Monday, April 14, 2008

मागे ठेवलेलं आयुष्य...

Disclaimer: विषय तसा cliched आहे. या विषयावर मीही बरंच वाचलंय खूप ठिकाणी. पण मी पहिल्यांदा अनुभवलं, तेव्हा कळलं हा impact किती hard-hitting असतो ते! अनुभव घेतल्यानंतर शब्दांत उतरायलादेखिल मध्ये बराच काळ जावा लागला. पण लिहील्याशिवाय स्वस्थ बसवलंही नाही. थोडक्यात, वाचताना कंटाळा येण्याची शक्यता आहे, तेव्हा... स्वतःच्या जबाबदारीवर वाचावं! :)

*************

सकाळी... हो, सकाळ झालीच असावी... कारण अर्धवट झोपेतही मला माझ्या पलंगाशेजारच्या किलकिल्या खिडकीतून सकाळच्या fresh, crisp हवेचा ओळखीचा वास आला आणि त्याहूनही ओळखीचा, आवडीचा पक्ष्यांचा किलबिलाटही ऐकू आला. तर सकाळी अर्धवट जाग येऊनही मी तशीच डोळे न उघडता पडून राहिले. तो वास श्वासांत भरभरून घेत, पक्ष्यांचा आवाज कानभरून ऐकत. पांघरूण आणिक थोडं घट्ट ओढून घेतलं. थोड्यावेळाने स्वयंपाकघरातून ('किचन'मधून नव्हे) येणारा मेथीच्या भाजीचा खमंग दरवळ त्यात मिसळला आणि जरा कानोसा घेतला तर स्वयंपाकघरात आईची लगबगही अस्प्ष्ट ऐकू आली. रेडिओही चालू होता. नेहमीप्रमाणेच.

"आकाशवाणी, पुणे. भालचंद्र जोशी प्रादेशिक बातम्या देत आहेत."

सात पाच झाले - माझ्या चटकन लक्षात आलं! आठवतं तेव्हापासून सकाळी रेडिओवरून वेळ सांगायची जुनी सवय आमच्या घरात सगळ्यांची! रेडिओतून मंगला कवठेकरांचं किंवा बलदेवान्दसागरांचं 'इति वार्ता: ' ऐकू आलं की, "पियूऽऽऽ संस्कृत बातम्यासुद्धा संपल्या. अजून अंघोळीला गेली नाहीस का? काय शाळा बुडवायचा विचार आहे का आज?" - हे पपांचं परिचयाचं वाक्य पाठोपाठ यायचंच. हे सगळं आठवून गालातल्या गालात हसू आलं आणि शेवटी उठून अंथरूणातच बसून राहिले. खिडकी उघडून बाहेर पाहिलं तर मागच्या कंपाऊंडच्या भिंतीवर तोच ओळखीचा भारद्वाज होता. लहानपणी सकाळी दात घासता घासता खिडकीतून या "तपकिरी कोट घातलेल्या कावळ्या" कडे बघताना कितीदातरी आवरायला उशीर झाला होता! "सगळं तस्संच आहे की... " मला वाटून गेलं. मग लगेच लक्षात आलं... दीडच तर वर्षं झालंय. आपण काय असे वर्षानुवर्षांनी घरी परत आल्यासारखं करतोय!

