शुक्रवारची संध्याकाळ असूनही मला भयंकर कंटाळा आला होता. जोडीला वैताग आणि चिडचिडही. हातातलं काम संपता संपत नव्हतं आणि 'वीकेंड स्पेशल' ढीगभर कामांची यादीही डोळ्यांपुढे नाचत होती. ऑफिसमधल्या इतर मंडळींना मात्र Friday night fever (नेहेमीप्रमाणेच) दुपारपासूनच चढू लागला होता. लंचटाईमला जी टंगळमंगळ चालू झाली... वीकेंडचे शॉपिंग प्लॅन्स, पावासाची शक्यता असल्याने फिरायला जाता येणार नाही म्हणून हळहळ, अलाबामा-ऑबर्न बास्केटबॉल गेम, जिमनॅस्टिक्स मीट, चायनीज कम्युनिटीचा कसलातरी समारंभ, असे सगळे विषय चघळून झाल्यावर मंडळी उगाच काम केल्यासारखं दाखवून पावणेपाच वाजायची वाट बघत कसाबसा वेळ काढत होती. पावणेपाच झाले रे झाले, की "बाऽऽऽय! हॅव अ नाईस वीकेंड!" म्हणून एकेकाने पळ काढला. मी मात्र हातातलं काम उरकायच्या मागे लागले होते.
साडेपाचला काम उरकून Quad वरून डिपार्टमेंटकडे चालत यायला निघाले. मला आज 'लोकल' कंटाळा आला होता. परवाच कौस्तुभने 'कंटाळ्याचे दोन मुख्य प्रकार' या विषयावर माझं प्रबोधन केलं असल्याने, मला आलेल्या कंटाळ्याचं मी तत्परतेने 'लोकल कंटाळा' असं identification केलं! 'लोकल' कंटाळा म्हणजे तेवढ्या टाईम स्पॅन करता असलेला तात्पुरता कंटाळा... 'ग्लोबल' कंटाळा म्हणजे टोटल आयुष्याचा कंटाळा! म्हणजे,
"कळून येता जगण्याची या इवलीशी त्रिज्या
उडून जाती अत्तरापरी जगण्याच्या मौजा
दारी नाही फिरकत कुठला नवा छंद चाळा
राखण करीत बसतो येथे सदैव कंटाळा
कंटाळ्याचादेखिल आता कंटाळा येतो..."
- अशा टाईपचा! [काही काही ठिकाणी संदीप खरे quote करणं इतकं अपरिहार्य का व्हावं? :) ] म्हणजे आठवडाभर निरर्थक वाटणारी कामं करताना, "कधी एकदा वीकेंड येतोय..." असं वाटत असताना येतो तो 'लोकल' कंटाळा. आणि वीकेंडला करण्याजोगं काहीच नसल्यावर नुसतंच यड्यासारखं बसून, किंवा मग वीकेंडलादेखिल प्रचंड काम असल्यावर डिप्रेशन येऊन "आपल्या आयुष्याला काहीच अर्थ नाही!" असं वाटणे म्हणजे 'ग्लोबल' कंटाळा असावा बहुतेक! हा ग्लोबल कंटाळा फार वाईट, असं कौस्तुभचं म्हणणं!
