्न झालं म्हणजे "आता तू केव्हा लग्न करतोयस/करतीयेस?" असं सगळ्या अविवाहित मित्र-मैत्रीणींना किंवा भावा-बहिणींना विचारायचा यांना लायसन्सच मिळतो जणू! जसं काही ते एखाद्या सापळ्यात अडकलेत आणि आता शक्य तितक्या लोकांना त्यात ओढू पहातायत असं वाटतं... किंवा आपलं लग्न झालंय म्हणजे आपण कुणीतरी मोठे झालो आहोत, आणि समस्त अविवाहित मंडळींच्या लग्नाची जबाबदारी आपल्याच डोक्यावर आहे, असं काहीतरी त्यांना वाटत असावं बहुधा! नवीन लग्न झालेल्या आणि रिटायर झालेल्या लोकांमध्ये हे एक साम्य असतं -- उगाच दुसऱ्याच्या लग्नाच्या चौकशा करणे. असो.

या सुट्ट्यांमध्ये दोन-चार पुस्तकं वाचली... आणिक दोन-चार वाचायची राहिली. वाचलेल्यांपैकी विशेष न आवडलेलं म्हणजे चेतन भगतचं 'Five Point Someone'. बरेच दिवसांचं वाचायचं राहिलं होतं... गेली दोन-अडीच वर्षं काहीच वाचन झालं नव्हतं माझ्याकडून. सतत कशाततरी गुंतलेली असायचे. त्या काळात आलेली आणि लोकप्रिय झालेली सगळी पुस्तकं miss झाली आहेत माझ्याकडून. 'Five point...' ची बरीच hype झाली होती. त्यामानाने पुस्तकाने निराशा केली. तसं लेखकाचं हे पहिलंच पुस्तक आहे हे लक्षात घेता, निवेदनशैली वगैरे चांगली आहे... पण जनरल पब्लिकला हवा असलेला मालमसाला ठासून भरलाय, आणि IIT चं ब्रॅंड नेम कॅश केलंय! अगदीच वाईट आहे असं नाही, पण "What not to do at the IIT" ही त्याची punchline आणि एकंदरच त्यापुस्तकाचा आल्या आल्या झालेला गवगवा यामुळे उगाचंच अपेक्षा वाढल्या असाव्यात माझ्या.

दुसरं पुस्तक म्हणजे 'हृ्दयस्थ'. स्व. डॉ. नीतू मांडकेंच्या त्यांच्या पत्नीने लिहीलेल्या आठवणी. पुस्तक चांगलं आहे. डॉ. अलका मांडके रूढार्थाने 'लेखिका' नसल्याने या पुस्त्कात तथाकथित 'साहित्यिक मूल्य' नसेल फारसं, पण त्यांचं लिखाण फार प्रामाणिक आणि मनापसून आहे हे पदोपदी जाणवतं. डॉ. मांडकेंचं व्यक्तिमत्त्वाच इतकं प्रभावी होतं की अवतीभवतीच्या सगळ्यांना त्यांच्या दबावाखाली किंवा त्यांच्या प्रचंडत्वाच्या छायेत वावरावं लागे. तरीही एक 'माणूस' म्हणून ते किती थोर होते हे पुस्तक वाचून लक्षात येतं.

तिसरं पुस्तक - "The Bridges of Madison County" . गेल्या वर्षी मायबोलीच्या हितगुज दिवाळी अंकात या पुस्तकाचा परिचय वाचला तेव्हापासून हे पुस्तक वाचायची इच्छा होती. सुट्टीत पब्लिक लायब्ररीतून आणून वाचलं. आवडलं. प्रेमकथांकडे फारसा कल नसलेल्यांना ते stereotyped bullshit वाटू शकेल कदाचित. खरंतर या पुस्तकाच्या बाबतीत मी लोकांची अतिशय टोकाची मतं ऐकली आहेत. पण मला overall आवडलं. काही काही ठिकाणी जरा कंटाळवाणं होऊन 'Mills and boons' च्या वळणावर जातंय की काय अशी शंका आली... पण मग कथानकाने लगेच पकड घेतली. या पुस्तकातलं नेमकं काय आवडलं आणि सौंदर्यस्थळं कुठली वगैरेवर वेगळा लेख होऊ शकेल. I will spare you that. आता या पुस्तकावर आधारित क्लिंट इस्ट्वूड आणि मेरील स्ट्रीपचा चित्रपट पहायची इच्छा आहे. बघू.