दिवसभराच्या 'अजेंडा' ची मनातल्या मनात उजळणी केली. आईला आज दुपारी वालपापडीची भाजी करायला सांगूयात - आपल्याला तिकडे खायला मिळत नाही. का आपणच करावी? तेवढाच तिला आराम. एरवी कोण करून घालणार तिला तरी? आणि संध्याकाळी वरणफळं... ती मात्र तिच्याच हातची. आपण कितीही केली तरी चिंचगुळाची आमटी काही तिच्यासारखी होत नाही! दुपारी गावातल्या गणपतीला जायचंय. वाड्यातल्या सुद्धा. आमचं चिंचवड म्हणजे मोरया गोसावींचं देवस्थान. पवनेच्या काठी. काळ्या कातळातलं पेशवेकालीन मंदीर आहे. पण आता रंगीबेरंगी ऑईल पेंट फासल्याने पार रया गेलीये त्याची. नदीच्या घाटावरही संध्याकाळी बसून राहयला फार रम्य वगैरे वाटायचं. आता पाणी खूप खराब झालंय. वाडा मात्र अजून तसाच असावा. शांत, प्रसन्न. पण या वेळी गेले तर वाड्यापाठीमागची जुनी वेदपाठशाळा पाडून तिथं काँक्रीटचं बांधकाम चालू होतं. बकुळीचं झाड अजून तसंच होतं, पण पूर्वीसारखा बकुळीच्या फुलांचा सडा नव्हता झाडाखाली. थोडं चुकल्याचुकल्यासारखं झालं. रविवारी संध्याकाळी इथे गाणं असतं. आता दोन-चार दिवसात वार्षिक उत्सवही चालू होणार होता. तेव्हा तर बहारच असते गायन-वादनाची. पण नकोच तेव्हा रात्रीचं गर्दीत. इथे असं सगळं शांत असतानाच बरं वाटतं. मग एक दिवस घरी गौरीताईचं गाणं ठेवलं... आणि शिंदे सरांचं. गौरीताई 'शामकल्याण' गायली. तिचं 'सोऽहमहर डमरू बाजे' मला खूप आवडतं. सरांचं 'धीर धरी, धीर धरी, जागृत गिरीधारी'. घरी खूप लोक आले गाणं ऐकायला. आमचा हॉल गच्चं भरून गेला. खूप छान झालं दोघांचंही गाणं. रात्री सगळे गेल्यावर काका-काकू, आत्या वगैरे घरातल्या मंडळींसाठी आईने पिठलं-भाकरी, मुगाची खिचडी असा पटकन स्वयंपाक केला. खूप दिवसांनी खूप गप्पा मारल्या सगळ्यांशी. भावंडांबरोबर दम लागेस्तोवर दंगा केला. छोट्या भाचीला पाठीवर 'साखरेचं पोतं' करून घरभर हिंडवलं. तिला थोडा आगाऊपणा शिकवला. माझी भाची शोभायला नको? :)

"श्रेया कशी आहे?"
"हुताऽऽऽल!" (हुशार!)

आईने केलेली भाजी खाल्ल्यावर आईला 'थम्स अप' करून म्हणायचं, "गुज्जॉब!" (Good Job!) :p

छोटी आत्या घरात शॉर्ट्स घालून बसली असेल तर तिला चिडवायचं, "हाप तद्दी...!" (हाफ चड्डी!) आणि वर खि खि करून हसायचं!

नवीन गाणं पण शिकवलं...

"या वऱ्याच्या बसुनी विमनी सहल करूया गगनाची,
चला मुलांने आज पाहूया शाळा चांदोबा गुरूजींची..." :-)

पटकन शिकली पोरगी. अगदी माझी भाची शोभते!