असो. पण माझा आजचा कंटाळा तसा लोकलच होता. तो घालवण्यासाठी आता काय काय करता येईल याचा विचार करत करत चालत असताना, अचानक कुठूनतरी जरा विचित्र संगीत कानावर पडलं. बासरी आणि एक-दोन ड्रम्स होते मुख्यतः . जरा इकडे तिकडे पाहिलं तर दूरवर, Quad च्या दुसऱ्या टोकाला एका mound वर चार-पाच जणं काहीतरी वाजवताना दिसले. मी चालता चालता कान देऊन ऐकू लागले. फार गोड वाटत होतं ते ऐकायला. कुठल्या एका ठराविक प्रकारचं म्युझिक म्हणता येईल असं नव्हतं ते... झालंच तर थोडा 'folk' touch होता... पण जे काही होतं ते कानांना विलक्षण गोड वाटत होतं. माझी पावलं आपोआप त्या दिशेला वळली. जवळ गेल्यावर दिसलं... माऊंडच्या खाली एका पायरीवर उभं राहून एक जण बासरी वाजवत होता. माऊंडवर चार-पाच जण होते. एकाच्या हातात एकदम राजेश खन्ना नाहीतर हृषी कपूर स्टाईल डफ होता. एकाकडे दोन छोटे छोटे, बसून वाजवायचे ड्र्म्स, एकाकडे एक भलामोठा ढोलकीसारखा ड्र्म... बासरीच्या सुरांत तल्लीन होऊन त्यांचं एका तालात बडवणं चालू होतं. एक मुलगी उभी राहून tambourine वाजवत होती, तिच्या पावलांनीही छान ताल धरला होता. एक अपंग माणुस माऊंडच्या खाली त्याच्या wheelchair वर बसून, ते हातात धरून वाजवतात ना... खुळखुळ्यासारखं दिसणारं वाद्य... काय म्हणातात त्याला, मला माहित नाही... कुणाला माहित असेल तर जरूर सांगा... ते वाजवत होता. या सगळ्या वाद्यांपैकी फक्त बासरी वाजवणारा जरा trained किंवा skillful वाटत होता. बाकी सगळेजण नुसतच काहीतरी हातात घेऊन बडवत होते. पण त्या सगळ्याचा ताळमेळ असा काही जमून आला होता, की ऐकत रहावसं वाटत होतं. सगळेजण आपापसात खाणाखुणा करून मध्येच लय बदलत होते. कधी एकदम जोरदार ठेका, काही वेळाने जरा संथ, मग पुन्हा हळू हळू सगळे गुंग होईस्तोवर rhythm वाढवत वाढवत न्यायचा!
बिझनेस स्कूल मधली टाय वगैरे घातलेली दोन मुलं माझ्यासारखीच कुतूहलाने त्यांच्याकडे बघायला थांबली होती. एकाने त्यांना हात करून वर बोलावलं... त्यातला एकजण गेला, आणि तिथल्या पिशवीतून आणखी एक छोटा डफ काढून वाजवू लागला. मी जवळ जाऊन त्यांच्याकडे बघत, ते संगीत ऐकत उभी राहिले. मी पण मस्त ओढणीसहीत सलवार-कमीज वगैरे घातलेला असल्याने ते लोक देखिल उत्सुकतेने माझ्याकडे पहात होते. ते विचित्र, पण गोड संगीत एव्हाना मलाही 'चढू' लागलं होतं :) त्या tambourine वाल्या मुलीने हसून, हातवारे करून मलाही वर बोलावलं. Tambourine माझ्या हातात दिलं आणि स्वतः आणखी काहीतरी घेऊन वाजवायला लागली. त्या tambourine वर माझ्या हाताची एक थाप पडली, आणि मग मी केव्हा त्या लयीत एकरूप झाले कळलंच नाही. बराच वेळ आजूबाजूचं काही दिसतंच नव्हतं जणू... त्या फ्ल्यूटचा गोड, नाजूक, पण तरीही आसमंत भारून टाकणारा आवाज... डोळे बंद करून ऐकलं तर सह्याद्रीच्या कुशीतल्या कुठल्याश्या खेडेगावात एखादा गुराखी नदीच्या किनारी बसून पावा वाजवतोय असंच वाटावं! सोबतीला एवढा मस्त ठेका... एवढी तालवाद्य असली तरी ती अतिशय सौम्य होती, आजिबात गोंगाट वाटत नव्हता. खूप वेळ हातातल्या त्या खंजिरीसह ते संगीत 'अनुभवत' राहिले. मनात खोलवर रुजू दिलं त्याला. अगदी आतून फुलून आल्यासारखं झालं. का कोण जाणे, फार फार ओळखीचं, जवळचं वाटत होतं ते सगळं. कंटाळा, मरगळ, चिंता, दुःख, विवंचना, काळज्या सगळ्यांना फाटा देऊन आयुष्याशी नातं सांगणारं असं काहीतरी...!!
काहीवेळाने जऽरा भानावर आले. बघितलं तर प्रत्येकाच्या चेहऱ्यावर त्या क्षणाचा आनंद ओसंडून वाहत होता. जाणवलं की किती वेगवेगळे होतो आम्ही सगळे... काळे, गोरे, माझ्यासारखे 'ब्राऊन' :), तरूण, मध्यमवयीन, वृद्ध, अपंग, धडधाकट... सगळे अगदीच वेगवेगळे. एरवी कुठल्याही ठिकाणी भेटलो असतो तर एकमेकांशी बोललोदेखिल नसतो कदाचित. सगळ्यांना एकमेकांची भाषाही कळली नसती. पण आता मात्र एका वेगळ्याच भाषेत आमचा संवाद चालला होता. कुणी मान डोलावून कुणाला दाद देत होतं, कुणी हाताने खूण करून लय वाढवायला सांगत होतं, कुणी दुसऱ्याच्या वाद्यावर ताल धरत होतं, कुणी आपाल्याच नादात हसत होतं!