देशातून काकांनी ’अणसार’ नावाचं नवीन पुस्तक पाठवलंय. एका गुजराती कादंबरीचा मराठी अनुवाद आहे. डिट्रॉइटहून येताना फलाईटमध्ये ५०-६० पानं वाचली... एका कुष्ठरोग झालेल्या स्त्रीच्या आयुष्यावर आधारित कादंबरी असल्याने जरा depressing आहे. त्यामुळे "इतक्यात नको वाचायला... सुट्टीत बघू.." असा विचार मनात आला. पण आता स्वभावाप्रमाणे हातात घेतलेलं पुस्तक संपवल्याशिवाय चैन पडणार नाहीये. Hopefully शेवट जरा आशावादी किंवा प्रेरणादायी असावा!

काहीही विषय नसताना मी चिकार बडबड करू शकते हे मला माहित होतं, पण काहीही एक विषय नसताना इतकं खरडू पण शकते हे नव्यानंच कळलं! चला... झाली तेवढी अघळपघळ पुरे झाली! कामाला लागलेलं बरं... शुक्रवारी अजून एक सबमिशन आहे! Deadline is the ultimate inspiration - हेच खरं! :)

Friday, January 5, 2007

एका दाटून आलेल्या संध्याकाळी...

एका दाटून आलेल्या संध्याकाळी आमच्या university च्या campus मध्ये घेतलेले हे फोटो. मला photography मधलं काहीही कळत नाही. 'घेतला camera आणि केलं click' असेच हे फोटो आहेत, तेव्हा please bear with them! :-)





मी library च्या porch मध्ये उभं राहून ज्या 'मोठ्ठ्या' लॉन्स वर कोसळणारा पाऊस पाहिला ते हे लॉन्स, अर्थात 'Quad' . इथे रोज पहाटे आणि संध्याकळी बरेच लोक jogging किंवा walk ला येतात. संध्याकाळी आई-वडील लहान मुलांना खेळायला घेऊन येतात. बरीच मुलं सायकल चालवताना दिसतात. संध्याकाळी department मध्ये कंटाळा आला, की Gorgas library च्या Coffee shop मधून कॉफी घेऊन यायची, आणि कॉफी घेत घेत Quad वर फेरफटका मारायचा, हा माझा आवडता कार्यक्रम! समोर दिसणारा उंच tower म्हणजे Denny Chimes. त्यातून थोड्या थोड्या वेळाने (नेमक्या किती ते माहित नाही) छान आवाज येतात.





Quad, पुन्हा एकदा! Fall season च्या सुरुवातीला ही सगळी झाडं लाल-पिवळ्या-नारिंगी पानांनी डवरलेली असतात. Fall colors नी नटलेलं quad विलक्षण सुंदर दिसतं. आता पानगळ झाल्यावर हीच झाडं अगदी भकास दिसू लागतात. Summer मध्ये संध्याकाळी गजबजून जाणारं Quad हिवाळ्यात मात्र अगदी उदास वाटतं...





Gorgas Library... UA मधली सगळ्यात देखणी आणि दिमाखदार वास्तू! सध्या Holiday season साठी सजलेली! Gorgas च्या पायऱ्यांवर किंवा porch मध्ये उभं राहिल्यावर आख्खं Quad डोळे भरून बघता येतं. इथेच उभं राहून Quad वर कोसळणारा पाऊस पाहिल्याची आठवण आजही माझ्या मनात ओलावा निर्माण करते. Gorgas च्या अगदी समोर, Quad च्या दुसऱ्या टोकाला Denny Chimes आहे. निळ्या आकाशाच्या पार्श्वभूमीवर तो tower देखिल इथून फार सुरेख दिसतो.




Gorgas च्या porch मधून दिसणारी Denny Chimes. माझं department Quad च्या एका बाजूला आहे, तर ऑफिस दुसऱ्या बाजूला. त्यामुळे दिवसातून एकदा तरी Quad ओलांडून पलिकडे जावं लागतंच. आजूबाजूची झाडं, लॉन, त्यावर धीटपणे बागडणाऱ्या खारी, Gorgas, Denny Chimes, सगळ्याकडे पहात चालायला खूप छान वाटतं...




Denny Chimes च्या जवळून टिपलेली Gorgas.





UA चा मानबिंदु - Denny Chimes, एका दाटून आलेल्या संध्याकाळी....