एक दिवस सकाळी बहिणीबरोबर दुर्गा टेकडीवर फिरायला गेले. त्या टेकडीची तर पार सारसबाग करून टाकलीये! उंच उंच झाडं तोडून छोटी छोटी झुडुपं काय, कारंजी काय, काँक्रीटच्या पेव्हमेंट्स काय... असो. बदल होतच राहणार. कुरकुर करण्यात काही अर्थ नाही. नेहमीच्या ठिकाणी भेळ, पावभाजी, वडापाव, दाबेली वगैरे खाण्याचे कार्यक्रम कधी बहिण, तर कधी मित्रमैत्रीणींबरोबर पार पडले. रस्त्याच्या कडेला विकत मिळणारा तिखट-मीठ लावलेला, अर्धवट पिकलेला पेरूही खाल्ला. उसाच्या रसाची खूऽऽप आठवण आली, पण डिसेंबरात कुठून आणणार उसाचा रस? :-( मित्रमैत्रीणी कधी सुट्टी/रजा/हाफ डे घेऊन भेटायला यायचे. दोघेजण तर मुंबईहून आले. ज्यांना जमलं नाही त्यांनी आठवणीने पुन्हा पुन्हा फोन केले. खूप बरं वाटलं. मोबाईल फोनची पण काय चंगळ असते ना इथे. एखादा जुना handset बघा, दीडशे रुपयांत सिम विकत घ्या ("तो आपला कोपऱ्यावरचा दुकानदार तुला हवा तो नंबर पण देईल" - हमारे 'खास आदमी' ! ), जेवढा वापराल तेवढ्याचे पैसे भरा आणि वापरून झाला की बंद करून टाका. US मध्ये नवीन फोन घेऊन बघा! ऍक्टीवेशनचे $36, कमीतकमी एका वर्षांचं कॉन्ट्रॅक्ट, महिन्याला $50 चं बिल... शिवाय तुम्ही इतर कुठला फोन वापरू शकणार नाही याची खबरदारी फोन कंपनीनी घेतलेली असते. हे सारं तुमच्या सोशल सिक्युरिटी, क्रेडिट हिस्टरी वरून पन्नास वेळा कटकट केल्यानंतर. पण ते असो. रंजन-मेघनाशी फोन झाल्यावर भारतातून काय आणू विचारलं तर म्हणे, "लिमलेट्च्या गोळ्या आण!" कपाळ माझं! तिकडे बसून लहानपणीच्या आठवणीने नॉस्टॅल्जीक व्हायचं आणि असलं काय काय आठवायचं! यांना वाटतं भारतात अजून पोरं सोरं लिमलेट्च्या गोळ्याच खातात. इथे दुकानांमधून लिमलेट्च्या गोळ्या शोधता शोधाता माझ्या काय नाके नऊ आलं, आणि प्रत्येक दुकानात दुकानदाराने आणि इतर गिऱ्हाईकांनी माझ्याकडे "काय ध्यान आहे" अशा नजरेनं कितीदा पाहिलं, ते मलाच माहित! पण तेही असो.

मग अधून मधून 'पुण्यात जायचा' कार्यक्रम व्हायचा. चिंचवडला राहणाऱ्यांना '३६' किंवा '१२२' ने पुण्यात जाणं, हा किती मोठा कार्यक्रम असतो ते विचारा! ...तीच गर्दी... पण मला अजूनही धावत जाऊन खिडकीची जागा पकडता येते. १२ वर्षं धक्के खाऊन कमावलेलं कौशल्य असं अमेरिकेला येऊन दीड वर्षात नाहीसं होईल? लक्ष्मी रोड, कुमठेकर रोड वरची नेहमीची खरेदी, 'सुजाता मस्तानी', 'जनसेवा' मधला अस्सल खरवस, एका दुपारी 'निसर्ग'मध्ये खाल्लेला सुरमई मासा (शिवाय सोलकढी!), 'Marz-O-Rin' चं सँडविच, 'रसिक साहित्य', 'पाथफाईंडर', तांबड्या जोगेश्वरीच्या बोळातला सीडीवाला, 'मंगला'त आईबरोबर पाहिलेला मराठी सिनेमा. (नाही आवडला! सोनाली कुलकर्णी पण हल्ली (अमृता सुभाषसारखी) प्रचंड ओव्हरऍक्टींग करायला लागलीये!). दिवसभर भटकून दमून घरी यायचं, आईच्या हातचं गरम गरम जेवायचं - ज्वारीची भाकरी, एखादी भाजी, मुगाची खिचडी आणि दाण्याची चटणी! मग पुन्हा 'विविध भारती' ऐकत बिछान्यावर पडायचं. 'छायागीत', 'आप की फर्माईश', 'बेला के फूल' (हल्ली बहुधा 'स्वामिनी - बेला के फूल' असतं! स्वामिनी, साड्यांची महाराणी! :D)...

"तारों की जुबाँ पर है मोहब्बत की कहानी
ऐ चाँद मुबारक हो तुझे रात सुहानी.."

- अशी कित्येक वर्षांत न ऐकलेली गाणी ऐकून उगाच हळवं व्हायचं! :)