खिशात सेलफोन व्हायब्रेट झाला आणि मी एकदम ’खऱ्या’ जगात आले. डिपार्टमेंटमध्ये काही जणांना भेटायचं होतं, ते वाट बघत असतील. इथे अजून थांबणं शक्य नव्हतं. जाता जाता हे लोक कोण आहेत, हे काय नककी काय करतायत, का करतायत वगैरे विचारावं, तर कुणाची तंद्री भंग करणार? :)Tambourine जिच्याकडून घेतली तिला परत देताना विचारलं,
"How long are you folks going to be here?"
तर ती हसून म्हणाली, "I don't know. I just joined them like you did."
मग एकाने सांगितलं, "We do this every Sunday at 1 o'clock! You can join us anytime..."
पण त्याला बाकी काही तिथे विचारून त्या सगळ्या भारलेल्या वातावरणाचा भंग करण्यात पॉईंट नव्हता. मी सगळ्यांना wave करून तिथून निघाले खरी, पण ते सूर कितीतरी वेळ कानात घुमत होते. कंटाळा तर कुठच्या कुठे गेलाच होता, पण तो येऊ नये म्हणून वीकेंडला (होमवर्कव्यतिरिक्त) काय काय करता येईल, याबद्दल नवनवीन कल्पनासुद्धा डोक्यात येऊ लागल्या! या वीकेंडचा highlight उपक्रम म्हणजे एक भलंमोठं jigsaw puzzle सोडवायला घेतलंय! प्रचंड होमवर्क आणि पुढच्या आठवड्यात परीक्षादेखिल असल्याने लगेच पूर्ण होणार नाही, पण होईल तेव्हा त्याचा update इथे लिहीनच! शिवाय जमेल तेव्हा रविवारी दुपारी एक वाजता Quad वर चक्कर टाकायचा विचार आहेच! :)
Subscribe to:
Post Comments (Atom)
13 comments:
सही! छान लिहीलंयेस. :-) कंटाळ्याचे प्रकार, संदीपची कविता (बाय-द-वे, कोणत्या आल्बम मधली कोणती कविता आहे ही?), आणि तुझा सांगितिक अनुभव ही मस्त लिहीलायेस. :-)
पोस्टला शीर्षकही साजेसं दिलंयेस.. संगीताने लोकल आणि ग्लोबल कंटाळेही पळवून लावता येतात हे खरंय..
कंटाळ्याची Theory तुला चांगलीच समजलीये. शाब्बास ! :)
असो. लेख आवडला. चारू आणि माझ्या संगीतावर जेव्हा गप्पा होतात तेव्हा बऱ्याचदा हाच निष्कर्ष निघतो की संगीत हे जितकं जास्त सहजपणे आल्यासारखं वाटतं, तितकं ते जास्त भिडतं.
शास्त्रीय संगीताच्या बाबतीत ही गोष्ट जास्त जाणवते. म्हणजे राग, आलाप यातल्या कठिणपणामुळेच बऱ्याचदा आपण त्याचं कौतुक करतो. अर्थात शास्त्रीय संगीत हा फार वरचा प्रकार आहे, पण त्यात एकप्रकारचा सहजपणा जाणवत नाही. माझं अगदी वैयक्तिक मत आहे हे, त्यामुळे गैरसमज नको.
७०-८० च्या दशकातील Rock संगीताच्या आम्ही इतक्या प्रेमात का याचं कारणही तेच आहे. :) चारूशी बोल कधीतरी. तुझं चांगलंच प्रबोधन करेल.
तुझ्या लेखाला एक 'वॉव'कार बहाल - विशेषत: त्या खंजिरी वाजवण्याच्या अनुभवाला! :)
आणि अगं त्या खुळखुळ्यासारख्या वाद्याला rattle असंच नाव आहे.
Chan lihile ahes....