जायचा दिवस जवळ यायला लागला तसं बॅग भरायचं जीवावर येऊ लागलं. I did not feel ready to go back. जायचं होतंच... तिकडे काम वाट बघतंय... रीसर्च राहिलाय, थिसीस लिहायचंय! Anxiety होतीच. पण मला अजून थोडं राहयचं होतं. आताच तर आले होते मी... तीनच तर आठवडे झालेत. सगळ्या जिवाभावाच्या लोकांना भेटले, पण त्यांच्या सोबतीत अजून थोडे दिवस घालवायचे होते. मी मागे ठेवलेलं, दीड वर्षं miss केलेलं आयुष्य महिन्याभरात आधाशासारखं जगून घ्यायचं होतं! खूप हिंडले, फिरले... पण समोरच्या काकूंचा नवीन नातवाला बघायचं राहिलं. आत्याच्या हातची बिर्याणी खायची राहिली. तीनदा पुण्यात जाऊन आले, पण तुळशीबागेत हुज्जत घालून खरेदी करायची राहूनच गेली. काकांबरोबरचं 'Mainland China' मधलं डिनरही राहिलं. रानडेमावशींनी फिकट गुलाबी रंगाचं सुरेख ड्रेस मटेरियल दिलंय. त्याचा एखादा लेटेस्ट फॅशनचा ड्रेस शिवून घ्यायचा होता मस्त! बसस्टॉपवर रुपयाचा गजरा विकत घेऊन माळायचा राहिला. आणि वैशालीतली SPDP सुद्धा खायची राहिली. ती फक्त संध्याकाळीच मिळते. लोकलने लोणावळ्याला - गेला बाजार तळेगावला तरी जाऊन यायचं होतं. बालगंधर्वला नाटक बघायचं होतं एक तरी. पर्वती, सिंहगड दोन्ही राहिलं. सिंहगडावर तर जायचंच होतं. शक्यतो मुक्कामालाच. कल्याण दरवाजातून खाली उतरून तानाजी कड्याच्या पायथ्याशी, त्याच्याच सावलीत बसायचं होतं दुपारचं. देवटाक्याचं पाणी प्यायचं होतं. घोरवडेश्वरचा डोंगरही राहिला. तो तर किती जवळ. सकाळी ६:३० च्या लोकलने गेलं तर १० पर्यंत परत येता येतं. तिथलं गुहेतलं शिवालय. पांढरा चाफा. वरून दूरपर्यंत दिसणारे रेल्वेचे रूळ... श्रेयाला घेऊन बागेत खेळायला जायचं होतं एकदातरी. तीन आठवड्यात मी तिची लाडकी आत्या झाले होते. पण मी पुढच्या वेळी येईन तेव्हा तिच्या लक्षात राहीन का? अजून थोडे दिवस राहिले तर राहीन कदाचित. इथे खूप गर्दी आहे, धूळ आहे, धूर आहे. ट्रॅफिकमध्ये नाही म्हटलं तरी थोडी भितीच वाटते. आधीसारखीच टेचात ’ऍक्टीव्हा’ चालवायचा प्रयत्न करताना कुणी शेजारून जोरात हॉर्न वाजवत गेलं तर जाम दचकायला होतं, तसं दाखवलं नाही तरी! बिलंसुद्धा 'ऑनलाइन' भरता येत नाहीत अजून. पण तरी मला अजून थोडं राहयचंय इथे. थोडंसंच!

हळूहळू बॅगही भरत आली... ढीगभर मराठी पुस्तकं, तीळगूळ, चितळ्यांची बाकरवडी, मिश्राकडचा धारवाडी पेढा, काकूचे बेसनाचे लाडू, घरचा मसाला, थालीपीठाची भाजणी, श्रीखंडाच्या गोळ्या. लिमलेटच्यासुद्धा. मावसभावाने कुठून कुठून शोधून आणलेल्या. "फार नको गं आई, थोडंच दे. तिकडे मिळतं सगळं" .... सगळं मिळतं? सगळं? खरंच??... पुढचं फारसं आठवत नाही. सगळंच अंधुक... कागदपत्र, डॉलर्स, रूपये, फोन, भेटी, मिठ्या, ओघळलेला एखादा चुकार अश्रू... मग भानावर आले ती 'डेल्टा0१७' JFK ला लॅंड झाल्यावरच. खिशातून सेलफोन काढून चालू केला. उद्यापासून परत sandwich lunches आणि tall coffee with skim milk. अर्थात त्याचं वावडं आहे असं नाही. एक आयुष्य मागे ठेवून मी माझ्या या दुसऱ्या आयुष्यात परत आले. बर्मिंगहॅमच्या विमानतळावर "Sweet Home Alabama... " ऐकून परत हास्याची एक लकेर उमटली... मी 'घरी' जायला निघाले!

30 comments:

Sumedha said...

वा! वा! cliched आहे खरं, पण सहज सुंदरही! आता "senti" मारायचंच असं ठ्रवल्यावर काय ;)

गुज्जॉब!

a Sane man said...

kitihi ugaLala tari na jaNara nostalgia aahe ha! good one!

कोहम said...

मी मागे ठेवलेलं, दीड वर्षं miss केलेलं आयुष्य महिन्याभरात आधाशासारखं जगून घ्यायचं होतं....hmm paTala.....tithe pochalya divasapasun mala parat jayachya divasachi kaLaji vaTayala lagate......ani ho baryach goshti nehemich rahun jatat.....rahudet bapadya....tyanna kay mahit? divasala 24 taasach asatat ani ase thodech divas apalyala miltat??

Parag said...

cliched ahe.. pan mast jamlay... relate karta ala.. :)
Keep writing..

सर्किट said...

आईई.ग्गं..!! कसलं लिहीलंयेस. बस्स बस्स.. अब रुलायेगी क्यां? असं म्हणावंसं वाटलं!

’बेला के फ़ूल’.. हाय.. किती वर्षं झालीयेत.. अजूनही ’अशोक सोनावणे’ च सांगतात का गं? ते असो किंवा भालचंद्र जोशी - यांना कधीच रिटायरमेण्ट येवू नये खरं.. तसं झालं तर आपलं एक मागे सांभाळलं गेलेलं नातं गायब होईल की काय अशी भीती वाटावी!

हम्म, पण आता तुझ्याकडे महिनाभर पुरतील एवढ्या बाकरवड्या आणि श्रीखंडाच्या गोळ्या आहेत - तेव्हा एन्जॉय! :)

Monsieur K said...

oft repeated or cliched, yet as e'one says - very well written :)

radio var ch tey juna gaana mala aathvat naahiye. shodhla paahije aataa...

Nandan said...

Vishay cliched asala, sagaLech jari yaatoon jaat asale, tari aapala anubhav aapalyalasathi mahattvachach. Chhan mandala aahes.

Meghana Bhuskute said...

अफलातून. मी माझ्या ताज्या ताज्या भाच्याला एकदासुद्धा मांडीवर न घेता इ़कडे आलेय... :( नुसतेच फोटो...
मजा आली...

nspujari said...

swat:la alele anubhav utkaTatene prakat karun lihaNyaat tujha haatkhanDa aahch..ha hi tyala apvad nahi..ughaDat jaaNaryaa shravaNaatalyaa paavasaasarkhch vaaTal....

Kaustubh said...

कंटाळवाणं झालंय थोडसं, पण फार मनापासून लिहिलं आहेस. तुला मोकळं वाटतंय ना लिहून?
ते जास्त महत्त्वाचं आहे.

Anand Sarolkar said...

Sahee! khupach chhan :-)

Priya said...
This comment has been removed by the author.
Priya said...

आवर्जून दिलेल्या प्रतिक्रियांबद्दल आभार, मंडळी! आणि patiently वाचल्याबद्दलसुद्धा :-)

सर्किट, 'बेला के फूल' या वेळेला ऐकलं तेव्हा प्रत्येक वेळी एका बाईंचाच आवाज होता रे. तू पण रेडिओ ऐकतोस का? मी आता गेले तेव्हा मधुमालती (आताचं 'जितेंद्र घोडके सराफ - हॅलो मधुमालती' :D), गीतगंगा, संगीत सरिता, आपली आवड, जयमाला शिवाय या लेखात उल्लेखलेले रात्रीचे जुन्या हिंदी गाण्यांचे कार्यक्रम, हे सगळं ऐकून अशी खुश झाले ना! :-)

केतन, लताबाईंचं गाणं आहे ते बहुधा. डीटेल्स मलाही माहित नाहीत. फक्त रेडिओवर ऐकलंय अनेकदा! काम करता करता अचानक एखादं आवडीचं गाणं ऐकायला मिळणं, एक गाणं संपल्यानंतर पुढ्चं कुठलं असेल याची उत्सुकता, सिनेमा-गायक-संगीतकारांचं नाव ऐकून निवेदनावरून आणि सुरूवातीच्या म्युझिकवरून गाणं ओळखायचा प्रयत्न, फारशी परिचीत नसलेली पण उत्कृष्ट गाणी आणि त्यांची background ऐकायला मिळणं - हे रेडिओचं दे्णं! त्याची मजा youtube किंवा raga वर नाही! :-(

कौस्तुभ, म्हणून तर disclaimer आहे ना! :p

Akira said...