Experience bhari hota tuza.
rattle :
कधी नाही ते मला एका प्रश्नाचं उत्तर पुसटसं माहिती होतं, पण डोक्यावरुन हातबित फिरवून, नाक पुसून, उत्तर सांगायला बोट वर केल्यावर गुरुजींनी 'हं तू सांग' असं म्हणायच्या आधीच पहिल्या बाकावरच्या गायत्रीने उत्तर दिलं. :((
btw, हे कंटाळ्याचं विश्लेषण कौस्तुभने नक्की कुठं केलं आहे. मी मिस केलेलं दिसतंय :)
एकंदरीत शनिवार-रविवार काय करायचं हा सगळ्यांनाच भेडसावणारा प्रश्न दिसतोय ;)
कौस्तुभचं अर्थात शास्त्रीय संगीत हा फार वरचा प्रकार आहे, पण त्यात एकप्रकारचा सहजपणा जाणवत नाही हे विधान फारसं सिरीयसली घेऊ नको... याच्यावर त्याचं बौद्धिक कुणीतरी घेईलच :p
अभिजीत, धन्यवाद! :) संदीप-सलीलच्या ’नामंजूर’ मधलं गाणं आहे हे.
’आताशा मी फक्त रकाने दिवसांचे भरतो
चाकोरीचे खरडून कागद सहीस पाठवतो’
- असं धृवपद आहे. नक्की ऐक. खूप सही आहे!
कौस्तुभ, कसचं कसचं! :p तुमच्यासारखे मास्तर असल्यावर काय... आमच्यासारखे मठ्ठ विद्यार्थीसुद्धा पटापट शिकतात! :D
>>>> चारूशी बोल कधीतरी. तुझं चांगलंच प्रबोधन करेल. <<<< तुला, "चारूशी बोल कधीतरी. तुला चांगलंच प्रवचन देईल." असं म्हणायचं होतं का??? :p
BTW, यावरून शास्त्रीय संगीताबद्दल माझ्या ओळखीचे एक काका अगदी crude उपमा द्यायचे, ते आठवलं... ते म्हणायचे, शास्त्रीय संगीताचं दारूसारखं असतं. दारू पहिल्यांदा प्यायल्यावर कुणालाच आवडत नाही. You have to develop the taste, acquire the taste, वगैरे वगैरे! It grows on you...
गायत्री, पराग, धन्यवाद! :) Rattle... hmm... भारतीय नाव नाहीये का एखादं?
योगेश, उगी उगी! :D
आणि गुरूजी अशा ’हाय लेव्हल’ थिअऱ्या वर्गात सांगत नाहीत. त्यासाठी त्यांच्याकडे खास शिकवणी लावावी लागते! :D स्कॉलर बॅच असते त्यांची!;-)
jhakaas lihilays..! agdI chitraatmak varNaN kartes tumchyaa quad,etc cha.. mI imagine karU shakte te sagLa.. :) tujhyaa haataat tambourine aani baaki lok paN paN imagine karataa yetaat.. :)
Tambourine experience jabri hota ki tuza... I appreciate (ekdam US paddhatine :)) the way u get involved with these americans :)
BTW tu friday la indian dress ghalun office la kashi kai geli hotis???Ani ho maza chronological order cha total ghol zalai ... as per ur first para.. i thot u were talking of friday evening.. but u mentioned te lok sunday la astat tithe.. Exactly kadhi zale? ;)
प्रीती, :)
मृणाल,
हो, हे सगळं शुक्रवारी संध्याकाळीच घडलं. ते रविवारी दुपारी नेहमीच तिथे येतात असं त्यांनी सांगितलं, पण तेव्हा शुक्रवारी संध्याकाळीदेखिल तिथे का आले होते, हे नाही विचारलं मी... :)पण बरं झालं आले, नाहीतर मला कसे भेटले असते? :)
आमच्या ऑफिसमध्ये चालतात अगं informal किंवा traditional कपडे कधी कधी... esp फ्रायडेला! त्या दिवशी दिवसभरात कुठे इकडॆ-तिकडे हिंडायचं नव्हतं, मीटिंग्ज पण नव्हत्या, नुसतंच ऑफिसमध्ये बसून काम करायचं होतं, म्हणून घातला :) I miss wearing Indian clothes sometimes! :( मग वीकेंड-वीकडे काही न बघता घालते बिंधास्त सलवार-कमीज! :)
सुंदर लिखाण. आवडले.
उस्फूर्ततेने संगितात सामिल होता येण्याची कमाल वाटली. :-)
सुंदर! आमच्या इथे विव्हरस्ट्रीट मार्केटमधे किंवा ऎशव्हिलमधे ड्रम सर्कल असते त्याची आठवण झाली. तुझ्या लिहिण्याच्या शैलीने डोळ्यासमोर चित्रं उभं राहिलं.
कंटाळ्याचा आणखी एक भाग:
static कंटाळा म्हणजे जो कायमरूपी असतो. उदा: स्वयंपाक करणे हा स्टॅटिक लोकल कंटाळा हा आहे.
संगीता, :)
Post a Comment