Priya...Kiti chaan lihila ahes ga...sumedha mhanali tasa 'sahaj-sundar'....tujha lekhat aleli anek thikana majhya hi jiwabhawachi ahet..ani barechse anubhav agdi majhech asawet ase... :)

xetropulsar said...

पण तरी मला अजून थोडं राहयचंय इथे. थोडंसंच!. . . .

खटकलं. . .पुरतं खटकलं. . ."थोडंसंच" का रहायचंय?. . . म्हणजे आपणही शेवटी इथे अमेरिकेत स्वत:चा गाव वसवणाऱ्यांमधलेच! तिकडच्या आठवणी आळवत इथे रहाणाऱ्यांमधले! असो. . .वैयक्तिक प्रश्न आहे. . .

लेखाबद्दल. . . नो डाऊट गुज्जॉब!

असं लहानपण आठवायला आणि छळायला लागलं की समजावं गद्य पंचविशी आली. . .:ड्

दिवे घ्या.

अमित

Priya said...

xetropulsar,
थोडसंच राहयचं होतं, कारण परत येऊन काम पूर्ण करून थिसीस लिहायचं होतं! :-) तसं लिहीलंय की मी.

असो. प्रतिक्रियेबद्दल आभार. अकिरा, तुमचेही. आणि पंचविशीबद्दल... (sigh!) :D

xetropulsar said...
This comment has been removed by the author.
xetropulsar said...

हे हे तसं नाही. . . मला त्रास होतो इथे येऊन भारत चांगला चांगला म्हणत इथेच रहाणाऱ्यांच्या बेगडी(?) भारत प्रेमाचा. . . आता भारताबाहेर राहून तिकडे पैसे पाठवणे, गुंतवणूक करणे, थोडक्यात सामाजिक बोजा या देशावर टाकून आर्थिक फायदा भारताच्या पारड्यात टाकणे चांगले, का काही वर्षांनी का होईना पण भारतात परत जाणे चांगले यात योग्य काय हे ठरवणे अवघड आहे . . . तुझ्या भारतात थोडंसंच रहायचंय चा अर्थ - भारतात जमेल तेव्हा 'थोडेसे' आणि कायमस्वरूपी इथेच रहायचं असा घेतला मी. . .म्हणून चिडचिड

असो. . . झाला का मग प्रबंध(थेसिस) पुर्ण? नसेल किंवा होत असेल तर सध्या त्यासाठी शुभेच्छा!

अमित

prasad bokil said...

cliched आहे? विषय असेलही अनेकांनी हाताळ्लेला. पण प्रत्येकाच्या अनुभवाचं ताजेपण सारखंच आसतं. वाचून छान वाटलं. या आधी कधी मी या ब्लोगवर आलो नव्हतो. माझ्या लेखावरील प्रतिक्रियेचा धागा पकडून आलो. छान, सहज आणि सुंदर

itskary said...

Ajach alo parat deshatun :)
Any hey farach chaan watla lihilela :)

Apart from many other things as u said - maza hi rahila this time as well :((((
"घोरवडेश्वरचा डोंगरही राहिला."

Samved said...

गुज्जॉब!

HAREKRISHNAJI said...

very touchy

TheKing said...

That's life!

joman darlekar said...

तुझे सर्व लेख वाचले...
ब्लॊग छान आहे...

Aparna said...

paani ale mazya dolyat!

Mukul Hinge said...

maajhya pan dolyaat paani aala...pan te khoop vel baarik Marathi font vaachaycha prayatna kelyamule ;)

Just kidding...you write really well.
--
M.

Anonymous said...

ultimate

Dk said...

last do line main rulyaa tune! :(

pab khar lihilys! :)

Parag Vasekar said...

Baryach goshti agadi 'deja vu'!

Unknown said...

Khup ch chhan
Mihi anubhavlay he sagal
Mihi chinchwad la ch rahto
Mazach anubhv lihilay as watat hot wachtana khup sundar